अमरावती : शहराच्या मध्यभागी असलेले श्री अंबादेवीचे मंदिर प्राचीन असून स्वयंभू मानले जाते. ही मूर्ती वालुकामय पाषाणाची असून पद्मासनात आहे. एक हजार ते १५०० वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना झाली असावी, असे संदर्भ आढळतात. रुक्मिणी हरणाशीही मंदिराचा संबंध जोडण्यात येतो. त्यावरून याचे प्राचीनत्व लक्षात येते. अमरावतीपासून ३० किमी अंतरावरील कौंडण्यपूर ही त्या वेळी विदर्भाची राजधानी होती. भीष्मक राजा यांचे येथे राज्य होते. भीष्‍मकाने त्‍यांची मुलगी रुक्मिणीचे स्‍वयंवर ठरवले होते. रुक्मिणीने श्रीकृष्‍णासोबत विवाह करण्‍याचा निश्‍चय केला होता, मात्र तिच्‍या भावाने शिशुपालासोबत रुक्मिणीचा विवाह निश्चित केला होता. त्‍यामुळे रुक्मिणीने श्रीकृष्‍णाला गुप्‍तपणे संदेश पाठवून हरण करण्‍यास सांगितले होते. रुक्मिणी सख्यांसह अंबादेवीच्या दर्शनासाठी आली असताना भगवान श्रीकृष्णाने तिचे हरण केले अशी आख्यायिका आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ठाकूर बंधूंनी २ कोटी ४१ लाख रुपये जमा केले; ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात १२ कोटींचे फसवणूक प्रकरण

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पत्रिका श्री अंबादेवीला आली होती याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. इ.स. १८७० चे ‘गॅझेटियर फॉर दी हैद्राबाद असाईन्ड डिस्ट्रिक्ट’ तसेच इ.स. १९११ व १९६८ च्या अमरावती जिल्हा गॅझिटियरमध्ये याच्या पुरातनत्वाचा उल्लेख आहे. ‘सेटलमेंट रेकॉर्ड’मध्येही हे मंदिर एक हजार ते १५०० वर्षांपूर्वीचे पुरातन असल्याचा पुरावा आढळतो. इ.स. १८६३-१८६४ सालापर्यंत श्री अंबादेवीची मूर्ती केवळ एका चबुतऱ्यावर होती. मंदिर नव्हते. मात्र कालांतराने तेथे छोटे हेमाडपंती मंदिर बांधण्यात आले. त्या काळी वस्ती अमरावतीच्या परकोटाच्या आतच होती. त्यामुळे हे मंदिर जुन्या अमरावतीच्या वेशीवर जंगलात होते. मंदिराच्या शिखराचे बांधकाम इ.स. १८९६ मध्ये करण्यात आले.

हेही वाचा : रेल्वेत मिळणार नवरात्री थाळीची मेजवानी; वाचा कुठे आणि कसे ते?

श्री अंबादेवीची मूर्ती आसनावर विराजमान असून पद्मासनात आहे. तिचे दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवलेले आहेत. दोन्ही नेत्र अर्धोन्मिलित असून शांत आणि गंभीर अशी ध्यानस्थ मुद्रा धारण केलेली आहे. नानाविध षोड्शोपचार पूजा झाल्यावर सुवर्णादि अलंकार, सोन्याचा मुलामा चढविलेला मुखवटा आणि सर्व प्रकारचे अलंकार चढवून विविध पुष्पांची आरास करून देवीला सजविल्यानंतर तिचे देखणे व प्रसन्न रूप भक्तांना आनंदित करते. सोन्याचा मुलामा चढविलेला चांदीचा मुखवटा ९० तोळ्यांचा असून तो १९०५ मध्ये बनविला आहे. महापूजेनंतर आरती व दुपारी १२ वाजता महानवेद्य होतो. पुरणपोळी व खीर यांचा नवेद्य रोज असतो तसेच तांबूलाचा महानवेद्यही होतो. भक्तांना प्रसाद वाटण्यात येतो.

श्री अंबादेवीच्या गर्भगृहाला लागूनच डाव्या बाजूला भैरवनाथाची मूर्ती आहे. उजव्या बाजूला भिंतीवरच्या कोनाड्यात संगमरवरी श्री गणेशाची मूर्ती आहे. तिच्या उजवीकडे आणखी एक गर्भगृह असून त्यात श्री महादेवाची मोठी पिंड आहे. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या दिवसांना भक्तांची गर्दी असते. मंगळवारी लहानशी यात्राच भरते. नवरात्र महोत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा होतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते आणि सप्तशतीच्या पाठाने अष्टमीला यज्ञ होतो, हवन करतात. हा उत्सव नऊ दिवस चालतो. या काळात श्री एकवीरा देवी प्रतिनिधिक स्वरूपात या मंदिरात उपस्थित असते असे मानतात. त्यामुळे हवनासाठी दोन स्थंडिले तयार करतात. दोन स्थंडिलांपैकी एके ठिकाणी श्री अंबादेवी संस्थानाचे मानकरी व दुसरे ठिकाणी एकवीरा देवीचे मानकरी हवन करतात. दशमीला म्हणजे विजयादशमीचे दिवशी श्री अंबादेवीची पालखी सीमोल्लंघनासाठी दसरा आसनाजवळ जाते.

हेही वाचा : वीज दुरुस्तीसाठी खांबावर चढला आणि क्षणात कोळसा झाला, नेर येथील घटनेने खळबळ

ही पालखी संपूर्ण चांदीची असून आठही बाजूला चांदीचे खांब आहेत. वर सुवर्णाचा कळस असतो. पालखीसोबत दोन्ही मंदिराचे मानकरी व विश्वस्त असतात. समोर वाद्यवृंद असतो. फार मोठ्या संख्येने लोक असतात. ही पालखी दुपारी चार वाजता सीमोल्लंघनाला निघते. मंगलवाद्ये आणि चौघडा आणि तुतारीही असते. रस्त्यात अनेक भक्त पालखीचे स्वागत सुवासिनींच्या हस्ते ओवाळून करतात. सीमोल्लंघनाच्या रात्री आरती होऊन पालखी परत निघते. मंदिरात आल्यावर दोन्ही देवींची पूजा व आरती होते. अश्विन वद्य दोन ते कार्तिक वद्य दोन या काळात मंदिरात काकड आरती होते. दरवर्षी चत्र महिन्यात शतचंडीचे पाठ रामनवमी महोत्सवात करतात. अष्टमीला हवन होऊन पूर्णाहुती देण्यात येते.

मराठीतील सर्व लोक उत्सव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati ambadevi temple story of lord krishna abducted rukmini mma 73 css
Show comments