दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आहे. यातच घरोघरी साफसफाई, बाजारात खरेदी, स्त्रियांची फराळाची तयारी चालू आहे. दिवाळीला दारात कंदील, पणत्या तर दारात दररोज छान रांगोळी काढली जाते. रांगोळी काढण्यासाठी बाजारात विविध सामान उपलब्ध आहेत. पण, अनेकदा असं होतं की, तुम्ही खरेदी करताना रांगोळीत रंग भरण्यासाठी काही रंग आणायला विसरता किंवा तुमच्या मनासारखा रंग तुम्हाला मिळत नाही. अशा वेळी तुम्ही गेल्यावर्षीचे जुने रंग वापरून किंवा जे तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्याच रंगांमधून तुम्ही वेगळा रंग घरीच तयार करू शकता. रांगोळी कोणत्या रंगाने आकर्षित कराल आणि कोणते रंग तुम्ही घरी तयार करू शकता, याच्या काही खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अनेक जण खूप छान रांगोळी काढतात, पण रंग भरताना त्यांना कोणता रंग भरायचा यात अनेकांची गडबड होते आणि मग काढलेली रांगोळी आकर्षित दिसत नाही. तर या पुढील टिप्सचा तुम्ही नक्की उपयोग करून बघू शकता.

रंग कसे तयार कराल :

  • तांबडा आणि पिवळा रंग मिक्स करून तुम्ही ‘नारंगी’ रंग तयार करू शकता.
  • पिवळा आणि हिरवा रंग मिक्स करून ‘पोपटी’ रंग तयार करा.
  • हिरवा आणि काळा रंग मिक्स केलात तर ‘काळसर हिरवा’ हा अनोखा रंग तुम्हाला तयार झालेला दिसेल.

पांढरी रांगोळी मिक्स करून पुढील आकर्षक रंग तुम्ही तयार करू शकता :

  • पिवळ्या रंगात थोडी पांढरी रांगोळी मिक्स केलीत तर तुम्हाला ‘पुसट पिवळा’ हा रंग तयार होईल.
  • काळ्या रंगात पांढरी रांगोळी मिक्स केलीत तर तुम्हाला ‘राखाडी’ रंग तयार झालेला दिसेल.
  • नारंगी आणि पांढरी रांगोळी मिक्स करून तुम्हाला ‘बदामी’ रंग तयार झालेला दिसेल.
  • तसेच जांभळ्या रंगात पांढरी रांगोळी मिक्स केल्यावर तुम्हाला ‘कोनफळी’ हा रंग तयार झालेला दिसेल.

रांगोळी काढताना तुम्ही या रंगांच्या रंगसंगती (Combination) वापरू शकता :

  • नारंगी आणि निळा
  • गुलाबी आणि हिरवा
  • तांबडा आणि आकाशी
  • तपकिरी आणि पोपटी
  • मोरपिशी आणि काळा
  • पिवळा, जांभळा आणि गुलाबी

टीप :

  • दोन गडद रंग शेजारी-शेजारी वापरू नये.
  • दररोज रांगोळीचे रंग बदलत राहावेत. कारण रांगोळीचे सौंदर्य रंगावर अवलंबून असते.
  • लहान रांगोळीत दोन किंवा तीनच रंग भरावेत.
  • रांगोळी पूर्ण काढून झाल्यावर वरून चमकी (सोनेरी, चंदेरी) टाकावी, त्यामुळे रांगोळी आणखीन आकर्षित दिसते.

दिवाळीत रोज विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे नवीन रंग घरच्या घरी तयार करू शकता आणि तुमची रांगोळी आकर्षित करू शकता.

Story img Loader