प्रज्ञा तळेगावकर
डॉ. माधुरी गोरे
भारतात दरवर्षी लहान-मोठय़ा अपघातांत १५ लाखांहून अधिक लोक होरपळले जातात, त्यांना जीवनदान ठरते ती अनेकांनी मरणोत्तर दान केलेली त्वचा. देशातली पहिली त्वचापेढी उभारण्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या, तत्पूर्वी प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या बाह्यत्वचेचे रुग्णाच्या जखमेवर रोपण करण्याचा भारतातला पहिला प्रयोग करण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या तसंच भाजलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरलेलं केळीच्या पानांचं जगातलं सर्वात स्वस्त ड्रेसिंग बनवणाऱ्या आजच्या दुर्गा आहेत, डॉ. माधुरी गोरे.
भाजून जखमा होणं ही आपल्यासाठी तशी नित्याची बाब, मात्र भाजल्यामुळे शरीरावर जेव्हा जखमा होतात तेव्हा ते रुग्णांसाठी प्रचंड वेदनादायी असतं. डॉ. माधुरी यांनी अशा रुग्णांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या अनेक गोष्टी अनेकांच्या सहकार्यातून, स्वत:च्या अभ्यासातून आणि संशोधनातून प्रत्यक्षात आणल्या आहेत. केळीच्या पानांचं जगातलं सर्वात स्वस्त ड्रेसिंग असो, प्रयोगशाळेतील त्वचेचे रोपण असो, पहिली त्वचादान पेढी सुरू करणं असो, की बऱ्या झालेल्या रुग्णांसाठीचे आधारगट तयार करणं असो, भाजलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या या गोष्टी प्रत्यक्षात आणणाऱ्या यंदाच्या दुर्गा आहेत, शल्यचिकित्सक डॉ. माधुरी गोरे.
पुण्यात एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर डॉक्टर माधुरी शल्यचिकित्सक होण्यासाठी मुंबईतल्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वसाधारण रुग्णालयात (सायन रुग्णालय) १९७५ मध्ये रुजू झाल्या. पहिल्याच प्रयत्नात पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण होऊन शल्यक्रिया विभागात त्या व्याख्याता म्हणून रुजू झाल्या. त्या वेळचे लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वसाधारण रुग्णालयातील शल्यक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. एस.व्ही. नाडकर्णी यांनी १९८५ मध्ये त्यांच्यावर भाजल्याने जखमा झालेल्या रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी सोपवली. डॉ. माधुरी यांनी ती जबाबदारी पुढील २५ वर्षे यशस्वीरीत्या पेलली.
डॉ. माधुरी यांचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे, केळीच्या पानाचं ड्रेसिंग. त्यांनी केळीच्या पानाच्या पाठीमागील भागावर बँडेजचं कापड खळीनं चिकटवून ड्रेसिंग तयार केलं. पूर्णपणे शास्त्रीय पद्धतीनं तयार केलेलं हे ड्रेसिंग वापरण्यास सोपं, काढताना वेदनारहित, जखमेवर उपयुक्त, बनवण्यास सोपं आणि मुख्य म्हणजे सहज उपलब्ध असल्याचं सिद्ध झालं आहे. आजही हे जगातील सर्वात स्वस्त ड्रेसिंग मानलं जातं. यावरील त्यांचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आहेत. या ड्रेसिंगचा वापर सर्वसामान्यांसाठी करता यावा यासाठी त्यांनी याचं पेटंट घेणंही नाकारलं. त्यामुळेच आज भारताबरोबर परदेशातही याचा वापर केला जातो. या संशोधनासाठी २०००मध्ये डॉ. माधुरी यांना अखिल भारतीय शल्यचिकित्सक परिषदेत ‘डॉ. रंगाचारी सन्माना’ने गौरविण्यात आलं.
डॉ. माधुरी यांनी ‘नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस’च्या मदतीनं प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या बाह्यत्वचेचे रुग्णाच्या जखमेवर रोपण करण्याचा भारतातील पहिला प्रयोग १९९५ मध्ये केला. मात्र, ही प्रक्रिया अतिशय खर्चीक असल्यानं सामान्य रुग्णांना परवडणारी नव्हती. डॉ. माधुरी यांचा ध्यास होता तो स्वस्त आणि सर्वाना परवडेल अशा उपचारांचा. त्यातूनच मग त्वचादान आणि त्वचापेढीची संकल्पना आकारास आली. भाजल्यामुळे मृत झालेली त्वचा लवकरात लवकर काढून टाकून त्या जागी स्वत्वचारोपण करणं हा रुग्ण लवकर बरा होण्यासाठी आवश्यक उपचार आहे, मात्र चाळीस टक्क्यांहून अधिक त्वचा भाजली गेली असल्यास स्वत्वचारोपण पुरं पडत नाही. त्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची त्वचा वापरावी लागते. मात्र, जिवंत व्यक्तीची त्वचा वापरणं म्हणजे त्यालाही यातना देणं असल्यानं यावर उपाय म्हणजे मरणोत्तर त्वचादानाने मिळालेली त्वचा. जगभरात ही पद्धती १९५२ पासून वापरली जात आहे; परंतु भारतात मरणोत्तर त्वचादान ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती की त्यासाठीची त्वचापेढीही नव्हती, म्हणूनच कायदेशीर प्रक्रियांचा अडथळा पार करत
डॉ. माधुरी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने एप्रिल २००० मध्ये भारतातली पहिली त्वचापेढी लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयात सुरू केली आणि त्वचादानाविषयी जनजागृती सुरू केली.
लोकांना त्वचादानाविषयी रुग्णालयांत केल्या जाणाऱ्या समुपदेशनापेक्षा समाजात केल्या जाणाऱ्या समुपदेशनाचा अधिक फायदा होतो, हे लक्षात घेऊन त्यांनी समाजात विविध ठिकाणी भाषणे, मुलाखती, नियतकालिके-वृत्तपत्रांतून, रेडिओवर प्रश्नोत्तरे अशा अनेक मार्गातून जागृती केली, आजही करत आहेत. त्यासाठी त्यांनी स्वयंसेवी संस्थांमधील कार्यकर्त्यांना त्वचादान व समुपदेशनाची संपूर्ण माहिती देऊन घरोघरी समुपदेशन होऊ शकेल अशी व्यवस्था केली. त्यांच्या या प्रयत्नांना मिळालेला प्रतिसाद बघून २००९ पासून मुंबईत ३ आणि देशातील इतर ७-८ शहरांत त्वचापेढय़ा सुरू करण्यात आल्या आहेत.
डॉ. माधुरी यांचं याशिवायचं आणखी एक काम म्हणजे, जखमांमधून प्रथिनांचा ऱ्हास झाल्यामुळे रुग्णांचे स्नायू दुबळे होऊन, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यातून जंतुसंसर्ग वाढून मृत्यू ओढवू शकतो. हे टाळण्यासाठी त्यांनी आहारतज्ज्ञ आणि बायोकेमिस्ट्री विभागाची मदत घेऊन खास आहार बनवला जो फायदेशीर सिद्ध झाला आहे. याशिवाय, रुग्णांच्या सांध्यांवरच्या जखमांमुळे सांधे आखडून येणारं वैगुण्य टाळण्यासाठी सहज र्निजतुक करता येणारे ‘आधार’ त्यांनी फिजिओथेरपिस्ट आणि ऑक्युपेशनल थेरपिस्टची मदत घेऊन तयार केले.
भाजलेला रुग्ण बरा होऊन घरी गेल्यावर त्यांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या समस्या लक्षात घेत त्यांच्या मानसिक, व्यावसायिक, कायदेशीर कामांच्या मदतीसाठी एक आधार गट चालू केला. एवढंच नव्हे तर शिवणकाम, टंकलेखन, भाज्या चिरून विकणे, रुग्णसेवा अशी वेगवेगळी कामे शिकवून रुग्णांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न सुरू झाला. भाजण्यावरच्या उपचार पद्धतींसह पन्नासहून अधिक शोधनिबंध वेगवेगळय़ा वैद्यकीय नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले आहेत.
रुग्णालयातून निवृत्त झाल्यावरही त्वचादानावर डॉ. गोरे आजही समुपदेशन, मार्गदर्शन आणि जनजागृती करत आहेत. त्यांच्या या संशोधनाचा, जनजागृतीचा फायदा जास्तीत जास्त रुग्णांना होवो, ही शुभेच्छा.
मुख्य प्रायोजक : उषा काकडे ग्रुप
सहप्रायोजक : मे. बी. जी. चितळे डेअरी
टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड
उज्वला हावरे लेगसी
पॉवर्ड बाय : केसरी टूर्स
व्ही एम मुसळूणकर ज्वेलर्स
ओ एन जी सी
दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी लि.