मुंबई: शारदीय नवरात्रोत्सव रविवारपासून सुरू होत आहे. यानिमित्त मुंबईमधील महालक्ष्मी मंदिर सज्ज झाले असून भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर महालक्ष्मी मंदिर परिसरावर सीसी टीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर असणार आहे.
येत्या रविवार, १५ ऑक्टोबर रोजी मंदिरामध्ये पहाटे ३ ते ६ दरम्यान घटस्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त भाविक मोठ्या संख्येने महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी येत असतात. ललिता पंचमी, अष्टमी व सुट्टीच्या दिवशी भाविकांची संख्या तीन लाखांवर जाते. वृद्ध, अपंग व गर्भवती स्त्रियांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच व्हीआयपी पासधारकांनाही सुरक्षा रक्षक व्यवस्थेतून जावे लागणार आहे.
हेही वाचा… मुंबई: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या तिकीटांच्या नावाने लाखोंंची फसवणूक
नवरात्रौत्सवामध्ये मंदिर पहाटे ५.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत खुले राहणार आहे. मंदिराच्या आवारात व हाजी अलीपर्यंतच्या परिसरात सुमारे ६२ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ५० सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, मंदिरामध्ये एक रुग्णवाहिका व सकाळ-संध्याकाळ १२ डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले आहे, असे महालक्ष्मी मंदिराचे मुख्य व्यवस्थापक नितीन कांबळी यांनी सांगितले.
दरम्यान, वाहतुकीच्या व्यवस्थेसाठी ताडदेव वाहतूक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ३० पोलिसांचा ताफा कार्यरत असणार आहे. तसेच बेस्टतर्फे भाविकांसाठी खास बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने नवरात्रोत्सवात भाविकांनी आपल्या बरोबर मोठ्या अवजड बॅग आणू नये असे खास आवाहन महालक्ष्मी मंदिरातर्फे आणि गावदेवी पोलिस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.