दिवाळी अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे, दिवाळी म्हंटलं पहिली आठवणारी गोष्ट म्हणजे फराळ. फराळाशिवाय दिवाळी होऊच शकत नाही. घराघरांमध्ये आता दिवाळीच्या फराळाची लगबग सुरु झाली आहे. महिलांनी एक एक पदार्थ करायला सुरुवात केली असून आज आम्हीही तुमच्यासाठी एक फराळाचा खास पदार्थ घेऊन आलो आहोत. चला तर आज जाणून घेऊयात तोंडात विरघळणारी नानकटाईची रेसिपी.
नानकटाई बिस्कीट साहित्य
- २ वाटी मैदा
- दीड वाटी तूप किंवा बटर (बटर वापरत असाल तर अनसॉल्टेड वापरा )
- १ वाटी पिठी साखर
- २ चमचे रवा
- १/२ चमचा बेकिंग पावडर
- १ चमचा वेलची पावडर
- बदाम आणि पिस्ता काप
- मीठ (चवीनुसार )
आता आपण वर दिलेले साहित्य वापरून नानकटाई बिस्कीट कशी बनवायची ते पाहूयात..
नानकटाई बिस्कीट बनवण्यासाठी कृती –
- सर्वप्रथम एक बाऊल घ्या आणि त्यामध्ये दिड वाटी बटर आणि पिठी साखर घाला आणि ते चांगल बीटरने फेटून घ्या. जोपर्यंत हे मिश्रण पांढरे दिसत नाही तोपर्यंत फेटा.
- आता त्यामध्ये मैदा आणि रवा घाला आणि हे मिश्रण गोळा होईपर्यंत बिटरने फेटा. आणि मग त्यामध्ये मीठ (चवीनुसार), बेकिंग पावडर, वेलची पावडर घाला आणि ते चांगले मळून घ्या.
- आता बेकिंग ट्रे ला बटर लावून घ्या आणि पीठाचे पेढ्या एवढे बिस्कीट बनवून घेवून ती ट्रे मध्ये थोड्या थोड्या अनंतरावर ठेवा. आणि बिस्कीट मध्य भागी हलके अंगठ्याने दाबा.
- मग ओव्हन १७० ते १८० डिग्रीवर प्री- हिट करा आणि त्या प्री हिट ओव्हनमध्ये ती बिस्किटे ५ मिनिटे भाजून घ्या.
- पाच मिनिटांनी ती बाहेर काढा आणि त्यावर मध्यभागी बदाम आणि पिस्ता घाला आणि ती परत ओव्हनमध्ये घालून ५ ते ६ मिनिटे १८० डिग्रीवर भाजून घ्या.
हेही वाचा >> चिवडा नरम होतो? या ३ टिप्स वापरा शेवटपर्यंत राहील कुरकुरीत; ही सोपी रेसिपीही करा नोट
- ५ ते ६ मिनिटांनी बिस्किटे चांगले भाजतील. ते भाजल्यानंतर ओव्हनमधून बाहेर काढा आणि मग ते थोडे गार होऊ द्या.
- गार झाल्यानंतर ते आपण तसेच खावू शकतो.