माधुरी ताम्हणे

डॉ. कल्पना खराडे

वयाच्या तेराव्या वर्षी त्यांची दृष्टी गेली आणि त्याच्या उपचारासाठी त्या महत्प्रयासाने रशियाला गेल्या. दृष्टी परत आली नाही, मात्र वेगळा दृष्टिकोन मिळाला. रशियन भाषा शिकता आली, मुख्य म्हणजे तिथेच डॉक्टरेट मिळवली आणि त्या जोरावर भारतात आल्यावर त्या प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. अंध विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अंध शाळांशी जोडल्या जात विविध उपक्रम राबविणाऱ्या, आजही एम.एड., पीएच.डी.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या यंदाच्या दुर्गा आहेत, डॉ. कल्पना खराडे.

प्रत्येकाचं अवकाश वेगळं. ते सीमित असो की विशाल, त्या अवकाशात झेप घेणं महत्त्वाचं! एरव्ही बालवाडी शिक्षिका ते पीएच.डी.साठी गाइड पदापर्यंत पोहोचणं हे काहीसं सर्वसाधारण गटात मोडणारं, पण एका अंध स्त्रीसाठी चाळीसेक वर्षांपूर्वी अशी उत्तुंग भरारी घेणं खूपच मोठं. मात्र अशी झेप घेत असताना अंध विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या यंदाच्या दुर्गा आहेत, डॉ. कल्पना खराडे!

सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म घेतलेल्या कल्पना! वडील पोस्ट खात्यात कर्मचारी तर आई गृहिणी, साधं सरळ मध्यमवर्गीय कुटुंब. वयाच्या तेराव्या वर्षी डोळय़ांचं तेज मंदावतंय याची जाणीव त्यांना हळूहळू व्हायला लागली होती. दहाव्या वर्षांपर्यंत पहिल्या बाकावरूनही फळय़ावरचं काही दिसेनासं झालं. अत्यंत अभ्यासू मुलगी गणितात नापास झाली तेव्हा मात्र वडिलांना समस्येचं गांभीर्य जाणवलं. त्यांनी कल्पनांना नेत्रतज्ज्ञाकडे नेलं. ‘हा दुर्धर नेत्रविकार आहे. या विकारात हळूहळू दृष्टी कमी कमी होत पूर्णपणे अंधत्व येतं.’ असं त्यांनी सांगून टाकलं.

आल्या समस्येचा स्वीकार आणि त्यावर उपाय हे दोन्ही आपल्यालाच शोधायचं आहे, हा निर्धार पक्का झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी आवड म्हणून आणि स्वत:ला आर्थिकदृष्टय़ा स्थिर करण्यासाठी शिक्षकी पेशा स्वीकारायचं ठरवलं. त्यासाठी डी. एड. केलं. त्यांत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर त्यांना शिकवण्यासाठी बालवर्ग मिळाला. शाळेतली शिक्षिकेची नोकरी सुरू झाली. दरम्यान, एक दिवस त्यांच्या आईने एक बातमी वृत्तपत्रात वाचली, की या दुर्धर व्याधीवर रशियात, मॉस्कोमध्ये प्रायोगिक तत्त्वावर उपचार सुरू झालेत. वडिलांनी तात्काळ रशियाला जायचा निर्णय घेतला. मात्र ते तितकंसं सोपं नव्हतंच. पण ‘इच्छा तेथे मार्ग’ यानुसार प्रश्न सुटत गेले. ठाण्यातील वसंत लिमये सरांनी रशियन सरकारशी रशियन भाषेत पत्रव्यवहार केला. त्या वेळी महंमद शफी कुरेशी हे केंद्र सरकारमध्ये नागरी उड्डाणमंत्री होते. त्यांनी विनामूल्य विमान तिकिटं मिळवून दिली. काही संस्थांनीही मदत केली आणि १९७९ मध्ये कल्पना यांनी वडिलांसह रशियात प्रवेश केला तो मनांत असीम आशा घेऊन! मात्र तिथल्या डॉक्टरांनी एका क्षणात त्यांच्या आशेवर पाणी फिरवलं. मात्र वडिलांच्या विनंतीवर त्यांनी एक प्रयोग करायचं मान्य केलं. डॉक्टरांनी १० दिवस डोळय़ांत तीस इंजेक्शन्स दिली. त्याचा थोडा फरक जाणवला, साहजिकच उपचारांसाठी रशियात राहणं भाग होतं. भारतीय दूतावासाने आणि तत्कालीन दूतावास प्रमुख इंद्रकुमार गुजराल यांनी तात्पुरतं एक छोटं घर आणि त्यांच्या वडिलांना नोकरी दिली. १९ वर्षीय कल्पना यांनी जिद्दीने रशियन भाषा शिकून घेतली. दरम्यान, दृष्टी ऱ्हास होणं थांबलं असल्याचं निष्पन्न झालं आणि कल्पना यांनी तिथल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. एम.ए.ची पदवी हाती आली. त्यानंतर त्यांनी तिथेच पीएच.डी.ही मिळवली. त्यानंतर भारतात परतलेल्या कल्पना थेट सोमय्या महाविद्यालयाच्या प्राचार्याना भेटल्या आणि त्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर प्राध्यापक पद मिळालं. पेपर्स तपासणं, मुलांचे वर्ग घेणं, कॉम्प्युटरच्या मदतीने वाचन करणं इतकंच नाही तर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम बसवणंसुद्धा त्या इतर प्राध्यापकांप्रमाणे सहज करू लागल्या.  कल्पना यांच्या कामाचा प्रभाव इतका आहे, की निवृत्तीनंतरही गेली ४ वर्ष त्या सोमय्या महाविद्यालयात सहप्राध्यापक म्हणून

कार्यरत आहेत. याशिवाय अनेक महत्त्वाच्या पदांवर त्या काम करीत आहेत, कर्मचारी निवड प्रक्रिया असो की एम.एड. वा एमएच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन. याशिवाय आज त्या अनेकांसाठी पीएच.डी.च्या मार्गदर्शकही आहेत.

प्राध्यापकी सुरू असतानाच कल्पना यांना स्वत:च्या अंधत्वामुळे अंध विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणींची कल्पना होती. विशेषत: सातवीनंतर मुख्य प्रवाहातील सायन्स आणि मॅथेमेटिक्स घेण्याची परवानगी या मुलांना दिली जात नव्हती. परदेशांत तर अंध व्यक्ती अगदी शास्त्रज्ञसुद्धा आहेत, हे लक्षात घेऊन त्यांनी ‘कमला मेहता दादर स्कूल’ या अंधशाळेतील आणि ‘व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर ब्लाइंड’या शाळेतील मुलांसाठी विविध प्रकल्प घ्यायला सुरुवात केली. जसे, की स्टडी स्किल वर्कशॉप, इंग्लिश स्पीकिंग वर्कशॉप या बरोबरीने प्रकाशाची संकल्पना, खगोल शास्त्रातील विविध संकल्पना, वीज प्रणाली, चुंबकीय संकल्पना त्यातील वैज्ञानिक सत्य समजून सांगण्यासाठी या मुलांना त्या ‘होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन’ येथे घेऊन जात. पंचेंद्रियांच्या साहाय्याने प्रत्येक गोष्टीचा अनुभव ही मुलं प्रत्यक्ष घेत. त्याचा सकारात्मक परिणाम व्हायचा. परिणामस्वरूप, सेंटर मधले शिक्षकही या मुलांच्या आकलनशक्तीला दाद द्यायचे.

अंधत्व आलं म्हणून निराश न होता त्यावर मात करत दुसऱ्यांच्याही आयुष्यात प्रकाश आणणाऱ्या डॉ. कल्पना खराडे यांना त्यांच्या पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा.

 मुख्य प्रायोजक :  उषा काकडे ग्रुप

सहप्रायोजक :  मे. बी. जी. चितळे डेअरी

 टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड

 उज्वला हावरे लेगसी

पॉवर्ड बाय :  केसरी टूर्स 

 व्ही एम मुसळूणकर ज्वेलर्स

 ओ एन जी सी 

 दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी लि.

Story img Loader