दीपक महाले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जळगाव: महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना वेगळे करणार्या सातपुडा पर्वतराजीत निसर्गरम्य परिसरात श्रीक्षेत्र मनुदेवी हे खानदेशवासियांचे कुलदैवत वसले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त राज्यभरातील देवीभक्तांची दररोज दर्शनासाठी गर्दी होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील बर्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर यावल-चोपडा रस्त्याच्या उत्तरेस असलेल्या कासारखेडे-आडगावपासून साधारण आठ किलोमीटरवर मनुदेवीचे प्राचीन हेमाडपंती मंदिर आहे. मंदिराचा परिसर चारही बाजूंनी पर्वतराजी आणि हिरवळीने नटलेला आहे. आडगाव आणि पुढे अगदी सातपुड्याच्या पायथ्याशी मनापुरी हे आदिवासी समाजाचे टुमदार खेडे आहे. खरेतर या मनापुरी गावापासूनच पर्यटनस्थळाला प्रारंभ होतो. वळणदार रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा उंच टेकड्या, घनदाट सागवानी वृक्षराजी, नाल्यांतून वाहणारे पाणी, पक्ष्यांचा किलबिलाट अशा निसर्गरम्य व मनमोहक वातावरणात मनुदेवी हे पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, या ठिकाणी पर्यटक व भाविक अशी दोघांची मोठी गर्दी होत असते.
आणखी वाचा- अपुऱ्या सुविधांमुळे उद्योजकांचे हाल, मनपातील बैठकीत चर्चा
चिंचोलीपासूनच सातपुडा पर्वताचे दर्शन होते. मंदिराच्या परिसरात सात ते आठ विहिरी आढळतात. मंदिरातील मनुदेवीची काळ्या पाषाणाची शेंदूर लावलेली मूर्ती, गणपती, तसेच शंकराची पिंड, अन्नपूर्णा मातेची मूर्ती मंदिराचे बांधकाम करताना उत्खननात सापडल्या आहेत. मंदिराच्या चोहोबाजूंनी उंच कडे आहेत. मंदिरासमोर सुमारे चारशे फूट उंचीच्या कड्यावरून कोसळणारा कवठाळ नदीचा धबधबा भाविक तसेच पर्यटकांचे आकर्षण असतो. कवठाळ नदीचे पाणी पाझर तलावात अडविण्यात आले आहे. वर्षातील सहा ते सात महिने कोसळणार्या या धबधब्याचे पाणी पाझर तलावात येते. शासनाच्या मदतीने तो बांधण्यात आला आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने धबधबा मूळ स्वरुपात कोसळताना दिसत नाही. मंदिर परिसरात पोहोचल्यावर जवळपास शंभर-सव्वाशे पायर्या चढून मंदिरात जावे लागते.
मंदिरात वर्षभरातून चार यात्रा
मनुदेवीच्या वर्षभरातून चार यात्रा भरतात. चैत्र माघ शुद्ध अष्टमीला नवचंडी महायज्ञ होतो. पोळ्याच्या दुसर्या दिवशी पिठोरी अमावास्येला यात्रा भरते. नवरात्रोत्सवाचे पूर्ण दहा दिवस यात्रा असते. खान्देशातील नवदाम्पत्य देवीच्या दर्शनानंतरच संसाराला सुरुवात करतात. पूर्वी मनुदेवीला येण्यासाठी सातपुड्याच्या जंगलातून केवळ एकच पायवाट होती. आता तेथे शासन व सातपुडा निवासिनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने खडीकरण व काँक्रिटीकरण करण्यात आले आहे.
आणखी वाचा-नाशिक जिल्ह्यात ११ लाख स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम, ग्राहकांपेक्षा वीज कर्मचाऱ्यांना अधिक लाभ
अशी आहे आख्यायिका
मनुदेवीच्या इथल्या वास्तव्याची आख्यायिका सांगितली जाते. इसवी सन पूर्व १२०० मध्ये सातपुडा पर्वत परिसरातील गायवाडा येथे ईश्वरसेन नावाचा गवळी राजा राज्य करीत होता. त्याच्याकडे भरपूर गायी होत्या. त्यातील काही गायी महाराष्ट्रातील तापी नदीवर, तर काही मध्य प्रदेशातील नर्मदेवर पाणी पिण्यास जात असत. त्या काळी मानमोडी आजाराची साथ सातपुडा परिसरासह खानदेशात पसरली. मानमोडीने अनेक लोक व गायी मृत्युमुखी पडल्या. मानमोडी टाळण्यासाठी ईश्वरसेन राजाने गाववाडापासून तीन किलोमीटरवर जंगलात इसवी सन पूर्व १२५० मध्ये मनुदेवीची स्थापना केली. देवीचे मंदिर उभारले. मानमोडी व दानवापासून देवांचे रक्षण करण्यासाठी मनुदेवीने अवतार धारण केला, असा उल्लेख देवी भागवतातही आढळतो. भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी मनुदेवी सातपुड्यात वास करेल, असे श्रीकृष्णाने मथुरेला जाताना म्हटले होते, अशी आख्यायिका आहे.
मंदिराचा इतिहास
बर्हाणपूर- अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील यावल तालुक्यातील चिंचोली गावापासून उत्तरेला सातपुडा पर्वताच्या रांगेत 12 किलोमीटरवर मनुदेवी मातेचे हेमांडपती मंदिर आहे. मानापुरी या आदिवासी गावापासून मनुदेवीचे मंदिर चार ते पाच किलोमीटरवर आहे , म्हणजे सहा किलोमीटर संपूर्ण सातपुड्याच्या जंगलातूनच प्रवास करावा लागतो. मनुदेवी मंदिराकडे जाताना वाटेला मारोतीचे छोटे मंदिर आहे. मनुदेवी मातेचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक प्रथम येथूनच माथा टेकवून पुढे प्रवास करतात.
आणखी वाचा-अमली पदार्थ, भ्रष्टाचाराविरोधात आता पथनाट्याद्वारे जनजागृती, मानवी साखळीवेळी काँग्रेसचा संकल्प
मनुदेवी मंदिरापर्यंत कसे जाल?
हे स्थान जळगाव जिल्ह्यातील चोपडा-यावल रस्त्यावर आहे. आडगाव फाट्यापासून पुढे सात किलोमीटर आहे. मनुदेवीला जाण्यासाठी चोपडामार्गे तसेच भुसावळमार्गे यावलला जाता येते. तेथून यावल-चोपडा रस्त्यावर सात किलोमीटरवर मनुदेवी हे तीर्थक्षेत्र आहे. मनुदेवीला जाण्यासाठी यावल, जळगाव, भुसावळ, चोपडा येथून बससेवा उपलब्ध आहे.