नागपूर : नागपुरात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनी विविध मंडळ समूह मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करतात. याप्रसंगी महाप्रसाद आणि भोज दनासाठी मोठी गर्दीही होते. या आनंदाच्या क्षणी भाविकांना वीज अपघातापासून वाचवण्यासाठी आवश्यक काय काळजी घ्यावी हे महावितरणचे नागपूरचे उप मुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांनी सांगितले आहे.
नागपुरात सार्वजनिक मंडळांकडून नवरात्रातील रोषणाई, देखावे, मंडप, गरबा, महाप्रसाद, रावण दहन तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यात मोठ्या प्रमाणावर रोषणाई, भोजनदान व इतर कार्यक्रमही घेतले जातात. त्यासाठी वीज जोडणी आवश्यक आहे. ही अधिकृत वीज जोडणी घेतांना मंडळांनी रोषणाई आणि मिरवणुकीतील देखाव्यांचा परिसरातील विद्युत तारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही याची खबरदारी घ्यावी. गरबा, जागर आदीचे आयोजन विद्युत यंत्रणेपासून लांब अंतरावर करावे.
हेही वाचा >>> यवतमाळ : दुर्गोत्सवात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’, यवतमाळातील अंतर्गत वाहतुकीत मोठे बदल
दसऱ्यातील रावण दहन हे मोकळ्या मैदानात आणि वीज यंत्रणेपासून लांब करावे. फटाक्यांची आतषबाजी करताना आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना कराव्या. वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र ‘न्यूट्रल’ घ्यावे. जवळच्या वीजखांबावरून किंवा वीजवाहिन्यांवर आकोडे टाकून वीजपुरवठा घेऊ नये. तार किंवा केबल विजेचा भार पेलण्यास सक्षम असल्याची खातरजमा करावी. तुटलेली किंवा खराब तार वापरू नये, प्रमाणित ‘इन्सुलेशन टेप’ वापरावा, असेही विटनकर यांनी सांगितले.