ज्ञानेश भुरे

अदिती स्वामी

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

वयाच्या दहाव्या वर्षी तिरंदाजी या खेळाची स्वत:हून निवड करणारी अदिती.  वयाच्या १२ वर्षांपासूनच विविध स्पर्धामध्ये लक्ष्याचा अचूक वेध घेत सुवर्ण, रौप्य, कांस्यपदकांवर आपली मोहर उठवत आहे. नुकत्याच सप्टेंबरमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक सुवर्ण पदक आणि वैयक्तिक कांस्यपदक पटकावणारी, आणि तिरंदाजी या प्रकारातील भारताची पहिली महिला जागतिक विजेती ठरलेली यंदाची दुर्गा आहे, अदिती स्वामी.

आंतरराष्ट्रीय स्तरावर वयाच्या १७ व्या वर्षी जागतिक युवा विजेतेपद, पाठोपाठ वरिष्ठ गटातील जागतिक विजेतेपद आणि लगोलग आशियाई सुवर्णपदक पटकावणारी अदिती गोपिचंद स्वामी. कठोर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकं घवघवीत यश तेदेखील अवघ्या चार महिन्यांत मिळवणारी ती एकमेव. तिरंदाजी या प्रकारातील भारताची पहिली महिला जागतिक विजेती ठरलेली यंदाची दुर्गा आहे, अदिती स्वामी.  

सातारा जिल्ह्यातील शेरेवाडी एक छोटंसं गाव. वडील गोपीचंद स्वामी गावातील प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि आई शैला या ग्रामसेविका. आदितीला चांगलं आणि योग्य शिक्षण मिळावं यासाठी दोघांनी कधी विश्रांती घेतली नाही. अदितीला सहाव्या वर्षांपर्यंत घरातच ठेवून बाहेरून कडी लावून ते दोघं कामाला जायचे. त्या लहानग्या अदितीच्या मनावर आई-वडिलांचे कष्ट खोलवर रुजले. रोज घरातूनच बाहेर खेळणाऱ्या मुलांना पाहताना तिच्यातली खिलाडूवृत्ती जागी झाली आणि तिनं वडिलांकडे खेळण्याची इच्छा व्यक्त केली. वडिलांचा शिक्षकी पेशा. त्यांनी तिला सांगितलं, ‘अदिती, नुसतं खेळायचं म्हणून खेळू नकोस, तर काहीतरी ठोस घडवण्यासाठी खेळ.’

आपल्याला कुठला खेळ खेळायचा आहे याचा निर्णय अदितीने स्वत:हून घेतला आणि तोही वयाच्या दहाव्या वर्षी. एक दिवस वडिलांबरोबर शाहू स्टेडियमवर गेली असताना तिथे खेळल्या जात असणाऱ्या अनेक खेळांपैकी तिरंदाजी खेळाने तिचे लक्ष वेधून घेतलं. वडिलांनी त्याच वेळी अदितीची जबाबदारी मैदानावर असणाऱ्या कोच प्रवीण सावंत यांच्याकडे सोपवली. ‘आजपासून ही तुमची मुलगी,’ असं सांगून जणू वडिलांनी आपल्या भावनाच व्यक्त केल्या आणि वडिलांचे ते शब्द दहा वर्षांच्या अदितीच्या मनावर कोरले गेले.  खेळ तर निवडला, परंतु त्यासाठी लागणारा बो(बाण)आणि धनुष्य विकत घेणं सोपं नव्हतं. त्या अर्थी तो महागडा खेळ. अदितीच्या मध्यमवर्गीय आई-वडिलांना त्यासाठी कर्ज काढावं लागलं. या खर्चानं अदिती काहीशी हबकून गेली, पण खचली नाही. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिनं यश मिळवायला सुरुवात केली. आजही अदिती तो पहिला बाण आणि धनुष्याला आई- वडिलांचा आशीर्वाद मानते. तो लाभला म्हणून मी उभी आहे ही आजही तिची भावना आहे.

वयाच्या दहाव्या वर्षी शिकायला सुरुवात केल्यावर अदितीने तिरंदाजीचे कौशल्य फारच जलदगतीनं आत्मसात केलं. आई-वडिलांशिवाय एकटय़ानं घरात राहायची सवय झाल्यामुळे लहानपणापासूनच अदिती धाडसी आणि मनाने कणखर बनली होती. या दोन गुणांचा अदितीला तिरंदाज घडताना खूप फायदा झाला. प्रवीण सरदेखील अदितीच्या चिकाटीने कधी कधी चकित व्हायचे. या वयात इतका उत्साह, इतकी ऊर्जा कुठून येत असावी या मुलीत, असा प्रश्न सरांना पडायचा. सरांनी तिला एकदा विचारलं तेव्हा तिचं उत्तर बोलकं होतं. ती म्हणाली,‘‘आई-वडिलांनी मला मोठं केलं, आता मला आई-वडिलांना मोठं करायचं आहे. त्यांना कुठलाही त्रास द्यायचा नाहीए.’’ या वाक्यानं जणू प्रवीण सरांनाच प्रेरणा मिळाली आणि त्यांनी सर्वस्व पणाला लावून तिला कसून प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली. परिणामस्वरूप, वयाच्या १४ व्या वर्षी अदितीने शालेय स्पर्धेत रौप्यपदक मिळविले.

पुढच्याच वर्षी अदिती याच शालेय स्पर्धेत सुवर्णपदक विजेती ठरली. दोन वर्षांनी ‘खेलो इंडिया’ स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्याच स्पर्धेत अदितीने सुवर्णपदकाला गवसणी घातली आणि तिच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. ही एक स्पर्धा अशी होती की ज्यानंतर अदितीने मागे वळून बघितलेच नाही. परदेशातही जाऊन प्रशिक्षण घेतले. कुमार गटातील प्रत्येक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अदितीच्या नावावर कधी सुवर्ण, तर कधी रौप्यपदक झळकलंच. अदितीचा झपाटा इतका होता, की राष्ट्रीय संघटनेने कुमारवयातच अदितीला वरिष्ठ गटातून खेळण्यासाठी भारतीय संघात निवडले. अदितीवर टाकलेला प्रत्येक विश्वास तिने सार्थ करून दाखवला. वरिष्ठ गटातून खेळायची संधी मिळाली, तीदेखील विश्वचषक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून.

जागतिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत यश मिळविले होते. पण, सुवर्णपदक हुलकावणी देत होते. जागतिक पातळीवर अदितीने त्या हुलकावणी देणाऱ्या सुवर्णपदकाचा वेध घेतला. एकदा नाही,तर तीन वेळा आणि तोदेखील चार महिन्यांत. अदिती म्हणते, ‘‘हे सगळे त्या अडीच मिनिटांसाठी. म्हणजे जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यानंतर पदक वितरण सोहळय़ात खेळाडू विजयमंचावर उभे असताना विजेत्या खेळाडूंच्या देशाच्या राष्ट्रगीताची धून वाजते. परदेशात ही धून कानी पडते तेव्हा मन अभिमानानं भरून येतं आणि आणखी मोठं काम करण्याची प्रेरणा मिळते.’’वयाच्या १७ व्या वर्षी इतकी मोठी कामगिरी करणाऱ्या अदितीची भावी कारकीर्द अशीच उजळून सोनेरी व्हावी यासाठी खूप शुभेच्छा..

अदितीची कामगिरी 

 २०१८ – राष्ट्रीय शालेय तिरंदाजी रौप्यपदक 

 २०१९ – राष्ट्रीय शालेय तिरंदाजी सुवर्णपदक 

 २०२१ – खेलो इंडिया  युवा स्पर्धा सुवर्णपदक  

२०२२ – वरिष्ठ राष्ट्रीय रौप्यपदक 

 २०२२ – राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुवर्णपदक 

 २०२२ – कुमार गटाच्या विविध आशिया  चषक स्पर्धेत रौप्य, सुवर्ण

 २०२३ जुलै – जागतिक युवा विजेतेपद 

 २०२३ ऑगस्ट – वरिष्ठ जागतिक विजेतेपद   २०२३ सप्टेंबर – आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक सुवर्ण, वैयक्तिक कांस्यपदक

मुख्य प्रायोजक :  उषा काकडे ग्रुप

सहप्रायोजक :  मे. बी. जी. चितळे डेअरी

 टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड

 उज्ज्वला हावरे लेगसी

पॉवर्ड बाय :  केसरी टुर्स 

 व्ही एम मुसळूणकर ज्वेलर्स

 ओ एन जी सी 

 दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी लि.

Story img Loader