आरती कदम
सुशीला साबळे
वयाच्या १० व्या वर्षांपासून कचरा वेचून पोट भरणाऱ्या सुशीला यांनी स्वत:ला वाढवत सभाधीटपणा आणि स्वयंस्फूर्तीच्या जोरावर सात देशांत पर्यावरणरक्षकाच्या भूमिकेत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. मुंबईत ‘परिसर भगिनी विकास संघटने’च्या ३५०० स्त्रियांचं नेतृत्व करणाऱ्या, अनेक इमारतींमध्ये जाऊन कचऱ्यांच्या वर्गीकरणाची माहिती देऊन सर्वसामान्य लोकांना पर्यावरणाचे धडे देणाऱ्या यंदाच्या दुर्गा आहेत, सुशीला साबळे.
‘‘एक हजार किलो कागद रीसायकल केला, तर १६ झाडं कापण्यापासून आपण वाचवू शकतो, तेव्हा कृपया सगळय़ांनी सुक्या कचऱ्यातच कागद टाका, जे गोळा केले जातील आणि त्यांचं पुनर्उत्पादन होईल..’’ कचरावेचक सुशीलाबाई तळमळीने सगळय़ांना सांगत असतात, कारण आता त्यांची भूमिका केवळ कचरावेचक अशी न राहता ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पर्यावरणरक्षक’अशी झाली आहे. १० वर्षांच्या असल्यापासून कचरा वेचत जगणाऱ्या सुशीलाबाई आतापर्यंत सात देशांत ‘पर्यावरण रक्षणात कचरावेचकाची भूमिका’ यावर व्याख्यान देऊन आल्या आहेत. ‘परिसर भगिनी विकास संघटने’च्या ३,५०० स्त्रियांचं नेतृत्व करणाऱ्या, वेगवेगळय़ा इमारतींमध्ये जाऊन तेथील लोकांना सुक्या-ओल्या कचऱ्याच्या विभागणीचं महत्त्व पटवून देणाऱ्या ‘कचरावेचक ते पर्यावरणरक्षक’ ठरलेल्या यंदाच्या दुर्गा आहेत, सुशीला साबळे.
जालना जिल्ह्यातल्या शिरनेर गावातल्या सुशीलाबाई आई-वडील आणि आपल्या आठ भावंडांसह राहायच्या; परंतु १९७२ ला जो दुष्काळ पडला, त्यानं त्यांच्यासह अनेक कुटुंबांचं कंबरडं मोडलं. घरातलं होतं नव्हतं ते संपलं, तेव्हा आईनं गावातल्या इतरांबरोबर मुंबईला जायचा निर्णय घेतला. कचरा वेचून पोट भरण्याइतपत पैसे मिळू शकतात हे लक्षात आलं आणि घाटकोपर परिसरांतील जागृतीनगरमध्ये चटया, बांबूंची झोपडी उभारली गेली. अर्थात त्यात ना पाणी होतं, ना दिवे. सगळय़ांचीच स्थिती हलाखीची. एके दिवशी आईनंच गोणपाट हातात दिलं आणि लहानगी सुशीला निघाली तिच्याबरोबर कचरा वेचायला! दिवसभर कचरा वेचून हातात ३-४ रुपये मिळायचे. मग बाजूच्याच दुकानात जाऊन ज्वारीचं पीठ, बेसन, थोडं तेल, कांदे असं काहीबाही आणून आला दिवस ढकलायचा. कधी कधी तर तितकेही पैसे मिळत नसत. मग काय, काही दिवस उधारीवर, तर काही दिवस चक्क भीकही मागावी लागली भावंडांसाठी; पण मानी सुशीलाबाईंनी कष्टालाच आपलंसं केलं.
दरम्यान, १५ व्या वर्षी भावानं त्यांचं लग्न लावून दिलं. पण लवकरच नवऱ्याने नोकरी सोडली. दारू प्यायला लागला. आणि सुशीलाबाईंवर हातही उचलू लागला. नुसतं घरी बसून खाणाऱ्या नवऱ्याकडे राहायचं नाही, असं ठरवून आईकडे परतल्या, तेव्हा त्या २० वर्षांच्या होत्या. आईबरोबर रोज कचरा वेचायला जाणं सुरू होतंच. दरम्यान त्यांना मुलगा झाला (जो आज बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय करतोय.) आणि आयुष्याला मोठं वळण देणारी घटना घडली- ती म्हणजे, त्यांच्या जागृतीनगरमध्ये ‘स्त्रीमुक्ती संघटने’चे कार्यकर्ते आले. त्यांनी तिथल्या बायकांची संघटना बांधायला सुरुवात केली, बचतगट तयार केले; ‘स्त्रीमुक्ती संघटने’तर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘परिसर भगिनी विकास संघटने’त या स्त्रिया एकत्र येऊ लागल्या. कुणी प्रबोधनपर भाषण केलं, माहिती दिली की शेवटी आभार प्रदर्शनाचं काम सुशीलाबाई उत्स्फूर्तपणे आपल्या अंगावर घेत. त्यांचं मुद्देसूद बोलणं सगळय़ांना आवडत गेलं आणि २००१ मध्ये त्यांची निवड ‘लीडरशिप ट्रेिनग’साठी केली गेली. मुळातच नेतृत्वगुण असणाऱ्या सुशीलाबाईंचं व्यक्तिमत्त्व घासूनपुसून लखलखीत होऊ लागलं. कचरा वेचणं हळूहळू बंद झालं, याचं कारण बचत गटांची फेडरेशन असलेल्या ‘परिसर भगिनी विकास संघा’च्या अध्यक्ष म्हणून त्या २००४ मध्ये निवडून आल्या. त्याअंतर्गत इतर स्त्रियांना प्रशिक्षण देणं, मार्गदर्शन करणं सुरू झालं. परिसरातील प्रत्येक बििल्डगमध्ये जाऊन तिथल्या सेक्रेटरींना भेटून रहिवाशांसाठी ओल्या-सुक्या कचऱ्याच्या विभागणीचं महत्त्व पटवून देणारं प्रशिक्षण सुरू झालं.
त्यांचं काम पाहूनच मुंबई महानगर पालिकेकडून कोरडा कचरा संकलनाच्या सहा शेड्स त्यांच्या संघटनेला मिळाल्या. सुशीलाबाई तिथल्या स्त्रियांना मार्गदर्शन करतात; पण कोरडय़ा कचऱ्यात असलेला पैसा लक्षात आल्यावर अनेक जण यात व्यावसायिक म्हणून उतरले आणि कचरावेचकांना कचरा मिळण्याचं प्रमाण कमी होऊ लागलं. त्यामुळे त्यांची संघटना खतनिर्मिती, बागकाम, इमारती स्वच्छतेची कंत्राटं घेणं आदी कामं करीत आहे.
याच काळात स्त्रीमुक्ती संघटनेच्या अध्यक्ष ज्योती म्हापसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुशीलाबाईंची भेट जागतिक कचरावेचक संघटनांशी, पर्यावरणविषयक काम करणाऱ्या संघटनांशी होऊ लागली. ‘भारतीय कचरावेचक आघाडी’तर्फे त्या ‘ग्लोबल अलायन्स ऑफ वेस्ट पिकर्स’च्या सभांमध्ये भारतीय कचरावेचकांच्या प्रतिनिधी म्हणून जाऊ लागल्या. २००९ मध्ये पहिल्यांदा त्या कोपनहेगन येथे गेल्या. त्यानंतर चीन, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, थायलंड, केनिया, नैरोबी येथील आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपलं म्हणणं त्यांनी ठामपणे मांडलं. प्लास्टिकबंदी, हानीकारक रसायनं न वापरणं, वेफर्सचे रॅपर न वापरणं, या विषयांवर मार्गदर्शन घेण्याबरोबरच आपले प्रश्न त्यांनी जागतिक व्यासपीठांवरून दुभाष्याच्या माध्यमातून मांडल्या, तेव्हा त्यांच्या सभाधीटपणाचं, मुद्देसूद बोलण्याचं सर्वत्र कौतुक झालं.
ओल्या कचऱ्याचं परिसरातच खत केलं आणि विभाग पातळीवर बायोगॅस तयार केला तर मिथेन या विषारी वायूचे प्रमाण कमी होईल आणि वातावरणातील तापमान कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होईल हे सुशीलाबाई अनुभवातून, अभ्यासातून शिकल्या आहेत, मात्र ही गोष्ट सुशिक्षितांना कशी समजावून सांगायची हे त्यांच्या लक्षात येत नाही. असो.
परिसरातील एकल स्त्रियांचे प्रश्नही हाताळणाऱ्या सुशीलाबाईंना तरुण मुलांमधली व्यसनाधीनता अस्वस्थ करत आहे. त्यावर काही ठोस करण्याचा विचार सुरू आहे. त्यांच्या या कामाला यश मिळो, हीच शुभेच्छा!
मुख्य प्रायोजक : उषा काकडे ग्रुप
सहप्रायोजक : मे. बी. जी. चितळे डेअरी
टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड
उज्वला हावरे लेगसी
पॉवर्ड बाय : केसरी टूर्स
व्ही एम मुसळूणकर ज्वेलर्स
ओ एन जी सी
दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी लि.