विद्याधर कुलकर्णी
शुभदा जोशी
वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाची ओढ लावणारा, आनंदाबरोबरच शिस्तीचे संस्कार रुजवणारा ‘खेळघर’ हा सर्जनशील शिक्षणाचा प्रयोग गेली २७ वर्ष यशस्वीपणे राबवणाऱ्या शुभदा जोशी. आज दररोज ६ ते १८ वयोगटातील २०० मुलं ‘खेळघर’मध्ये येऊन खेळ, कला, संवाद, वाचन यांच्या माध्यमातून शाळेपलीकडच्या जगाची ओळख करून घेत आहेत. या संकल्पनेतूनच प्रेरणा घेऊन राज्यभरात ४० ‘खेळघरं’ सुरू झाली असून मुलांना आनंदाने शिकण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या यंदाच्या दुर्गा आहेत, शुभदा जोशी.
वंचित घटकांतील ६ ते १८ वयोगटातील मुलांचे शाळेपलीकडे अनौपचारिक पद्धतीने खेळ, कला आणि संवादाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व फुलवणारा ‘खेळघर’ हा सर्जनशील शिक्षणाचा अभिनव प्रयोग. गेली २७ वर्ष शुभदा जोशी शहरी झोपडवस्तीतील मुलांमध्ये तो राबवीत असून सहा तास शाळेत घालवल्यानंतरही २०० मुलं दररोज दोन तास स्वेच्छेने या ‘खेळघर’मध्ये येतात आणि आनंदात नवीन गोष्टी शिकतात. ही संकल्पना इतकी प्रेरणादायी ठरली, की राज्यभरातील विविध गावांमध्ये, आदिवासी पाडय़ांमध्ये १२ संस्थांनी सुमारे ४० ‘खेळघरं’ सुरू केली आहेत. या ‘खेळघर’चं नेतृत्व करणाऱ्या यंदाच्या दुर्गा आहेत, शुभदा जोशी.
शिक्षणाने वास्तुविशारद असणाऱ्या शुभदा यांनी सुरुवातीला १० वर्ष हा व्यवसाय केलाही, मात्र त्याचवेळी त्यांच्या लहान मुलांबरोबर खेळायला आजूबाजूच्या वस्त्यांमधील मुलं घरी येत असत. त्यांच्यासाठी काही काम करावं या उद्देशातून १९९६ मध्येच त्यांनी आपल्या राहत्या घरामध्ये ‘खेळघर’चं काम सुरू केलं. एका जागी अजिबात स्थिर बसू न शकणारी आणि सतत एकमेकांशी दंगा करणारी ही मुलं. त्यांच्याबरोबर असा प्रकल्प राबवणं हे एक आव्हानच होतं. पण त्यांनी ते स्वीकारलं आणि चार-पाच वर्ष घरातच हा प्रकल्प राबवला.
तत्पूर्वी, मुलाच्या शाळेच्या निमित्ताने ‘अक्षरनंदन’ शाळा आणि ‘पालकनीती’ मासिक यांच्याशी शुभदा यांचा संपर्क आला. ‘पालकनीती’ मासिकाच्या संपादकीय गटामध्ये त्या सहभागी झाल्या. या मासिकाच्या पलीकडे जाऊन काही प्रकल्प सुरू करावेत म्हणून संजीवनी कुलकर्णी, नीलिमा सहस्रबुद्धे, शुभदा जोशी आदींनी १९९६ मध्येच ‘पालकनीती परिवार’ संस्था स्थापन केली. त्यातूनच ‘खेळघर’ची निर्मिती झाली. त्या वेळी हा इतका मोठा प्रकल्प होईल असं वाटलं नव्हतं. आजूबाजूच्या शहरी झोपडवस्तीतून ही मुलं यायची. त्यांच्याबरोबर विविध खेळ खेळणं असो, गोष्टींची पुस्तकं वाचून दाखवणं असो, वा एकत्र मिळून कुठे तरी फिरायला जाणं असो, आठवडय़ातून दोनदा, असं त्याला नियमित स्वरूप आलं. मदतीसाठी स्वयंसेवी कार्यकर्त्यांचा गटही जमला. २००२-२००३ पर्यंत ८० मुलं ‘खेळघर’शी जोडली गेली. घराच्या गच्चीवर आठवडय़ातून तीनदा ते सगळे भेटत असत. ही जागा अपुरी पडू लागल्यानंतर मुलांच्या वस्तीमध्येच एक जागा भाडय़ाने घेतली. तीही कमी पडल्यावर २००५-२००६ मध्ये आणखी एक जागा भाडय़ाने घेऊन तिथे काम सुरू केलं. आज पुण्यामधील कोथरूड भागातील लक्ष्मीनगर या दीड हजार घरांच्या वस्तीतील हे ‘खेळघर’ त्यांच्या कलागुणांना वाव देत आहे. ही मुलं लक्ष्मीनगर या पुण्यातील डहाणूकर कॉलनीच्या शेजारच्या डोंगरउतारावर वसलेल्या वस्तीतली आहेत.
ही मुलं ‘खेळघर’शी जोडली गेली त्यामागे एक घटना आहे. १९९८ च्या सुमारास लक्ष्मीनगर वस्तीतील लोकांना ‘राहती जागा रिकामी करा’ अशी सरकारी नोटीस मिळाली. वस्तीवर बुलडोझर फिरवला जाईल, अशी भीती निर्माण झाली. ‘खेळघर’ने वस्तीतील पालक आणि मुलं यांच्या मदतीने सर्व रहिवाशांच्या शिधापत्रिकांच्या प्रती जमा करून महानगरपालिकेत दाखल केल्यानंतर ही कारवाई थांबली. साहजिकच वस्तीतील लोकांचा ‘खेळघर’च्या कामावर विश्वास बसला. येथील पालकांचा एक संवादगट सुरू झाला.
दरम्यान ‘खेळघर’चं काम अधिक वाढू लागलं होतं. २००२ च्या सुमारास वस्तीमध्येच ‘आनंद संकुल’ केंद्राला सुरुवात झाली. या वस्तीमध्ये वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील बहुसंख्य स्त्रिया घरकाम करणाऱ्या, तर पुरुष बांधकाम कामगार आहेत. शिक्षणाबद्दल उदासीन असणाऱ्या या वस्तीतील मुलांसाठी त्यांनी काम सुरू केलं तेव्हा बरीच मुलं शाळेत न जाणारी होती. मात्र सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे आज येथील सगळी मुलं शाळेत जात आहेत.
‘पालकनीती परिवारा’च्या कार्यकर्त्यांना ‘खेळघर’मध्ये तासिका, घंटा, परीक्षा अशी शाळांमध्ये असणारी, बांधून ठेवणारी व्यवस्था नको आहे. शिकताना स्पर्धा, शिक्षा, अपमान अशा गोष्टी मुलांच्या मनात येऊ नयेत, मूल आणि मोठय़ांमध्ये नियंत्रक आणि नियंत्रित हे नातं टाळावं, आदी विचार स्पष्ट होते. इथे मुलांना मोठय़ांइतकाच आदर-विश्वास मिळावा, लहान म्हणून समजून घेतलं जावं, असा आग्रह आहे. लहान वयात मुलांसाठी जग समजून घेण्याचं ‘खेळ’ हे एक माध्यम आहे. या माध्यमातून मुलांच्या चपळाई, निरीक्षण, तत्काळ निर्णय घेणं अशा अनेक क्षमतांचा विकास होत असतो. ‘खेळघर’च्या कामाच्या विस्ताराबरोबर समविचारी साथीदारांच्या सहभागाचा परीघही वाढू लागला आहे. आज ‘खेळघर’चा २० जणांचा गट आहे, त्यात सुमित्रा मराठे आणि संध्या फडके या स्वयंसेवी कार्यकर्त्यां २००५ पासून सहभागी आहेत. ‘टाटा ट्रस्ट’, ‘विप्रो फाऊंडेशन’ यांच्याकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते. २०२० पासून ‘विप्रो फाऊंडेशन’च्या माध्यमातून, ‘विप्रो’ ज्या संस्थांना आर्थिक मदत देते अशा भारतभरातील वंचित मुलांबरोबर काम करणाऱ्या संस्थांना ‘खेळघर’ मार्गदर्शन करत आहे.
ही संकल्पना सर्वत्र रुजवावी यासाठी ‘खेळघर’तर्फे २००७ ते २०१७ या काळात ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’ या कार्यशाळा घेतल्या जात असत. या प्रयत्नांतूनच आज महाराष्ट्रभरात, गावांमध्ये, आदिवासी पाडय़ांमध्ये सुमारे १२ संस्थांची ४० ठिकाणी खेळघरं सुरू झाली आहेत. वंचित घटकांतील मुलांना आयुष्य जगण्याच्या वेगळय़ा वाटा दाखवणाऱ्या शुभदा जोशी यांच्या कार्याला शुभेच्छा.
मुख्य प्रायोजक : उषा काकडे ग्रुप
सहप्रायोजक : मे. बी. जी. चितळे डेअरी
टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड
उज्ज्वला हावरे लेगसी
पॉवर्ड बाय : केसरी टुर्स
व्ही एम मुसळूणकर ज्वेलर्स
ओ एन जी सी
दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी लि.
संपर्क : शुभदा प्रसन्न जोशी
पत्ता : गुरुप्रसाद अपार्टमेंट, २३ आनंद निकेतन सोसायटी, कर्वेनगर, पुणे ४११०५२