Lakshmi Pujan Shubh Muhurat : दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन त्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण व्हावा, या उद्देशाने दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी यांचा विवाह झाल्याची पौराणिक कथा सुद्धा आहे. याशिवाय या दिवशी राम वनवासातून घरी परतले होते त्यामुळे दिवाळीला दिवे लावून आनंद साजरा केला जातो
भारतीय संस्कृतीत दिवाळी आणि दिवाळीतील पाच दिवसांना विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन हा त्यातील एक दिवस. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी वैशिष्टयपूर्ण पूजा असते. या दिवशी लक्ष्मीची पूजा आराधना केली जाते.शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. पण तुम्हाला यंदाच्या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त माहिती आहे का? आज आपण त्या विषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.
लक्ष्मीपूजन मुहूर्त –
भारतीय पंचागात शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व असते. कोणतेही शुभ कार्य शुभ मुहूर्तावर करण्याची परंपरा आहे.पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे यांनी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीपूजनाचे दोन शुभ मुहूर्त आहे.
१. दुपारी १:४२ ते २:४८ पर्यंत
२. संध्याकाळी ५.५५ ते ८:२८ पर्यंत
पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले, “लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सूर्यास्तानंतर २ तासांच्या काळात खालील मंत्र म्हणून लक्ष्मी इंद्र पूजन करावे.”
हेही वाचा : Diwali 2023 : केव्हा आहे धनत्रयोदशी? जाणून घ्या पूजा, मुहूर्त आणि सणाचे महत्त्व
लक्ष्मीपूजा मंत्र आणि इंद्रपूजा मंत्र खालीलप्रमाणे-
लक्ष्मीपूजा मंत्र – ‘नमस्ते सर्वदेवानां वरदाऽसि हरिप्रिये । या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।। धनदायै नमस्तुभ्यं निधिपद्माधिपे शुभे । भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादि संपदः ।।’
इंद्रपूजा मंत्र – ‘ऐरावत समारूढो वज्रहस्तोमहाबलः । शतयज्ञाभिधो देवस्तस्मादिन्द्राय ते नमः ।।’
लक्ष्मीपूजन का करतात?
अश्विन वद्य अमावस्येला लक्ष्मी पूजन करण्याची परंपरा आहे. पण तु्म्हाला माहिती आहे का लक्ष्मीपूजन का केले जाते. या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते, अशी आख्यायिका आहे.
लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी रहावे, त्यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते.याच कारणामुळे व्यापारी लोकही यादिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात.