बुलढाणा: Navratri 2023 Marathi News नवरात्री उत्सवात भाविक प्रामुख्याने महिला व युवती दररोज विशिष्ट रंगाचे वस्त्र परिधान करतात. याला धार्मिक कारण आहे. पहिल्या माळ पासून शेवटच्या माळ पर्यंत विशिष्ठ रंगाचे वस्त्र घालून पूजा व अन्य विधी केल्यास दुर्गा माता प्रसन्न होते. संकटे दूर होऊन मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच मानसिक, अध्यात्मिक बळ मिळते. घट स्थापना पूर्वीच यंदाच्या नवरात्री साठी ‘वस्त्र रंग संहिता’ ठरली आहे.
यंदाच्या नवरात्रोत्सवात पहिल्या दिवशी १५ ऑक्टोबर ला नारंगी, १६ ला पांढरा तर १७ ला लाल रंग असा क्रम होता. त्यामुळे पहिले तीन दिवस या रंगाचा बोलबाला होता. आज बुधवारी गडद निळा( रॉयल ब्लु), १९ ला पिवळा, २० तारखेला हिरवा, २१ ला राखाडी, २२ ला जांभळा तर २३ ऑक्टोबरला मोरपंखी हिरवा असे रंग ठरविण्यात आले आहे. त्यामुळे नवमी पर्यंत बुलढाण्यात अशीच रंगाची उधळण होणार आहे.
हेही वाचा >>> अकोला : काँग्रेसमधील वादाचे सत्र ‘संपता-संपेना’; खुर्चीवरून प्रदेश पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची
बुलढाण्यात अलीकडे नवरात्रीत विशिष्ट रंगाचे वस्त्र परिधान करण्याची महिलांमधील ‘क्रेझ’ वाढल्याचे चित्र आहे. महाविद्यालयिन युवती, गृहिणी ते शासकीय निमशासकीय कर्मचारी महिला देखील ही मजेदार वस्त्र संहिता कटाक्षाने पाळतात. बुलढाण्यात अलीकडे याकडे महिलांचा कल वाढला असून हजारो महिला नऊ दिवसाकरिता असलेल्या रंगाचिच वस्त्रे घालताना दिसून येत आहे. काही हौशी दाम्पत्य देखील ही रंग संहिता पाळतात.