हवामान बदलाच्या परिणामांची चर्चा एकीकडे सुरू असताना त्यावरील उपाययोजनांनाही हात घातला जात आहे. या चच्रेत कृषी प्रदूषणाची फारशी चर्चा होताना दिसत नाही. झालीच तर ती रासायनिक खतांचा बेसुमार वापर यापुरतीच मर्यादित असते. शेतीसाठी डिझेलचा वापर वाढत चालला आहे. डिझेलच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. अशा स्थितीत पर्यावरणपूरक शून्य लिटर डिझेलची ऊसशेती करण्याचा एक प्रभावी विचार पुढे आला आहे. त्याची कृतिशील अंमलबजावणी करण्याकरिता शेती अभ्यासक प्रताप चिपळूणकर गेले दशकभर प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयोगाला यश आले असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत शून्य लिटर डिझेलची ऊसशेती करण्याकरिता बळीराजा मोठय़ा संख्येने पुढे येत आहे. ऊसशेतीच्या जोडीने अन्य पिकांच्याबाबतही हा प्रयोग यशस्वी होतो आहे.
कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करण्याची पद्धत मागे पडली आहे. जमिनीच्या नांगरणीसाठी बलांचा वापर बराचसा कमी झाला आहे. याऐवजी ट्रॅक्टरचा वापर करून मशागत करण्याकडे कल वाढत चालला आहे. शेती करण्यासाठी बलाचा वापर करायचा तर त्याची निगा, खाद्य याची तजवीज करावी लागते. शिवाय विशिष्ट काळ काम केल्यानंतर त्याला विश्रांती देणे गरजेचे आहे. याउलट ट्रॅक्टरचा वापर एकदा का त्यामध्ये डिझेल टाकले की त्याचा अविश्रांत वापर दिवस-रात्र करता येतो. म्हणजे ट्रॅक्टर वापराकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. अर्थात यासाठी इंधन म्हणून डिझेलचा वापर अपरिहार्य ठरतो. हे चित्र एकीकडे असताना दुसरीकडे ट्रॅक्टर वापर टाळण्याबरोबरच डिझेल वापरालाही सुट्टी देण्याचा प्रयोग शेतीमध्ये प्रताप चिपळूणकर यांनी केला आहे.
अलीकडच्या काळात प्रदूषण, पर्यावरणाची चर्चा सार्वत्रिक बनली आहे. हवेतील कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनोक्साइड यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जागतिक तापमानवाढीचे संकट निर्माण झाले आहे. हवामानात बदल घडू आला असून त्याचे कृषी क्षेत्रावर दुष्परिणाम दिसू लागले आहेत. प्रदूषणाची चर्चा होत असताना त्याचा प्रामुख्याने झोत असतो तो उद्योगातून आणि वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरावर. पण या औद्योगिक क्षेत्राच्या पलीकडेही अन्य बरेच घटक प्रदूषणाला हातभार लावत असतात. त्यामध्ये कृषी क्षेत्राचाही समावेश आहे. शेतकरीसुद्धा पूर्वी पर्यावरणाचा गांभीर्याने विचार करीत नसे. किंबहुना हा महानगरीय लोकांच्या चच्रेचा विषय आहे असा त्यांचा दृष्टिकोन असे. शेतीतील अतिरिक्त डिझेल वापराचा पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ शकतो याची पुसटशी जाणीवही शेतकऱ्यांना नव्हती. डिझेलचा वापर मुख्यत्वेकरून मालवाहतूक, प्रवाशी वाहतूक यासाठी होताना दिसतो. यातील अनावश्यक वापर कमी करण्यासाठी मोठा वाव आहे. शेतीबाबतही असा विचार होण्याची आवश्यकता होती. चिपळूणकर यांनी हे काम केले. नांगरणीसाठी डिझेलचा जो वापर होते तो अत्यावश्यक गटातच धरला गेला. याला काही पर्याय असू शकेल का, असा विचारच कोणी केला नाही. म्हणूनच शून्य लिटर डिझेलवर शेती उत्तमरीत्या कशी करता येते आणि तीही नांगरून केलेल्या शेतीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कशी पिकते हे त्यांनी दाखवून दिले. सलग दहा वर्षांच्या अनुभवांती चिपळूणकर सांगतात की, जमीन नांगरून आपण डिझेल जाळून खनिज तेलातील कर्बाचे हवेत उत्सर्जन करतो. पूर्वीच्या काळी कधी तरी जमिनीत खनिज तेलरूपात साठविलेला कर्ब वायू हवेत सोडून हवेचे पर्यावरणीय नुकसान होते. आज पर्यावरणहानीची चर्चा होताना कृषी पर्यावरण फारशा गांभीर्याने कोणी घेत नाही, पण यामध्ये असलेले धोकेही लक्षात घेण्याची गरज आहे.
करवीरनगरीचे चिपळूणकर यांची शहराशेजारीच शेतजमिन आहे. तिथे त्यांनी या प्रयोगाला सुरुवात केली. शून्य मशागत करण्यावर त्यांनी भर दिला. चिपळूणकर यांच्या वाचनामध्ये ‘जर्नल ऑफ स्वाईन अ‍ॅण्ड वॉटर कॉन्झर्वेशन’ या नियतकालिकातील एक लेख आला. कृषीतील वेगवेगळ्या कामांतून हवेमध्ये कर्ब वायू किती प्रमाणात सोडला जातो याचा अभ्यास त्यांनी केला. कर्ब वायू मोजण्याचे परिमाण (टीजी सीओ २ इक्विव्हॅलेंट) असे आहे. त्यावरून त्यांच्या असे लक्षात आले की जमिनीची पूर्वमशागत केल्यामुळे सेंद्रीय कर्बाचे विघटन होऊन हवेत कर्ब वायूरूपात उडून गेल्याने जमिनीतील सेंद्रीय कर्बाचा साठा कमी होतो. आणि जमिनीच्या सुपीकतेची हानी होते. या व्यतिरिक्त मोठय़ा प्रमाणात हवेचे प्रदूषण होते. या दोन्ही गोष्टी शेतीला हानी पोहोचविणाऱ्या आहेत. अशा प्रकारे नाहक होणारी हानी टाळण्यासाठी त्यांनी शून्य डिझेलवर शेती करण्याचे नियोजन केले. प्रति एकर प्रति वर्ष किती डिझेलचा वापर होतो याचा अभ्यास त्यांनी केला. १९९० पासून शेतामध्ये डिझेलचा वापर कमी करण्यास सुरुवात केली. तेव्हा सुरुवातीच्या काळात दरवर्षी दहा ते पंधरा लिटर डिझेलचा वापर होत होता. सन २००५ पर्यंत यामध्ये ५० टक्क्यांची बचत करून डिझेलचा वापर निम्म्यावर आणला. त्यानंतर नांगरणी बंद केल्यानंतर हाच वापर अवघ्या एक ते दोन लिटरवर आणला आणि गतवर्षीपासून म्हणजे सन २०१५ पासून शून्य लिटर डिझेलचा वापर होत आहे.
शून्य लिटरच्या वापरामुळे सेंद्रीय खत तयार करणे व रासायनिक नत्रयुक्त खत तयार करणे यामुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात आणणे शक्य झाले असल्याचा त्यांचा अभ्यास आहे. याचे फायदे अनेक दिसून आले. जमिनीची सुपीकता वाढली. पाण्याचा वापर कमी झाला. उत्पादनात वाढ होण्याबरोबरच दर्जाही सुधारला. खतांचा वापर कमी झाला. पर्यावरणपूरक शेती होऊ लागली. इतके सारे फायदे दिसू लागल्याने या भागातील शेतकरी याचा अवलंब करू लागला. चिपळूणकर यांनीही दहा वर्षांच्या अभ्यासाचा फायदा शेतकऱ्यांचा व्हावा यासाठी या प्रयोगावर आधारित पुस्तक लिहिले. त्याची सहावी आवृत्ती आता विकली जात आहे. याशिवाय खेडोपाडी, बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेकडो व्याख्यानेही दिली आहेत.
दयानंद लिपारे – dayanandlipare@gmail.com

India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली
How Cold Weather Impacts Men's Sexual Health
हिवाळ्यात पुरुषाच्या लैंगिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञांनी सांगितले, कशी घ्यावी काळजी?
Story img Loader