Navratri Festival 2023 : हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला १५ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापना केली जाते. यानंतर पुढील नऊ दिवल दुर्गा मातेच्या विविध रुपांची मनोभावे पूजा- अर्चा, व्रत केले जाते. महाराष्ट्रातील अनेक देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत, जिथे नवरात्रोत्सव काळात भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. पण प्रत्येकाला या मंदिरांत जाऊन दर्शन घेणे शक्य नसते. अशावेळी मुंबईकर कामातून वेळ काढत मुंबईतील प्रसिद्ध आणि प्राचीन देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. यामुळे आपण नवरात्रीनिमित्त मुंबईतील प्राचीन आणि प्रसिद्ध नऊ देवींच्या मंदिरांबद्दल जाणून घेऊ… (Shardiya Navratri 2023)
मुंबईतील देवीची ९ प्रसिद्ध मंदिरे (Famous Mata Temples In Mumbai)
१) मुंबादेवी मंदिर, भुलेश्वर
मुंबईची ग्रामदैवता अशी मुंबादेवीची ओळख आहे. दक्षिण मुंबईतील काळबादेवी, भुलेश्वर परिसरात मुंबादेवीचे मंदिर आहे. हे मंदिर मुंबईतील लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. याच देवीच्या नावावरुन मुंबईचं नामकरण झालं आहे. एकेकाळी या मंदिराचा परिसर मोठी बाजारपेठ होती. तेव्हा येथील काही कोळी बांधवांनी मिळून या मंदिराची स्थापना केली. समुद्रापासून मुंबादेवी मुंबईचे रक्षण करते अशी कोळी बांधवांची आस्था आहे. त्यामुळे मुंबईतील कोळी समाजाची मुंबादेवी आराध्य दैवत मानली जाते.
२) महालक्ष्मी मंदिर, मुंबई सेंट्रल
मुंबईतील सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे महालक्ष्मी मंदिर. या मंदिरामागेही मोठा इतिहास आहे. १८३१ मध्ये धाकजी दादाजी या हिंदू व्यापाऱ्याने हे मंदिर उभारलं. यानंतर १७८५ या मंदिरात देवीची स्थापना झाली, याशिवाय मंदिरात त्रिदेवी देवी महाकाल, महालक्ष्मी आणि महासरस्वती देवींच्या मूर्त्या आहेत. या मंदिरात नवरात्रोत्सव काळात दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात.
३) प्रभादेवी मंदिर, प्रभादेवी
मुंबईतील देवीच्या सर्वात प्राचीन मंदिरांमध्ये प्रभादेवी मंदिराचे नाव घेतले जाते. या मंदिराला ३०० वर्षांचा असा इतिहास आहे. दादरजवळील प्रभादेवी येथे हे मंदिर असून मंदिरातील देवीची मूर्ती १२ व्या शताब्दीची आहे. या मंदिराला प्रभावती देवी मंदिर या नावेही ओळखले जाते. प्रभादेवी मंदिरातील मुख्य देवता असलेल्या देवीला शाकंभरी देवी म्हटले जाते. या मंदिरामागेही मोठा इतिहास आहे. नवरात्रोत्सव काळात दादर, प्रभादेवी परिसरातील अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात.
४) शीतलादेवी मंदिर, माहिम
मुंबईतील माहिम परिसरात असलेल्या एकमेव असं देवीचे मंदिर जिथे विविध धर्माचे लोक दर्शनासाठी येतात, हे मंदिर म्हणजे शीतलादेवी मंदिर. या मंदिरालाही ३०० वर्षांचा इतिहास आहे. या मंदिरातील शितला देवीची मूर्ती स्वयंभू असून जी कोळी बांधवांना सापडली होती. यामुळे कोळी बांधवांसह पाठारे प्रभु , सूर्यवंशी, आगरी समाज आणि राजस्थानी समाजाची ही कुलदेवता मानली जाते. या मंदिर परिसरात तुम्हाला हनुमान, गणेश, शांता दुर्गा त्रिमूर्ती काली, विठ्ठल रुक्मिणीचे मंदिरांचे दर्शन घेता येते. तसेच खोकला बरा करणाऱ्या खोकला देवीचेही मंदिर आहे. नवरात्रीत भाविकांची याठिकाणी मोठी गर्दी असते.
५) सात आसरा मनमाला मंदिर, माहीम
मुंबईतील माटुंगा परिसरात सात आसरा मनमाला देवीचे मंदिर आहे. ही देवी माहिम, माटुंग्याची ग्रामदेवता मानली जाते. नवरात्रीनिमित्त १९७१ पासून मंदिरात देवीची उत्सव मूर्ती बसवण्यात आली आहे. दोनशे वर्षांचा इतिहास असलेले हे मंदिर आहे. पूर्वी येथे एक तलाव होते त्या तलावाचे नाव होते मनमाला, त्याच नावावरून या देवीचे नाव ठेवण्यात आले असे येथील स्थानिक सांगतात. मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची सात स्वयंभू मुर्त्या आहे. यात खोकला देवी, शीतला देवी, मनमाला देवी, केवडावती देवी, चंपावती, जरीमरी, संतोषी देवीचा समावेश आहे.या सातही देवींमुळे या मंदिराला सात आसरा मनमाली देवी म्हणून संबोधले जाते.
६) काळबादेवी मंदिर, काळबादेवी
मुंबईतील सर्वात जुन्या आणि मुख्य बाजारापेठ असलेल्या काळबादेवी परिसरात काळबादेवीचे मंदिर आहे. या मंदिरामागेही ३०० वर्षांचा इतिहास आहे. मंदिरातील महाकालिमातेची मूर्ती काळबादेवी म्हणून ओळखली जाते. यातील देवीची मूर्ती जवळपास ५०० वर्षे जुनी आहे. या मंदिरात आजही अत्यंत साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात देवीच्या दर्शनासाठी भक्तगण दूरवरुन येत असतात.
७) जीवदानी माता मंदिर, विरार
विरार रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला असलेल्या डोंगरावर जीवदानी मातेचे मंदिर वसले आहे. जे अत्यंत प्राचीन आहे. या मंदिराची निर्मिती पाच पांडवांनी वनवासात असताना केली अशी आख्यायिका सांगितली जाते. येथील वीरा गुहेत पांडवांनी देवीच्या मूर्तीची स्थापना केली होती. जीवदानी मातेच्या दर्शनासाठी जाण्यासाठी भक्तांना जवळपास १३०० पायऱ्या चढाव्या लागतात. नवरात्रोत्सव काळात या मंदिरातील देवीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी असते.
८) गोल्फादेवी मंदिर, वरळी
मुंबईतील वरळी परिसरात उंच टेकडीवर वसलेले गोल्फादेवीचे मंदिर कोळी बांधवांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात गोल्फादेवीसह साकबादेवी व हरबादेवीचीही मूर्ती आहे. या देवाच्या मंदिरात कौल लावण्याची प्रथा पार पूर्वापार चालत आली आहे. देवीच्या तिनही मूर्ती पाषणाच्या आहेत. नवरात्रोत्सव काळात कोळी बांधवांसह मुंबईतील अनेक भक्तगण दर्शनासाठी या मंदिरात येतात.
९) हरबादेवी मंदिर, विरार
विरारमधील टाटोळे तलावाच्या परिसरातील हरबादेवी मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या मंदिराची स्थापना १८६० साली झाली. या मंदिरातील मूर्तीची स्थापन बैरागी घराण्याने केली आहे. स्थानिक मराठी समुदायात ही हरबादेवी म्हणून ओळखली जाते तर गुजराती समुदायात ही शीतलादेवी म्हणून प्रसिद्ध आहे.
अशाप्रकारे मुंबईत देवीची इतरही प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरं आहे, जिथे नवरात्रोत्सावादरम्यान भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. असा काही मंदिरांबद्दल तुम्हाला ठावूक असल्यास आम्हाला कमेंट्स करुन सांगा.