विरारच्या निसर्गरम्य अशा परिसरातील मारंबलपाडा येथे श्री सोनुबाई भवानी देवीचे मंदिर आहे. अनेक वर्षे जुने असलेल्या मंदिराचे तीन वर्षांपूर्वी नूतनीकरण करून जीर्णोद्धार झाल्याने मंदिराची प्रसिद्धी अधिकच वाढली आहे त्यामुळे शारदीय नवरात्री उत्सव ही मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे.
वसई तालुक्यातील विरार पश्चिमेला चिखलडोंगरे रोड लगत पूर्वी च्या ‘खडकीबंदर’ व आताच्या मारंबळपाडा गावच्या वेशीवर श्री सोनुबाई भवानी मंदिर सुमारे १०० वर्षापूर्वी पासूनचे प्राचीन जागृत देवस्थान आहे. या देवीची मूर्ती पाषाणात कोरलेली व वाघावर विराजमान मूर्ती शेततळ्यात सापडली असल्याची माहिती जुने जाणकार ग्रामस्थ सांगतात.
पूर्वी चे मंदिर हे भात शेतीच्या मधोमध चारमोळी कौलारू असे मंदिर होते. सन १९३२ साली कै श्री लक्ष्मण चांगो पाटील (मुकादम) डोंगरपाडा यांच्या पुढाकाराने कै श्री रामचंद्र पेंटर रा. जूचंद्र व त्यांचे इतर सहकारी ह्यांनी मिळून त्यावेळी प्रथम रंगकाम केले होते. श्री रामचंद्र कृष्णा पाटील रा. निळेगाव-नालासोपारा यांना झालेल्या दृष्टांतानुसार माघ करू. ७ शके १९१० मंगळवार दि. २८ फेब्रुवारी १९८९ पासून त्यांच्या शुभ हस्ते दैनंदिन पूजा अर्चा करण्यास सुरुवात झाली तसेच वार्षिक शारदीय नवरात्रोत्सव व इतर वार्षिक उत्सव साजरे करण्यास प्रारंभ झाला. पंचक्रोशीतील डोंगरपाडा,मारंबळपाडा व नारिंगी गावांतील काही दानशूर मंडळी व ह्या तिन्ही गावांच्या सामाईक संस्था जय भवानी रेती उत्पादक सहकार संस्था यांचे मार्फत मंदिराची वेळोवेळी डागडुजी करण्यात येत असे.
हेही वाचा… वसई : तरुणींना प्रेमजाळात ओढून बलात्कार करणारा डॉक्टर गजाआड, आतापर्यंत ३ गुन्हे दाखल
दरम्यान च्या काळात देवीच्या भक्तांचा ओघ पाहता अध्यक्ष नरसिंह दादू पाटील ह्यांच्या नेतृत्वाखाली सोनूबाई भवानी देवी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून सदर मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम डिसेंबर २०१२ पासून हाती घेण्यात आला होता. जीर्णोद्धार करते वेळी येणाऱ्या देवी भक्तांना एकाच ठिकाणी नवदुर्गा दर्शन घेता यावे हा निर्णय घेऊन श्री गणेश, ग्रामदेवता श्री ब्रम्हया देव व सोनुबाई भवानी माता सह, श्री एकविरा माता, श्री रेणुका माता, श्री सप्तशृंगी माता, श्री तुळजाभवानी माता, श्री कालिका माता, श्री महालक्ष्मी माता, श्री महिषासुरमर्दिनी माता, श्री शितला देवी माता आशा नव दुर्गा मूर्तींची नवीन मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. २० डिसेंबर २०२१ रोजी नवीन तयार करण्यात आलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव, चैत्री नवरात्रोत्सव, जीर्णोद्धारसोहळा, वर्धापन दिन ई. प्रसंगी पंचक्रोशीतील तसेच पालघर, ठाणे ,रायगड या जिल्ह्यातून अनेक भाविक श्रद्धेने श्री भवानी मातेचे दर्शनासाठी येत असतात. मंदिर ट्रस्ट च्या माध्यमातून गरीब गरजू लोकांना लग्नकार्यात मदत म्हणून अत्यल्प दरात लग्नकार्य केले जाते. तसेच शैक्षणिक व सामाजिक कार्यात हातभार लावला जात आहे असे येथील सदस्यांनी सांगितले आहे.
पर्यटनस्थळामुळे भक्तांचा ओढा वाढला
विरारच्या मारंबळपाडा परिसर अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे. नुकताच कांदळवन विभागा तर्फे येथील परिसर हा पर्यटन केंद्र म्हणजे विकसित करण्यावर भर दिला जाऊ लागला आहे. या भागातील जेट्टी परिसर, माहिती केंद्र, फेरी बोटची सफर, मत्स्यपालन अशा विविध कारणांमुळे चर्चेत आहे. अनेक पर्यटक येथील भागाला भेट देतात. गावाच्या वेशीवर असलेले श्री सोनूदेवीचे मंदिर व मंदिराच्या आजूबाजूचा निसर्गरम्य असा परिसर यामुळे येथून ये जा करणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधुन घेणारा आहे. त्यामुळे पर्यटनाच्या निमित्ताने आलेले नागरिक सुध्दा आवर्जून या मंदिराला भेट देतात म्हणून या देवीची प्रसिद्धी वाढू लागली आहे.