Best places to shop for Navratri : रविवारी १५ ऑक्टोबर २०२३ रोजी घटस्थापना आहे. नवरात्रीला या वर्षी १५ ऑक्टोबरपासून सुरुवात होईल, तर २४ ऑक्टोबर रोजी दसऱ्याला समाप्ती होईल. या दरम्यान नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा केली जाते. तसेच नऊ दिवस देवीला नऊ रंगांच्या साड्या नेसवण्यात येतात आणि अनेक जण त्या त्या रंगांप्रमाणे कपडेसुद्धा परिधान करताना दिसून येतात. तसेच या नऊ दिवसांत महिला, स्त्रिया, लहान मुली आणि अनेक तरुण मंडळी गरबा खेळताना दिसतात. तर नवरात्रीत गरबा खेळताना अनेक जण पारंपरिक पोशाख घालायचे ठरवतात. यात स्त्रियांसाठी चणिया-चोळी, तर पुरुषांसाठी कुर्ता हा पोशाख ठरलेलाच असतो. तर आज आम्ही तुम्हाला नवरात्रीची खरेदी करण्यासाठी पाच उत्तम ठिकाणे सांगणार आहोत; येथून तुम्ही नवरात्री स्पेशल चणिया-चोळी, ड्रेस, कुर्ता, दागिने आणि अनेक नवनवीन पॅटर्नचे पोशाख खरेदी करू शकता…
१. विलेपार्ले :
विलेपार्ले पश्चिम येथील खोका मार्केटमध्ये तुम्हाला नवरात्री स्पेशल पोशाख, ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी, मोजडी तसेच भाड्याने चणिया-चोळीसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. तसेच तरुणांसाठी आणि पुरुषांसाठी खास नवरात्री स्पेशल पारंपरिक पोशाख जर तुम्ही शोधत असाल तर विलेपार्ले पूर्व विभागातील हनुमान रोड इथे तुम्हाला विविध रंग आणि अनोख्या प्रिंट असणारे कुर्ते मिळतील. हे खास पॅटर्न असणारे कुर्ता तुम्ही गरबा खेळताना घालू शकता आणि तुमच्या लूकची शोभा वाढवू शकता.
ठिकाण : १. २, दशरथलाल जोशी रोड, नवपाडा, कमला नगर, विलेपार्ले (पश्चिम) मुंबई,
२. दुकान क्रमांक २, सर्वमंगल अपार्टमेंट, हनुमान रोड, दत्त मंदिर रोड समोर, नवपाडा, विलेपार्ले (पूर्व)
२. मालाड :
तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसाठी एकाच ठिकाणी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. स्टेशनपासून तीन मिनिटांच्या अंतरावर मालाड पूर्व येथील एक न्यू मुन्सिपल मार्केट आहे. इथे तुम्हाला नवरात्रीसाठी चणिया-चोळी, लहान मुलांसाठी नवरात्री स्पेशल ड्रेस, महिलांसाठी तसेच पुरुषांसाठी केडिया धोती सेट (Kediya Set) तुम्ही इथून खरेदी करू शकता. तसेच फक्त सिंगल ब्लाउज, घागरा आणि रंगीबेरंगी जॅकेट तुम्हाला हवं असेल तर तेही इथून खरेदी करू शकता आणि नवरात्रीसाठी तयार होऊ शकता.
ठिकाण : हस्तमेलाप कलेक्शन, न्यू म्युनिसिपल मार्केट, साईनाथ रोड, मालाड (पश्चिम)
३. बोरिवली :
तुम्हाला जास्त खर्च न करता जर स्वस्तात मस्त खरेदी करायची असेल तर तुम्ही बोरिवली स्ट्रीट मार्केटला जाऊ शकता. हे सणासुदींसाठी सर्वात स्वस्त मार्केट म्हणून ओळखले जाते. हे चणिया-चोळीचं सगळ्यात मोठं मार्केट आहे. इथे रंगीबेरंगी मोजडी, ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी तसेच विविध रंगांचे आणि अनोख्या प्रिंट असलेले उत्तम घागरे तुम्हाला आकर्षित करतील. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी तुम्ही इथे नवरात्रीसाठी खरेदी करू शकता.
४. भुलेश्वर मार्केट :
आता नवरात्रीसाठी तुम्ही छान चणिया-चोळी, कोटी किंवा घागरा घालणार असाल तर त्यावर शोभेल अशी ज्वेलरीसुद्धा हवी. तर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी खरेदी करण्यासाठी तुम्हाला भुलेश्वर मार्केट हा उत्तम पर्याय निवडू शकता आणि होलसेलच्या दरात वस्तू खरेदी करू शकता. इथे तुम्हाला वर्क असलेले ऑक्सिडाइज्ड झुमके, बांगड्या, कडे, ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी, ठुशी, ब्रेसलेट, अंगठ्या तसेच गळ्यात घालायला नवरात्री स्पेशल रंगीबेरंगी ज्वेलरी इथून तुम्ही खरेदी करू शकता आणि तुमच्या सौंदर्याची शोभा वाढवू शकता.
५. ठाणे :
नवरात्री नऊ दिवस असते आणि या दिवसांमध्ये आपण सगळेच त्या त्या दिवशी रंगाप्रमाणे कपडे परिधान करतो आणि मस्त फोटोज, सेल्फी काढतो. तर तुम्हाला ऑफिस किंवा कॉलेजमध्ये घालून जाण्यासाठी नवरात्रीच्या नऊ रंगांचे ड्रेस शोधत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. इथे तुम्हाला ड्रेस, शॉर्ट कुर्ती, अनारकली ड्रेस, प्लाझो सेट यासारखे उत्तम पर्याय दिसतील.
ठिकाण : डोरी फॅब गोखले रोड, फास्टट्रॅक स्टोअरच्या बाजूला, शिवाजी पथ, नौपाडा, ठाणे (पश्चिम)
सोशल मीडिया ॲप इन्स्टाग्रामवरून @__prernamahdev यांच्या अकाउंटवरून हे व्हिडीओ घेण्यात आले आहेत. नवरात्रीची खरेदी करण्यासाठी तुम्ही या ठिकाणांना नक्की भेट द्या आणि नवरात्री आणखीन खास करा…