Diwali 2023 Recipes : दिवाळी म्हटलं की, फराळ आणि फराळातील सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे ‘लाडू.’ फराळात बेसन, रवा लाडू हमखास केले जातात. तर आज आम्ही तुम्हाला एक खास लाडूची रेसिपी सांगणार आहोत, ज्याचे नाव आहे ‘शेव लाडू.’ हा पदार्थ तुम्ही नक्की घरी बनवून बघा आणि तुमच्या फराळात याचा समावेश करा. चवीला वेगळा आणि खास पारंपरिक ‘शेव लाडू’ पदार्थाची रेसिपी पाहूयात…

साहित्य :

  • एक किलो बेसन पीठ (जाडसर दळून घ्यायचं)
  • एक किलो साखर
  • मीठ
  • हळद
  • पाणी
  • वेलची पावडर
  • काजू, बदाम, मनुके
  • साच्यात शेवाचे पान लावून घ्या.

कृती :

  • परातीत बेसनचं पीठ घ्या
  • त्यात मीठ, हळद आणि थोडं चमचाभर तेल घेऊन पिठात मिक्स करा आणि नरम मळून घ्या.
  • अर्धा तास पीठ तसंच ठेवा.
  • कढईत तेल गरम करायला ठेवा.
  • साचा घेऊन त्यामध्ये शेव बनवण्याचे पान लावून घ्या आणि त्यात मळून घेतलेलं पीठ घाला आणि साच्याच्या सहाय्याने तेलात शेव पाडून घ्या व शेव दोन्ही बाजूने नरम भाजून घ्या.
  • शेव दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेतल्यावर झाऱ्याच्या सहाय्याने शेव बाहेर काढा आणि एका परातीत काढून घ्या. तुम्ही हाताने किंवा मिक्सरनेसुद्धा शेवेला कुस्करून घेऊ शकता.
  • (टीप : जर तुम्हाला हाताने शेव कुस्करून घ्यायची असेल तर ती तेलातून काढल्यानंतर लगेच कुस्करून घ्या आणि जर मिक्सरमध्ये शेव बारीक करणार असाल, तर सर्व शेव तळून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.)
  • त्यानंतर पाक बनवून घ्या.
  • गॅसवर टोप ठेवा आणि त्यात एक ग्लास पाणी आणि एक किलो साखर पाक तयार होईपर्यंत मिश्रण हलवत राहा. पाक तयार झाला की त्याच्यावरून वेलची पावडर, काजू, बदाम, मनुके टाका आणि सगळ्यात शेवटी कुस्करून घेतलेली शेव त्यामध्ये घाला आणि मिश्रण एकजीव करून घ्या.
  • मिश्रण थोडं थंड झाल्यावर लाडू वळून घ्या.
  • अशा प्रकारे तुमचे ‘शेव लाडू’ तयार.

Story img Loader