मयुर ठाकुर
भाईंदर : रविवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरवात झाली आहे. या नवरात्रोत्सवानिमित्ताने भाईंदर पश्चिम उत्तन येथील सुप्रसिद्ध असलेल्या धारावी देवी मंदिरातही नवरात्री उत्सवाचा उत्साह दिसून येत आहे.त्यामुळे या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनाला येत आहेत.
भाईंदर पश्चिम येथील समुद्र किनारी वसलेल्या तारोडी गावात आई धारावी देवीचे साधारण तीनशे वर्षहून अधिक जुने असे मंदिर आहे. मीरा भाईंदर, नवी मुंबई, वसई आणि पालघर येथे वसलेल्या आगरी-कोळी समाजाची ग्राम देवता म्हणून धारावी ओळखली जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीमंत पेशवे नरवीर चिमाजी अप्पा हे वसईच्या मोहिमेला आले असता त्यांनी या मंदिराची निर्मिती केली असावी, अशी आख्यायिका आहे.
आणखी वाचा-विरारच्या जीवधन गडावर नवरात्रीनिमित्ताने जीवदानी देवीचा जागर
मंदिर खूपच जुने असले तरी ग्रामस्थांनी आणि मंदिर ट्रस्टने वेळेवळी यात आधुनिक बदल करून आवश्यक असे नूतनीकरण केले आहे.नुकतेच या मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात आला आहे.तर मंदिर ट्रस्ट ने देखील मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे.यात देवीच्या मंदिराला भव्य स्वरूप देऊन ते काळ्या पाषाणात तयार केले जाणार आहे.त्यानुसार या कामास सुरुवात झाली असून मंदिराभवती खोदकाम केले जात आहे. मात्र नवरात्री निमित्त भाविकांना देवींचे दर्शन घेता यावे म्हणून विशेष अशी सोय करण्यात आली आहे.
आई धारावी देवी मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो.या नऊ दिवसात मंदिरात धूप आरती, महापूजा, भजन, कीर्तन, हरिपाठ, गरबा नृत्य पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम आई धारावी देवी न्यासातर्फे आयोजित करण्यात आले आहेत.तर येणाऱ्या भाविकांसाठी पाणी, नाष्टा व स्वच्छता गृह यादी गोष्टीची सोय मंदिर व्यवस्थापकांकडून करण्यात येत आहे.
आणखी वाचा-सातारा: पांडे गावचे काळभैरनाथाचे उभ्याचे नवरात्र
नऊ दिवस आई धारावी मातेचे दर्शन घेण्यासाठी मीरा भाईंदर यासह विविध ठिकाणाहून लाखो भाविक भक्त भेट देतात. निसर्गरम्य अशा ठिकाणी हे मंदिर असल्याने येथे आल्यानंतर भाविकांना प्रसन्न वातावरणाचा आनंद घेता येतो.
भाविकांच्या संख्येत यंदा मोठी वाढ
धारावी देवी ही स्थानिक आगरी-कोळी भूमीपुत्राची ग्राम देवी असल्यामुळे यापूर्वी मंदिरात आसपासच्या भागातील भाविकभक्त दर्शनाला येत होते. मात्र मागील चार- पाच वर्षात समाज माध्यमांवर देवी बाबत मोठी जागृती झाल्यामुळे पर्यटनाच्या दुष्टीने येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.यंदा नवरात्री उत्सवात हजारोच्या संख्येने भाविक येत असल्याचे मंदिरातील विश्वस्तांकडून सांगण्यात आले आहे.