भूपृष्ठावरील मातीचे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतर म्हणजे जमिनीची धूप होय. प्राणी व वनस्पती यांची हालचाल तसेच पर्जन्य यांचे परिणाम यामुळे भूपृष्ठावरील मातीचे कण एकमेकांपासून विलग होतात. असे हे विलग झालेले कण वारा व जमिनीवरून पावसाचे वाहणारे पाणी यांच्याबरोबर वाहून नेले जातात व त्यामुळे जमिनीची धूप होते. धूपेची प्रक्रिया ही नैसर्गिक आहे. खडकांपासून ऊन, पाऊस, वारा, थंडी, उष्णता यांच्या परिणामांमुळे विदारण प्रक्रियेने माती तयार होत असते. ही विदारण प्रक्रिया अत्यंत संथगतीने होत असते. दाट झाडे, झुडपे यांच्यापासून पडणारा पालापाचोळा साठून कुजून त्यापासूनही माती तयार होण्यास अनेक वर्षांचा कालावधी जावा लागतो. सखल भागातील माती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन दुसऱ्या ठिकाणी गाळाच्या स्वरूपात साठतो व तेथे उपयुक्त जमीन तयार होते. तर उंच, उताराच्या व दाट जंगलांच्या भागातील पालापाचोळा या सखल भागात येऊन साठतो व त्यापासून माती तयार होऊन जमिनीची धूप भरून निघते. परंतु, मनुष्य व अन्य प्राणी यांचा वावर वाढल्यामुळे मातीचे कण विलग होतात. तसेच शेतीसाठी वेगवेगळ्या प्रकारची मशागत केल्याने मातीची उलथापालथ होऊन ती विस्कळीत होते. त्याचप्रमाणे चुकीच्या मशागतीच्या पद्धतीमुळे जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या व जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याला अर्निबध मार्ग तयार करून दिला जातो व त्यामुळे वाहणाऱ्या पाण्याची गती वाढून त्यातून ऊर्जा निर्माण होते. अशा प्रकारे नैसर्गिकरीत्या होणाऱ्या धूपेला गतिवृद्धीत धूप असे म्हणतात. या प्रकारची धूप ही अपायकारक असते. त्यामुळे अशी धूप रोखण्याची गरज आहे.  धूप रोखण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी कृषी मशागत पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारची पिके आलटून पालटून घेणे, सर्वत्र सलग एकच पीक न घेता वेगवेगळ्या प्रकारची पिके वेगवेगळ्या पट्टय़ातून घेणे आणि शेतीसाठी करावयाच्या मशागती उताराला समांतर न करता उताराच्या आडव्या व समपातळी रेषेत समांतर केल्यास जमिनीची धूप रोखण्यास मदत होते.