Makar Sankranti 2024 Date Time: हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या तारखेला मकर संक्रांती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी हिंदू धर्मात, सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. संक्रातीपासून उतरायण सुरू होते असे मानतात. हिंदू धर्मातही सूर्याच्या उत्तरायणाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. २०२४ मध्ये मकर संक्रांतीचा सण कोणत्या तारखेला साजरा केला जाईल आणि शुभ मुहूर्त कधी आहे ते जाणून घेऊ या.
मकर ही एक रास असून सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. तर मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात. या दिवसा आधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. या नंतर रात्री लहान दिवस मोठा होत जातो. तसेच संक्रांतीनंतर ऋतूबदल होण्यास सुरुवात होते. हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला लागते.
मकर संक्राती हे दीर्घ सूर्यप्रकाशाने भरलेल्या दिवसांचे आगमन दर्शवते आणि जे पिकांसाठी देखील आवश्यक आहे. भारत ह कृषीप्रधान देश आहे त्यामुळे या शेतीच्या दृष्टिकोनातून या सणाला खूप महत्त्व आहे. देशभरात विविध स्थानिक परंपरांसह साजरा केला जातो. हा सण हिवाळा संपल्याची आणि कापणीच्या हंगामाची सुरूवात झाल्याचे दशर्वतो.
संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी करतात
संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी असे म्हणतात. थंडीत बाजारात जास्त भाज्या उपलब्ध असल्याने सर्व भाज्या खाऊ शकतो. भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्र करुन भाजी केली जाते. तसेच बाजरी शरीर उष्ण ठेवण्यास आवश्यक असल्याने या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी खाण्याचीही पद्धत आहे.
हेही वाचा – मकरसंक्रांतीनंतर लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने ‘या’ राशींचे लोक होतील करोडपती? आनंदाने वाटाल तिळगुळ
यंदा मकरसंक्राती हा उत्सव १५ जानेवारी २०२४ रोजी येणार आहे.
लोकसत्ताला याबाबत माहिती देताना अवधूत शेंभेकर गुरुजी यांनी सांगितले की, “संक्रातीचा पुण्यकाळ सोमवार १५ जानेवारी २०२४ रोजी सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत आहे.”
२०२४ मध्ये १४ जानेवारी रोजी पहाटे २:४३ वाजता सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करताच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. दरवर्षी मकर संक्रांतीचा सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा हा सण १५ जानेवारीला साजरा होणार आहे.