चंद्रपूर : गोंड कालीन ऐतीहासिक व प्राचीन वास्तूंचा ठेवा असलेल्या या शहरात ४०० वर्ष पुरातन दशमुखी दुर्गा देवी आहे त्याच अवस्थेत पडून आहे. महाकाली मंदिरापासून अवघ्या २ कि.मी. अंतरावर ही अभूतपूर्व मूर्ती आहे. भिवापूर वार्ड येथे ४०० वर्ष पुरातन देवीची २६ फुट लांब आणि १८ फुट रुंद अशी एकपाषाणी विशाल दहा तोंड असलेली दुर्गादेवीची ही मूर्ती आहे. या मूर्तीचे सगळ्यात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असे की देवी दशभुजाधारी असून प्रत्येक हातात शस्त्र आहे. दहा तोंड असलेली या प्रकारातील दुर्गादेवीची मूर्ती क्वचितच कुठे बघावयास मिळते. या मूर्तीला दहा तोंड असल्यामुळे अनेक लोक या मूर्तीस लंकापती रावण समजून विजयादशमीला दगड मारुन आपला प्रतिकार व्यक्त करत असत. त्यामुळे मुर्ती थोड्या प्रमाणात विद्रूप झाली. कालांतराने या मूर्तीची ओळख होऊन हा गैरसमज दुर झाला आणि ही परंपरा बंद झाली.
हेही वाचा : बिगुल वाजला! महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार ‘या’ जिल्ह्यात…
गोंड राजवटीतील अनेक किल्ले मंदिरे, इत्यादींपासून प्रेरणा घेऊन १६ व्या शतकातच्या दरम्यान बाबुपेठ येथे राहणाऱ्या रायप्पा वैश्य यानी भव्य शिव मंदिराची उभारणी करण्यासाठी अनेक मूर्तीची निर्मिती केली या मूर्तीखेरीज मत्स्यावत, कूर्मावतार, शिवलिंग, नंदी, हनुमान, गणेश, कालभैरव, हत्ती, शेषनाग, गरुड इत्यादी मूर्ती देखील तयार केल्या. मात्र हे शिवालयाचे कार्य प्रगतीपथावर असतांनाच रायप्पा वैश्य यांचा मृत्यू झाला आणि हे देवालयाचे काम कायमचे अधुरे राहिले म्हणूनच या मंदिराला “अपुर्ण देवालय” असे म्हणतात. ऊन, वारा, पाऊस यांच्याशी दोन हात करत ४०० वर्ष उलटूनही ही विशाल दुर्गामूर्ती आपलं अस्तित्व टिकवून आहे. नागपूर पुरातत्त्व विभागाने या मूर्तीचे वैशिष्ट्य लक्ष्यात घेता या मूर्तीची प्रतिकृती तयार करून मध्यवर्ती संग्रहालयात ठेवली आहे.