कोकणातील शेती हा आतबट्टय़ाचा व्यवसाय असल्याचे बोलले जाते. मात्र पारंपरिक पिकाला फाटा देऊन जर जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांची लागवड केली तर कोकणातील शेतीदेखील फायदेशीर ठरू शकते. श्रीवर्धन तालुक्यातील चिखलप गावातील प्रगतिशील शेतकरी प्रमोद साळुंखे यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. आपल्या माळरानावर त्यांनी मिरचीची लागवड करून त्यांनी शाश्वत शेतीचा मूलमंत्र दिला आहे.
प्रमोद यांचा मुरबाड येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता. पण सततच्या भारनियमनामुळे व्यवसायात अडचणी येत होत्या. दिवसागणिक वाढणाऱ्या व्यावसायिक स्पध्रेत टिकून राहण्याचे आव्हान त्यांच्यापुढे होते. त्यामुळे आíथक संकटावर मात कशी करावी असा यक्षप्रश्न त्यांच्या समोर होता. त्यांच्याकडे काम करणारे कामगार फावल्या वेळात शेती करत असत. मिरचीचे उत्पादन घेऊन तीन ते चार महिन्यांत त्यांना चांगले उत्पादन मिळत असे. मिरची लागवड कशी होते. त्याची निगा कशी राखली जाते, बाजारपेठ कशी उपलब्ध होते. याचा अभ्यास त्यांनी केला.
मुरबाड येथील फॅब्रिकेशनचा व्यवसाय बंद करून आपल्या गावी परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गावाकडे दीड एकर शेती होती. येवढय़ाशा शेतीत काय उत्पादन मिळणार असे म्हणत अनेकांनी त्यांच्या या निर्णयाचा विरोध केला. पण शेती करण्याच्या निर्णयावर प्रमोद ठाम होते. त्यांनी आपल्या दीड एकरात मिरचीची लागवड केली. रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर न करता त्यांनी नसíगक खते आणि कीटकनाशकांवर भर दिला. पहिल्याच वर्षी त्यांना मिरची लागवडीतून अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न मिळाले. यामुळे त्यांचा हुरूप वाढला. आपण घेतलेला निर्णय चुकीचा नव्हता हे त्यांच्या लक्षात आले.
या वर्षी आपल्या शेतालगत असणारी आणखीन दीड एकर शेती त्यांनी भाडेतत्त्वावर कसण्यास घेतली. पुन्हा एकदा मिरचीची लागवड केली. पाण्याची कमतरता भासत होती. म्हणून विहीर खणण्याचा निर्णय घेतला. पंचायत समितीच्या कृषी विभागाने त्यांना डिझेल पंप, पाइप, बियाणे यांच्यासाठी अनुदान पुरवले. मेहनत फळाला आली.
मिरचीचे पीक जोमाने आले. आज दर दिवसाला त्यांच्या तीन एकर शेतीतूर तब्बल ५०० किलो मिरचीचे उत्पादन निघते. या मिरचीला ४५ ते ५० रुपये किलोचा भाव मिळतो. स्थानिक बाजारपेठेबरोबरच, मुंबई, ठाणे आणि पुणे येथील बाजारात मिरची विकली जाते. दिवसाला २२ ते २५ हजार रुपयांची मिरची विकली जाते. डिसेंबर अखेर मिरचीची लागवड होते. मार्च महिन्यात उत्पादन सुरू होते. मे अखेपर्यंत मिरची उत्पादन सुरू असते.
meharshad07@gmail.com

सुरुवातीला मिरची विक्रीसाठी मला पनवेल आणि वाशी बाजारात जावे लागत होते. आता मात्र मिरचीची गुणवत्ता आणि दर्जा पाहून व्यापारी माझ्याकडे येतात. या वर्षी मला शेतीतून सात ते आठ लाखांचे उत्पादन मिळाले आहे. खर्च वजा जाता चार ते पाच लाखांचा निव्वळ नफा मिळेल अशी अपेक्षा आहे.
– प्रमोद साळुंखे, प्रगतिशील शेतकरी

मुबंई, ठाणे आणि पुण्यासारखी महानगरे जवळ असल्याने भाजीपाल्यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. त्यामुळे रायगडातील शेतकऱ्यांनी भातपिकाच्या पलीकडे जाऊन आता अशा नवनवीन पिकांची लागवड करायला हवी.
– बबन कांबळे, कृषी अधिकारी.