Navratri 2023: हिंदू पंचागानुसार, शारदीय नवरात्रीची सुरुवात दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून होते. त्यानुसार यंदाचा नवरात्रोत्सव रविवार, १५ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होत आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. या पूजेमुळे देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो असं मानलं जातं. नवरात्रीमध्ये नऊ दिवस भाविक देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात आणि उपवास करतात. तर नवरात्रीच्या पूजेमध्ये नारळ आणि सुपारीचाही प्रामुख्याने वापर का केला जातो? याबाबतची सविस्तर माहिती शैलेश अरविंद जोशी गुरुजी यांनी सांगितली आहे, ती जाणून घेऊया.
नवरात्रीच्या पूजेवेळी अनेक गोष्टींचा वापर केला जातो, त्यांना स्वतःचे असे महत्त्व आहे. पूजेत वापरण्यात येणारी सुपारी हे गणेशाचे प्रतीक मानले जाते. त्याचबरोबर पूजेतील नारळ हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या पूजेमध्ये या दोन्ही गोष्टींचा वापर केल्यास पूजा कोणत्याही संकटाशिवाय सुखरुप पार पडते.
हेही वाचा- नवरात्रीचे उपवास करताय? कसा असावा तुमचा आहार? मधुमेही अथवा गर्भवती महिलांनी उपवास करावा का?
पूजेमध्ये सुपारीचे महत्त्व –
असे मानले जाते की, पूजा संपल्यानंतर पूजेची सुपारी आपल्या जवळ ठेवल्यास त्याचे अनेक फायदे मिळू शकतात. यामुळे पैशांची कमतरता भासत नाही असंही मानलं जातं. त्याचबरोबर नवरात्रीच्या पूजेवेळी सुपारीवर जानवे गुंडाळावे आणि पूजेनंतर ही सुपारी धनाच्या जागी ठेवावी, असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदू शकते. नारळ आणि सुपारी हे अनेक देवतांच रुप मानलं जातं; कारण देवांना नारळ दिल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. तसेच सुपारीलाही देवतांचे रुप मानले जाते. म्हणूनच गणपती किंवा देवीची पूजा करताना पूजा मांडताना सुपारी मांडली जाते.
पूजेत नारळ ठेवण्याचे फायदे –
नवरात्रीच्या पूजेमध्ये नारळ वापरणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की, ज्या घरामध्ये नारळाचा अभिषेक केला जातो त्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो. तसेच नवरात्रीमध्ये दुर्गादेवीसमोर एकाक्षी (एक डोळा (छिद्र) असणारा नारळ) नारळ ठेवून त्याची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते असंही मानलं जातं. त्यामुळे नवरात्रीच्या पूजेमध्ये नारळ आणि सुपारीचे पूजन प्रामुख्याने केलं जातं.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)