गोंदिया : जिल्हा शेजारील असलेल्या छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथे माता बमलेश्वरीच्या दर्शनाकरिता छत्तीसगडसह विदर्भातील व मध्यप्रदेश राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता दरवर्षी प्रमाणे याही वर्षी डोंगरगड येथील माता बमलेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सवादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये होणारी अधिकची गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या अंतर्गत, डोंगरगड आणि रायपूरपर्यंत खालील गाड्यांच्या १० दिवस तात्पुरत्या विस्तारासह, काही लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबरपर्यंत डोंगरगडमध्ये १० दिवस तात्पुरता थांबा दिला जात असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे .
यात गाडी क्र. ०८७४२/०८७४१ गोंदिया- दुर्ग- गोंदिया मेमू पॅसेंजर स्पेशल रायपूरपर्यंत वाढवण्यात येत आहे. गाडी क्र. ०८७४२ दुर्ग येथून २१.०५ वाजता सुटेल आणि २२:३० वाजता रायपूरला पोहोचेल आणि ट्रेन क्र. ०८७४१ रायपूरहून ०५.१५ वाजता सुटेल आणि ०६.१० वाजता दुर्गला पोहोचेल आणि नियोजित वेळेनुसार सुटेल. ट्रेन क्र. १२७२२ रायपूर – सिकंदराबाद एक्सप्रेस तात्पुरती १८.३४ वाजता येईल आणि १८.३६ वाजता निघेल. तसेच तात्पुरते विरुद्ध दिशेने गाडी क्र. १२७२१ सिकंदराबाद-रायपूर एक्स्प्रेस डोंगरगड स्थानकावर ११.२४ वाजता पोहोचेल आणि ११.२६ वाजता सुटेल.
हेही वाचा : “सत्ताधारी पक्षाचा असलो तरी आमदार म्हणून…”, किशोर जोरगेवार यांची खंत
डोंगरगड स्थानकावर हा थांबा तात्पुरता दिला जात आहे. याशिवाय डोंगरगडमध्ये वर उल्लेखलेल्या कालावधीत जत्रेच्या निमित्ताने अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यात प्रवासी मदत केंद्र, अतिरिक्त तिकीट खिडकी/चौकशी केंद्र, अतिरिक्त मूत्रालये आणि स्वच्छतागृहे, गाड्यांच्या वेळापत्रक यांची सतत घोषणा व गाड्यांची सतत माहिती घेणे, स्वच्छतेच्या कामाची काळजी तसेच नागरी संरक्षण संस्था, स्काउट गाईड, अतिरिक्त तिकीट तपासणी कर्मचारी, अतिरिक्त रेल्वे कर्मचारी कमर्शियल इन्स्पेक्टर यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, जत्रेदरम्यान येणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी दिवाबत्ती आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसह प्रवाशांच्या आवश्यक सुविधांची सर्वकाळ काळजी घेतली जाईल, असेही रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.