ठाणे: Navratri 2023 Marathi News शहरातील जांभळी नाका येथील मुख्य बाजारपेठेत नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येला नागरिकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. फूले आणि पूजा साहित्याबरोबरच गरब्यासाठी पारंपरिक कपडे खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी झाली होती. या गर्दीमुळे बाजारपेठ परिसरात काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पुजा साहित्य, फुले, देवीचे मुखवटे, दागिने, साड्या, चनियाचोली, घागरा, दांडिया असे विविध नवरात्रौत्सवासाठी लागणाऱ्या साहित्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत.
हे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी शनिवारी सायंकाळी बाजारात मोठी गर्दी केली होती. यामुळे बाजारपेठ परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. ठाणे शहरातील जांभळीनाका, नौपाडा तसेच स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात फेरीवाले घटस्थापनेसाठी लागणाऱ्या टोपल्या, सुगड, माती, देवी मुखवटे, दागिने, नारळ, धान्य असे सर्व साहित्य विक्रीसाठी घेऊन बसले होते. तसेच जांभळी नाका बाजारपेठेला लागून असलेल्या फुल बाजारात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. घटस्थापनेसाठी नऊ दिवस झेंडूच्या फुलांची माळ बनवून ती घटावर सोडण्यात येते.
हेही वाचा >>> Navratri 2023: नवरात्रीच्या नवरंगांना नवरंगीत दागिन्यांची जोड
यामुळे या कालावधीत झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. हे सर्व साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची सायंकाळी ५ नंतर बाजारात गर्दी होऊ लागली. तसेच नवरात्रौत्सवात रास- गरबा खेळण्याची परंपरा गेले वर्षानुवर्षांची आहे. अलिकडे या रास-गरब्याला वैविध्य प्राप्त झाले आहे. अनेकजण उत्साहाने रास-गरब्यात सहभागी होत असतात. त्यामुळे बाजारात रास-गरब्यासाठी विविध प्रकारच्या घागरा, चनियाचोली, जॅकेट, कुर्ता, दुपट्टा सह त्यावर शोभून दिसतील असे ॲाक्साईडचे दागिने विक्रीसाठी दाखल झाले आहेत. हे खरेदी करण्यासाठी अनेकजण बाजारात आले होते.