यवतमाळ : देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या दुर्गोत्सव म्हणून ख्यातील असलेल्या यवतमाळच्या दुर्गोत्सवाने याहीवर्षी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले. त्याचा विविध सामाजिक संस्थांना मोठा फायदा झाला. दुसरीकडे रावण दहनाविरोधात काही समाजाच्या भावना लक्षात घेता मंगळवारी दसऱ्याला यवतमाळात ‘अहंकार’ प्रतिमेचे दहन करण्यात येणार आहे. दसऱ्याला अहंकाराचे सीमोल्लंघन करून प्रेम आणि सदभावना निर्माण करण्याचे आवाहन या निमित्ताने दुर्गोत्सव मंडळांनी भक्तांना केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळात दुर्गोत्सवासोबतच सामाजिक बांधीलकीही जपण्यात अनेक मंडळांनी पुढाकार घेतला. रोगनिदान, रक्तदान शिबिरांसह सुशिक्षित बेरोजगार तरुणांना प्रबोधनपर मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. शिवकालीन शस्त्राच्या प्रदर्शनीसह, गडकिल्ल्याच्या इतिहासाला चित्ररूपाने उजाळा दिला. नवरात्रोत्सवाच्या काळात जन्मास आलेल्या कन्यारत्नांचे स्वागतही मंडळाच्यावतीने करण्यात येवून पालकांचे अभिनंदन करण्यात आले.

हेही वाचा : धक्कादायक! तरुणीचे अपहरण करून स्कूल व्हॅनमध्ये बलात्कार, आरोपीला अटक

येथील गणपती मंदिर चौकातील नवशक्ती दुर्गोत्सव मंडळाने अॅक्युपंचारिस्ट थेरपीच्या माध्यमातून गुडगे, पाठ, डोकेदुखीसारख्या आजारांवर दक्षिण कोरियन पद्धतीचा उपचार भक्तांना या ठिकाणी उपलब्ध करून दिला. तलाव फैलातील शिवाजी महाराज मंडळाने रक्तदान शिबिर आणि रोगनिदान शिबिराचे आयोजन केले होते. या मंडळाने शिवकालीन शस्त्रांची प्रदर्शनी भाविकांसाठी ठेवली हाती. दर्डा नाक्यावरील शिवराय दुर्गोत्सव मंडळाने युवकांना प्रबोधन करण्यासाठी स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन आयोजित केले. या मंडळाने नऊ दिवसात शासकीय रुग्णालयात जन्मास येणाऱ्या कन्यारत्नांचे स्वागत केले. विठ्ठलवाडीमधील शिवशक्ती दुर्गोत्सव मंडळाने शिवकालीन शस्त्र प्रदर्शनी भाविकांसाठी लावली. यवतमाळचा दुर्गोत्सव देखाव्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. चांदणी चौकात नवीन दुर्गादेवी उत्सव मंडळाने लंका दहन तर स्टेट बँक चौकातील समर्थ दुर्गोत्सव मंडळाने जेजोरीच्या खंडोबाचा चलचित्र देखावा साकारला. याशिवाय प्रत्येक मंडळाने दांडिया स्पर्धेचे आयोजन केले. जगराताच्या कार्यक्रमाने हा उत्सव अधिकच खुलला.

हेही वाचा : चंद्रपुरातील महाकाय दशमुखी दुर्गादेवी मूर्ती

दुर्गोत्सवातील वाढत्या गर्दीने यवतमाळच्या शहरी अर्थव्यवस्थेला उभारी दिली आहे. दररोज हजारो भक्त यवतमाळात दाखल झाल्याने शहरातील अर्थव्यवस्थेला गती आली. ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था तेजीत आली. दर्शनासाठी गावातून मिनीडोअर टेम्पो, ऑटो आदी खासगी वाहनचालकांना आर्थिक बळ मिळाले. शहरातील छोटे मोठे व्यवसाय तेजीत आले. प्रशासनानेही ही गर्दी लक्षात घेवून दुकानदारांना व्यवसायासाठी रात्रीही मोकळीक दिली. या उत्सवात पोलिसांनी सर्वत्र चोख व्यवस्था ठेवल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. अवधूतवाडी, शहर, लोहारा आणि ग्रामीण पोलिसांनी समन्वयातून गर्दी, वाहतूक व इतर सर्व व्यवस्था हाताळण्यासोबत ठिकठिकाणी नागरिकांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू केल्याने भक्तांच गैरसोय टळली.

हेही वाचा : बिगुल वाजला! महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार ‘या’ जिल्ह्यात…

हरिद्वारवरून गंगाजल, परदेशातूनही दर्शन

यवतमाळातील आठवडी बाजारातील हिंदुस्थानी दुर्गोत्सव मंडळाने पहिले दुर्गोत्सव साजरा करण्यास सुरूवात केली. याच मंडळाने दुर्गामातेच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी कुंडाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. याच ठिकाणी असलेल्या जलकुंडात हरिद्वारमधून गंगाजल आणून टाकण्यात आले आहे. २२ हजार लिटर गंगाजल या ठिकाणी आणण्यात आले आहे. येथे मंडळाच्या दुर्गामातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. दरम्याने या नऊ दिवसांत ९० देशांतील भाविकांनी यवतमाळचा दुर्गोत्सव ‘लाईव्ह’ बघितला. यवतमाळचे चंद्रेश सेता यांनी सात वर्षांपूर्वी ‘यवतमाळ नवरात्री डॉट कॉम’ हे संकेतस्थळ सुरू केले. त्या माध्यमातून जगभरातील जवळपास तीन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी या दुर्गोत्सवाचा आंनद घेतला.

मराठीतील सर्व लोक उत्सव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In yavatmal durgotsav mandal decided to do ego dahan instead of ravan dahan on vijayadashami nrp 78 css
Show comments