आंब्याचे उत्पादन घेण्यात रत्नागिरी आणि देवगडची मक्तेदारी असली तरी रायगड जिल्ह्य़ातही उच्च दर्जाच्या आंब्याचे उत्पादन घेतले जाऊ शकते, अलिबाग तालुक्यातील डॉ. संदेश पाटील यांना भेट दिल्यावर याचा प्रत्यय येतो. अधुनिक तंत्रज्ञानानाचा वापर करत त्यांनी भरघोस आणि दर्जेदार आंबा उत्पादनाचे कसब आत्मसात केले आहे. औद्योगिकीकरणाच्या रेटय़ात रायगडातील शेतीसमोर आव्हाने उभी राहिली असताना त्यांनी शाश्वत शेतीचा मार्ग दाखवून दिला आहे.

व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या संदेश पाटील यांना लहानपणापासून शेतीची आवड होती. शेतीचे बाळकडू त्यांना वडिलांकडून मिळाले होते. यातूनच कोकणातील भात शेतीला आंबा पीक हा चांगला पर्याय ठरू शकतो हे त्यांच्या लक्षात आले. शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघण्याचे त्यांनी ठरवले. आपल्या छंदाला व्यवसायिक स्वरूप देऊन नशीब आजमावण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

आंबा पीक लागवडीचा शास्त्रशुद्ध अभ्यास त्यांनी सुरू केला. जगभरात आंबा लागवडीत होणाऱ्या प्रयोगांची माहिती मिळवली. २००१ साली डॉक्टरी पेशा काहीसा बाजूला सारत त्यांनी आपला मोर्चा शेती आणि फळबाग लागवडीकडे वळवला. २४ एकर जागेत १२०० कलमांची लागवड केली. कलमांच्या संवर्धनासाठी नवनवीन प्रयोग सुरू केले. जसजशी कलमांची संख्या वाढत गेली तसतशी पाण्याची कमतरता भासू लागली. उपलब्ध पाण्यात कलमांचे पोषण करणे गरजेच होते. त्यामुळे पाण्याची बचत व्हावी म्हणून सुक्ष्म सिंचन प्रणालीचा वापर सुरू केला. योग्य खतांचे प्रमाण, नियमित औषधांच्या फवरण्या यामुळे कलमांची जोमाने वाढ झाली. फळधारणा होऊ लागली. चांगल्या दर्जाच्या आणि बाजारात लवकर येणाऱ्या आंब्याला चांगला भाव मिळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे फळधारणा लवकर होण्याचे तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केले.

आज जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात त्यांच्या आंब्याच्या पेटय़ा बाजारात दाखल होतात. या पेटय़ांना २ ते ३ हजार रुपये डझन दर मिळतो. जानेवारी ते जून या कालावधीत ते दरवर्षी १० ते १२ हजार आंब्यांच्या पेटय़ा बाजारात पाठवतात. अमेरिका, युरोप, अरब राष्ट्रात त्यांचा आंबा निर्यात केला जातो. आंबा पिकवण्यासाठी रॅपिनग चेंबरसारखे तंत्रज्ञान ते वापरतात. त्यामुळे आंब्याचा दर्जा कायम राखला जातो आणि आंब्याला चांगला दरही मिळतो आणि चांगला आíथक फायदाही मिळतो.

शेती क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यात कोकण कृषी विद्यापीठाकडून दिला जाणारा कुबल पुरस्कार, भारतीय कृषक समाजाकडून दिला जाणारा कृषीरत्न डॉ पंजाबराव देशमुख मेमोरीअल अवॉर्ड, आणि महाराष्ट्र शासनाच्या फळबाग लागवड क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या उद्यान पंडित पुरस्काराचा समावेश आहे. देशविदेशातील वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. २००८ साली त्यांनी राज्य शासनाकडून चीनमध्ये शेती अभ्यास दौरा केला आहे.

सुरुवातीच्या काळात आंबा लागवडीसाठी लागणारा खर्च निघावा यासाठी त्यांनी भाजीपाला लागवड आंतरपीक लागवड केली. भाजीपाल्याला मुंबईत चांगली मागणी असल्याने आíथक भार हलका झाला. शेतकरी एकापिकावर समाधानी राहिले तर आíथक उन्नती साधू शकत नाहीत. काळानुरूप आणि मागणीनुसार त्यात बदल होणे गरजेचे असते. अधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात केले पाहिजे असे मत ते व्यक्त करतात. औद्योगिकीकरणाच्या रेटय़ात रायगडातील शेतीसमोर आव्हाने उभी राहिली असताना त्यांनी शाश्वत शेतीचा मार्ग दाखवून दिला आहे.

meharshad07@gmail.com

Story img Loader