Temple Where Women Are not Allowed in Navratri: नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा सोहळा, स्त्रीशक्तीचा जागर अशी अनेक विशेषणं आपणही ऐकून असाल मात्र आपल्याच भारतात नवरात्रीतच एका मंदिरात महिलांना प्रवेश निषिद्ध आहे हे ठाऊक आहे का? विश्वविद्यापीठ अशी ओळख असणाऱ्या नालंदा येथील एका मंदिरात नवरात्रीच्या दिवसांमध्ये स्त्रियांना प्रवेश दिला जात नाही. नालंदा येथील दुर्गेचे ‘माँ आशापुरी मंदिर’ येथे नवरात्रीच्या कालावधीत शक्ती पूजन केले जाते व यावेळी कोणत्याही महिलेने मंदिरात येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
घोसरावण गावातील हे मंदिर ३५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. अचानक मातेची मूर्ती प्रगट झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. राजा घोष यांना याची माहिती मिळताच त्यांनी या ठिकाणी मातेचे मंदिर बांधले. राजाने केलेल्या मंदिराच्या बांधकामामुळे त्याचे नाव घोसरवण गाव पडले. घोसरावण गावातील माँ आशापुरी मंदिरात माँ दुर्गेची अष्टकोनी मूर्ती आहे, जी माँ दुर्गेच्या नऊ रूपांपैकी एक असलेल्या सिद्धिदात्रीच्या रूपात पूजली जाते. या मंदिरातील परंपरा या वज्रायण बुद्ध संस्कृतीशी प्रभावित आहेत त्यामुळे बहुतांश पूजांमध्ये याचा प्रभाव शेकडो वर्षांपासून दिसून आला आहे.
मंदिराचे मुख्य पुजारी पुरेंद्र उपाध्याय यांनी सांगितले की, नवरात्र पूजा शुद्ध तांत्रिक परंपरेने केली जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात हे विधी पार पडतात, ९व्या शतकात वज्रयान बौद्ध भिक्षु व धर्मगुरू येथे तंत्रसाधना करत त्यांचे ब्रम्हचर्य व या विधींचा प्रभाव लक्षात घेता या काळात महिलांना प्रवेश नाकारला जातो. शारदीय नवरात्रीत महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला जातो तर वासंती नवरात्र म्हणजेच चैत्र नवरात्रीत महिलांना मंदिर परिसरातही येण्यास मनाई आहे.
दरम्यान, झारखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश यांसारख्या शेजारच्या राज्यांमधूनही मंदिराला वर्षभर भक्त भेट देतात. परंतु नवरात्री दरम्यान, महिलांना मंदिराचा गाभारा आणि मंदिर परिसरात बंदी आहे. नवरात्रीची नवमी पूजा विधी झाल्यावरच दसऱ्याच्या दिवशीपासून महिलांना मंदिरात प्रवेश दिला जातो.