प्रथमेश गोडबोले
पुणे : Navratri 2023 Marathi News मावळ तालुक्यातील वेहेरगांव, कार्ला येथील एकविरा देवीच्या मंदिर परिसरात १५ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव यात्रा सुरु होत आहे. यात्रा कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता जड, अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रसृत केले. वेहेरगांव, कार्ला येथे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून कार्ला फाटा ते श्री एकविरा देवी पायथा मंदिर दरम्यान १५ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण वेळ जड, अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील. २१ ते २३ ऑक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधीत सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर लोणावळा-कुसगांव बुद्रुक पथकरनाका-वडगांव फाटामार्गे पुण्याकडे जाणारी जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करुन ती खंडाळा-कुसगांव पथकर नाकामार्गे नवीन द्रुतगती मार्गावरुन पुण्याकडे जातील.
हेही वाचा >>> नवले पुलाजवळ सिमेंट वाहतूक करणारा ट्रक उलटला; वाहतूक काही काळ विस्कळीत
दरम्यान, २१ ते २३ ऑक्टोबर या तीन दिवसांत सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत जुना पुणे-मुंबई महामार्गावरुन वडगांव तळेगांव फाटा – लोणावळा – मुंबईकडे जाणारी जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करुन ती तळेगाव फाटा येथून उर्से खिंड, उर्से पथकरनाका मार्गे नवीन द्रुतगती मार्गावरून मुंबईकडे जातील. हे आदेश लागू केल्यानंतर काही विधीग्राह्य मुद्दा उपस्थित झाल्यास त्यानुसार सुधारित आदेश काढण्यात येणार आहेत. नागरिकांनी वाहतूक बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आले आहे.