Navratri 2023 : नवरात्रोत्सव म्हणजे नऊ रात्री आणि नऊ दिवसांचे महत्वाचे व्रत, या उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्व आहे. यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबर २०२३ पासून होणार आहे. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत आदिशक्तीचा जागर केला जाईल. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान आपणाला देवीच्या निरनिराळ्या रुपांचे दर्शन घडवण्यासाठी अनेक सार्वजनिक मंडळं देवीच्या विविध रुपांचे देखावे उभारतात. नवरात्रोत्सवाच्या काळात अनेकांना देवीच्या विविध मंदिरांना भेट देण्याची इच्छा असते. भारतात एकूण ५१ शक्तिपीठे असून यापैकी महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात अनेक भाविक या शक्तिपीठांचे दर्शन घेण्यासाठी जातात. शिवाय या शक्तिपीठांसह राज्यातील आणखी काही अशी प्रसिद्ध मंदिरे आहेत, ज्या ठिकाणी भाविक आवर्जून दर्शनासाठी जातात. ती प्रसिद्ध मंदिरे कोणती आहेत, याबाबतची माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर (अंबाबाई मंदिर) हे भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराला दक्षिण काशी असेही म्हटलं जातं. नवरात्रोत्सोवाच्या काळात कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी येतात.

तुळजा भवानी मंदिर, सोलापूर

तुळजा भवानी मंदिर हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, ते सोलापूरपासून जवळपास ४५ किमी अंतरावर आहे. तुळजा भवानी मंदिर हे ५१ शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. तुळजाभवानी मातेचे तुळजापूर येथे वास्तव्य आहे. तुळजापूर सोलापूर-औरंगाबाद रस्त्यावर असून सोलापूरहून ४२ कि.मी. तर उस्मानाबादहून २२ कि.मी. अंतरावर आहे.

हेही वाचा- Navratri 2023: नवरात्रीच्या पूजेमध्ये नारळ आणि सुपारीला का दिलं जातं विशेष महत्व? जाणून घ्या

रेणुका देवी मंदिर, माहूर

नांदेड जिल्ह्यातील माहूर हे रेणुका देवी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. माहूरमध्ये अनुसया मंदिर आणि कालिका मंदिरासारखी इतर अनेक मंदिरे आहेत. येथील मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. येथील देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूर गडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिराकडे जाण्यासाठी नांदेडवरून सतत बसची सेवा उपलब्ध आहे.

सप्तशृंगी देवी मंदिर, नाशिक

सप्तशृंगी देवी मंदिर नाशिकपासून ६० किमी अंतरावर कळवण तालुक्यात स्थित आहे. देवीचे मंदिर सात शिखरांनी वेढलेले असून समुद्रसपाटीपासून ५६५९ फूट उंचीवर आहे. हे भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी ‘अर्ध शक्तिपीठ’ मानले जाते. या मंदिरात देवीची आठ फूट उंचीची मूर्ती पाषाणात कोरलेली असून दोन्ही बाजूस ९ असे एकूण १८ हात असून या हातांमध्ये विविध आयुधे आहेत.

मुंबा देवी मंदिर, मुंबई

मुंबईतील मुंबा देवी मंदिर हे शहरातील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. मुंबा देवी ही मुंबईची ग्रामदेवता असून मुंबईचे नाव मुंबा देवी या देवीवरून पडल्याचे सांगितलं जातं. मुंबा देवी ही मासे पकडणाऱ्या कोळ्यांची देवता असून तिचे देऊळ मुंबईच्या फोर्ट भागात होते. नवरात्रोउत्सवासह अन्य काळातही या मंदिराला अनेक भाविक भेट देण्यासाठी जातात.

हेही वाचा- मुंबईत स्वस्तात मस्त खरेदी करायचीय? मग Street Shopping ‘या’ १० मार्केट्सना नक्की भेट द्या …

चतु:शृंगी मंदिर, पुणे

पुण्यातील सर्वात मोठं आणि जागृत देवस्थान असलेलं सेनापती बापट रोडवरील चतु:श्रृंगी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुणेकरच नाही तर देशभरातील भाविक या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. सेनापती बापट रोडवरील टेकडीच्या उतारावर असलेले चतु:शृंगी मंदिर हे पुणे शहरातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. चतु:श्रृंगी मंदिराच्या परिसरातील पार्वतीनंदन गणपती मंदिरात बसून चाफेकर बंधूंनी रँडच्या वधाचा कट रचला होता; तर ९० फूट उंच आणि १२५ फूट रुंद असलेले चतु:शृंगी मंदिर शक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाते.

एकवीरा देवी मंदिर, लोणावळा

पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील वेहेरगाव-कार्ला नावाने प्रसिद्ध असणारा गड आहे. या गडावर एकविरा आई आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. एकविरा आई मंदिर लोणावळ्याजवळ कार्ला लेणीजवळ आहे, आगरी-कोळी लोक मातेची पूजा करतात. हे मंदिर एका टेकडीच्या माथ्यावर सुमारे ५०० पायऱ्या असलेले आणि कार्ला लेण्यांनी वेढलेले आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात या निसर्गरम्य मंदिराला भेट देण्यासाठी हजारो भाविक येत असतात.

मराठीतील सर्व लोक उत्सव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahalakshmi tuljabhavani temple which are the famous goddess temples in maharashtra that you must visit during navratri find out jap
Show comments