सध्या सर्वत्र दिवाळीची तयारी सुरू आहे. वर्षातला सर्वात मोठा सण अशी ओळख असणारा हा सण साजरा करण्यासाठी लहान मुलांपासून जेष्ठ मंडळींपर्यंत सर्वचजण उत्सुक असतात. फराळाचे निरनिराळे पदार्थ, सर्वत्र करण्यात आलेली रोषनाई यांमुळे या सणाचे विशेष आकर्षण वाटते. यातील लहान मुलांची आवडती गोष्ट म्हणजे फटाके. जास्तीत जास्त फटाके घेऊन देण्याचा हट्ट सर्वच लहान मुलं करतात. याबद्दल पालकांना मात्र फटाक्यांमुळे मुलांना इजा तर होणार नाही ना याची चिंता सतावत असते, त्यामुळे फटाके विकत घेण्याचे टाळले जाते. पण मुलांच्या हट्टापुढे अखेर पालकांना माघार घ्यावी लागते आणि फटाके खरेदी केले जातात.
मुलं फटाके वाजवत असताना पालकांनी किंवा घरातील इतर मोठ्या सदस्यांनी सतत त्यांच्यासोबत असणे आवश्यक असते. कारण फटाके फोडताना लहान मुलांकडुन वीजेचे कनेक्शन किंवा गॅस अशा ठिकाणी चुकून फटाके फोडण्यात आले तर मोठा अनर्थ होऊ शकतो. म्हणून मोठ्यांनीच याबाबत सावधान राहणे, लहान मुलांना मार्गदर्शन करणे आवश्यक असते. फटाके फोडताना आणखी एक चिंता सतावते ती म्हणजे, फटाके फोडताना लहान मुलांना भाजु शकते, किंवा त्यांना चटका बसू शकतो. असे झाल्यास लगेच कोणते घरगुती उपचार करावे जाणून घ्या.
फटाके वाजवताना भाजल्यास हे घरगुती उपचार करा
थंड पाणी
भाजलेल्या ठिकाणी थंड पाणी टाका, नंतर मऊ कापड थंड पाण्यात भिजवून त्यावर लावा. यामुळे जळजळ होणार नाही. भाजलेल्या ठिकाणी बर्फ लावणे टाळा, कारण त्यामुळे रक्त गोठू शकते.
खोबरेल तेल
एका वाटीत थोडे खोबरेल तेल काढून ते थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर भाजलेल्या ठिकाणी हे थंड खोबरेल तेल लावा.
कोरफड
भाजलेल्या ठिकाणी कोरफडचा गर लावा. यामुळे भाजलेली त्वचा लवकर बरी होते.
आणखी वाचा : सोन्या-चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स; दिवाळीत दिसतील अगदी नव्यासारखे!
बटाटा
भाजलेल्या जागेवर बटाटा किसून लावल्याने जळजळ कमी होण्यास मदत मिळेल.
तुळशीचा रस
तुळशीचा रस भाजलेल्या ठिकाणी लावल्यास त्या जागेला थंडावा मिळण्यास मदत मिळेल.
लहान मुलांना फटाके वाजवताना भाजले तर तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता. जर घरगुती उपाय वापरून जळजळ कमी होत नसेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.