मोंगोलिआ आपल्याला माहीत असतो तो चेंगीझ खानचा देश म्हणूनच. जुन्या वास्तू, उद्यानं यांनी नटलेल्या उणे पन्नास अंश सेल्सिअसपर्यंत तापमान उतरणाऱ्या या देखण्या, जगावेगळ्या देशाचा फेरफटका.
मोंगोलिआ हा बाराव्या शतकातल्या चेंगीझ खानचा देश. तो रशिया आणि चीन या देशांच्या अनुक्रमे उत्तर व पूर्व पश्चिम, दक्षिण दिशांनी कोंडीत पकडल्यागत होता. या देशाला समुद्र नसल्याने जगातील काही ‘लॅण्ड लॉक कंट्रीज’पैकी हा एक देश. या देशावर बऱ्याचशा वेगवेगळ्या बौद्ध जमातींनी राज्य केले, पण ११२६ साली एका साधारण दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या चेंगीझ खानने स्वबळावर मोंगोलिआ आपल्या वर्चस्वाखाली आणला. जो प्रांत आपले वर्चस्व मान्य करणार नाही त्यांना नष्ट करून सीमा वाढवत तो थेट युरोपपर्यंत पोहोचला होता. असे सांगितले जाते की, त्याला स्वप्नात हिंदुस्थानात न जाण्याविषयी सुचवले गेले. जगात सर्वाधिक प्रांत आपल्या अखत्यारीत आणणारा तो एकमेव सम्राट होता. खान ही किंग किंवा राजा अशी पदवी होती. मोंगोलिआत चेंगीझ खानला गेंगीज् खान म्हणतात. पण तो मुस्लीम नसून बौद्ध धर्मीय होता.
त्याच्या पश्चात नातू, कुबलाई खान याने आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून आशिया खंडात आपली सीमा चीनपर्यंत वाढवली. बौद्ध धर्मातील शिआन्बी, रोरन, टर्कीक, शमन अशा काही पंथांपैकीच एक, युवान या घराण्याखाली राज्य आणले. त्यानंतरच्या पडत्या काळात वेगवेगळ्या पंथांच्या घराण्यातील अंतर्गत वादांचा फायदा घेऊन चीनच्या मांचुरिआ भागातील किन् घराण्याने मोंगोलिआवर वर्चस्व स्थापन केले आणि मग हा भाग चीनच्या अखत्यारीत गेला. येथे तिबेटीअन बौद्ध धर्म पसरू लागला होता. बरेच तरुण संन्यासी, बौद्ध भिख्खू झाले. त्या काळात भव्य मॉनेस्ट्रीज उभ्या राहिल्या. त्यात वेळी हजारो बौद्ध भिख्खू राहत असत.
१९२३ मध्ये सुखबतर याच्या अमलाखाली किन् घराण्यापासून मोंगोलिआ मुक्त झाले, काही काळानंतर हा प्रदेश रशियन वर्चस्वाखाली आला. सेरलीनच्या स्वाऱ्यांमध्ये या देशातल्या बौद्ध धर्माच्या बऱ्याचशा मोनेस्ट्रीज उद्ध्वस्त झाल्या, त्यातील सोन्याच्या मूर्ती चोरल्या गेल्या. १९९० साली रशियाचे तुकडे झाल्यानंतर त्यांचे वर्चस्व गेले, पण स्थानिक नक्षलवाद्यांनी नासधूस चालूच ठेवली. १९९२ मध्ये परत क्रांती होऊन तिथे बहुपक्षीय नवे सरकार आले. पण कम्युनिझम राज्यपद्धतीमुळे प्रजेचा बाह्य़ जगाशी संपर्कच नव्हता. त्यामुळे मातृभाषेशिवाय कोणतीही भाषा जादाकरून लोकांना परिचित करू दिली नाही.
उलान बतर ही मोंगोलिआची राजधानी. ४१ अंश अक्षांश आणि ८७ अंश रेखांश असे पृथ्वीतलावर स्थान असल्याने उत्तर ध्रुवाच्या नजीकचे एकमेव शहर आहे. येथे प्रदीर्घ व कडक हिवाळा असतो. जगातील सर्वात किमान म्हणजे उणे ५० अंश सेल्सिअसपर्यंत पारा उतरणारे हे एकमेव ठिकाण. वर्षभराचे सरासरी तापमान उणे एक अंश सेल्सिअस असते.
इथल्या राजधानीची पूर्वी बरीच वेगवेगळी नावे होती. वेळोवेळी तिच्या जागाही बदली होत गेल्या. १९२४ मध्ये लोकांनी केलेल्या चळवळीत शूर योद्धा दामादिन सुख याने देशाला चिनी पाशातून मुक्त केले. त्याला मोंगोलिअन चळवळीचा कर्ता असे ओळखले जाते.
उलान् म्हणजे शूर, बतर म्हणजे योद्धा. उलान् बतर ही शूर वीराची भूमी. मोंगोलिआ हे संपूर्णतया बौद्ध राष्ट्र. पण खान ही राजाची पदवी म्हणून सुखबतर खान. राजाच्या नावाचा चौक हा नगराच्या मध्यभागी असून तेथूनच वेगवेगळ्या दिशांचे अंतर मोजण्यात येते. चौकाच्या मध्यावर सुखबतरचा अश्वारूढ पुतळा आहे. तिथेच पार्लमेंट हाऊस असून मध्यावर चेंगीझ खानच्या भव्य पुतळ्याच्या डावी-उजवीकडे मुलगा ओगोडी व नातू कुबलाई खान यांचे पुतळे आहेत. जवळच फुलांनी बनवलेले उद्यान आहे. तिथे खास तिथला दोन कुबडांचा उंट, घोडा, मेंढी, बकरा असे स्थानिक प्राणी आहेत.
उलान् बतर येथील बहुतेक संग्रहालये सुखबतर चौकापासून चालत जाता येण्यासारखी आहेत. फक्त बॉग्ड खान विंटर पॅलेस व त्याजवळील झैसान मेमोरिअल येथे बस किंवा टॅक्सीने जावे लागते. मुख्य प्रवेशद्वारातून आपण विंटर पॅलेसमध्ये येतो. या ठिकाणी आवारात राजमहालाव्यतिरिक्त सहा देवळे आहेत. महालात राजाला वेगवेगळ्या देशांकडून आलेल्या भेटवस्तू आहेत. त्यात रशिअन झारकडून आलेले सोन्याचे बूट, थंडीमध्ये वापरायचा लांडग्यांच्या चामडय़ापासून बनवलेला कोट, राणीचा पेहराव, सिल्क कापडावर पेंटिंग करून केलेले थांका, जेवणाची भांडी असेच काही काही आहे. येथील सर्व काम लाकडी असून त्यावर आता रंगरंगोटी चालू आहे. येथे स्टालीन कालात नासधुशीमुळे बरेच नुकसान झाले होते.
जवळच रशियाने दुसऱ्या महायुद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांची आठवण म्हणून टेकडीवर झैसान मेमोरिअल हे स्मारक बांधले आहे. वाहनतळावरून ३०० पायऱ्या चढून गेल्यावर मात्र तुलु नदीच्या परिसरातील चौफेर पसरलेल्या उलान् बातरचा परिसर मस्त दिसतो. शिवाय टेकडीवर रशिया व मोंगोलिआ देशातील मैत्रीचे द्योतक म्हणून वर्तुळाकार चिन्ह आहे तसेच मोंगोलिअन स्वातंत्र्य लढय़ाच्या वेळी असलेल्या रशियन पाठिंब्याचे शिल्प आहे.
गंडेन मोनेस्ट्री ही १९व्या शतकातील पाचव्या जतसंदंबाच्या (धर्मप्रमुख) हुकमावरून बांधली गेली, आता आवारात त्यापैकी एक खांबच शिल्लक आहे. मोनेस्ट्रीमध्ये अवलोकितेश्वराचा २८ मी. उंचीचा तांब्याचा पुतळा आहे. त्याला सुवर्णपत्रांनी सजवले असून त्यावर बरीच रत्ने आहेत. असा हा जगातील एकमेव पुतळा आहे असे सांगितले जाते. मोंगोलिआ येथील सर्व मोनेस्ट्रीज् सारख्याच म्हणजे तेथे धर्माची सूत्रे, थांका, बुद्धाच्या वेगवेगळ्या मूर्ती, रेशमी धाग्यांनी बनवलेल्या टेपटस्ट्रीज पाहायला मिळतात. कम्युनिझमच्या काळात काही तोडल्या गेल्या तर काही सुटल्या. दररोज सकाळी नऊ वाजता प्रमुख लामा येऊन प्रार्थना झाल्याशिवाय आत कुणीही जाऊ शकत नाही. चोयजिन् लामा मोनेस्ट्रीही अशीच आहे.
१६व्या शतकात झानबझार हा तीन वर्षांचा मुलगा बुद्धाचा अवतार मानला गेला. इतक्या लहान वयात त्याला बुद्धधर्माची सूत्रे मुखोद्गत होती. जात्याच हुशार झानबझारने १२व्या वर्षी देवनागरीतील बौद्ध साहित्याचे भाषांतर करण्यासाठी सोयोंबो म्हणून लिपी तयार केली. पण रोजच्या व्यवहारासाठी अत्यंत क्लिष्ट असल्याने ती फारशी वापरात नाही. परंतु मोंगोलिआच्या झेंडय़ावर त्यातील अक्षरे अभिमानाने फडकत आहेत. झानबझार हा भाषा, कला, वैद्यकशास्त्र, लोहारकाम व त्यावर कलाकुसर करण्यात पटाईत होता. म्यूझियममध्ये त्याने केलेल्या थांका पेंटिंग्ज, ध्यानस्थ बुद्धाच्या पाच आणि ताराच्या २१ मूर्ती होत्या, शिवाय उत्खननात सापडलेला ब्राँझ युगातील काही भाग जो डिअर स्टोन म्हणवला जातो, तोही आहे.
उलान् बातरपासून ५४ कि. मी. अंतरावर तेरीलज् नदीच्या खोऱ्यात नॅशनल पार्क वसलेले आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारचे दगड व त्यांचेच डोंगर बनलेले आहेत. डोंगरमाथ्यावर खडकांची रचना अशी झाली आहे की पाहणाऱ्याला वाटते की कुणी म्हातारबाबा पुस्तक वाचत आहे. तसेच तिथे वेगवेगळ्या आकाराचे भले मोठे खडक आहेत. त्यापैकीच एक अगदी कासवासारखा दिसतो. त्याला टर्टल रॉक म्हटले आहे.
तेरीलज् व तुलु या नद्यांच्या प्रवाहामुळे तेथला परिसर हिरवागार आहेच. शिवाय पर्यटकांसाठी राफ्टिंग, रॉक क्लायंबिंगची तसंच निवासाची सोय आहे.
येथे एका लहानशा टेकडीवर आरियाबल् बौद्ध मेडिटेशन सेंटर आहे. पूर्वी येथे एक मोनेस्ट्री होती. त्यातूनच आताचे हे सेंटर झाले आहे. गेटपर्यंत आपण गाडीने जाऊ शकतो. पण पुढे झुलता पूल किंवा १०८ पायऱ्या चढून जावे लागते. वाटेत वेगवेगळी फुले व औषधी वनस्पतींची लागवड पाहायला मिळते. बौद्ध धर्माप्रमाणे पायऱ्या चढून वर देवळात पोहोचेपर्यंत आपले पापक्षालन होऊन शुचिर्भूत होतो. ही पांढऱ्या रंगाची मोनेस्ट्री एखाद्या हत्तीप्रमाणे दिसते तर तिच्या पायऱ्या हत्तीच्या सोंडेसारख्या दिसतात. आत नेहमीप्रमाणे बुद्धाच्या वेगळ्या अवतारातील मूर्ती आहे. तसंच पीठ, तूप यांच्यापासून तयार केलेली कलाकृती आहे.
उलान् बातरपासून थोडं पूर्वेलर्ा ेकाडावर चेंगीझ खानला ज्या ठिकाणी एक चाबूक मिळाला होता, त्या ठिकाणी त्याचा भव्य, अश्वारूढ, तलवार उगारलेला असा, स्टीलचा ४० मीटर उंचीचा चकचकीत पुतळा आहे. हा जगातील सर्वात उंच असा घोडय़ाचा पुतळा गणला जातो. या घोडय़ाच्या डोक्यावर जाण्यासाठी त्याच्या छाती आणि मानेतून लिफ्ट तसंच पायऱ्यांची सोय आहे. खाली असलेल्या व्हिजिटर्स सेंटरमधे चेंगीझ खानच्या चाबूक, तसंच बुटाची भव्य अशी प्रतिकृती करून ठेवली आहे. आसपास त्याच्या पुढच्या ३६ खानांचे पुतळे आहेत. बरोबरीने अतिप्रचीन काळच्या वस्तू, पोशाख वगैरेंचा संग्रह आहे.
येथून बाहेर आल्यावर हातात गरुड घेऊन फोटो काढण्याची सोय आहे. आपल्या कोपरापर्यंत चामडय़ाचे ग्लोव्ह घालून उंचावलेल्या हातावर पाच ते सहा किलो वजनाच्या गरुडाला बसवण्यात येते. अर्थात तो बांधलेला असतो. आपल्या हाताच्या संथ हालचालीने तो हलत असतो, पण प्रत्यक्षात तोच वजनदार असल्याने हातच हेलकावे खातो. गरुड पंख पसरून उडायला पाहतो, पण मदारीच्या हातात दोरी असते. या प्रकारात हात मात्र खांद्यापासून दुखायला लागतो.
मोंगोलिआ हे एके काळी कोळशाच्या उत्पादनात अग्रेसर होते. येथील खाणी नेहमी सारख्या जमिनीखाली नसून विवरासारख्या आहेत. पण गेल्या १५ वर्षांपूर्वी हा व्यवसाय बंद झाला. उलान् बातरपासून ४० कि.मी. अंतरावर नलाईख येथे खाणीत आपल्याला काही जागी नैतिक अथवा अनैतिकरीत्या कझाक लोक काम करताना दिसतात. नलाईख म्हणून भागात अजूनही पूर्वीच्या काळाप्रमाणेच राहणाऱ्यांची वस्ती आहे. आम्ही तेथे गेलो नाही.
मोंगोलिआ देशाच्या दक्षिणेला आशिया खंडातील मोठे गोबीचे वाळवंट आहे. पण इथे गंमत अशी आहे की या वाळवंटात नेहमीप्रमाणे वाळूचाच समुद्र नसून वाळू, सँड डय़ूनस्, खडकांचे डोंगर, खुरटय़ा झुडपांनी आच्छादलेला भाग आहे. तर परिघावर जरा उत्तरेकडे अगदी गुलमर्गसारखीच मऊशार हिरवी कुरणं, हिरवाईने नटलेले डोंगर आहेत. अशी नैसर्गिक विविधतेची विभागणी असल्याने त्याला गर्वान सैखान् नॅशनल पार्क म्हणतात. इथे आम्ही प्रथम गरमध्ये राहायला गेलो. गर म्हणजे तंबू. पण हा तंबू इटुकला पिटुकला नसून चांगला प्रशस्त असतो. फक्त झोपण्याची व्यवस्था असून सोलार वीजही असते, पण ठरावीक वेळेतच. रेस्टॉरंट, प्रसाधनगृह बाहेर जरा अंतरावर. गोबी डेझर्टचा विस्तारच ५००,००० चौ. मैल एवढा आहे. त्यावरून आपल्याला या देशाच्या अवाढव्यतेची कल्पना येईल.
हुस्ता नॅशनल पार्क हे गोबीच्या परिघावरील ग्रास लँडमध्ये येते. राजधानी उलान् बातरपासून अवघ्या दोन मैलांच्या अंतरावर हे पार्क आहे. पार्कच्या आतल्या भागात असणारे ताखी हॉर्स, जंगली घोडे पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. नेहमीच्या घोडय़ांच्या व ताखींच्या
गुणसूत्रात फरक आहे असे सांगण्यात येते. घोडे फार उंच नसून मान व पाय दणकट असतात. मानेवर आखूड, उभे केस असतात. मणक्यांच्या शेवटापासून पाच-सहा इंचांवर शेपटीला सुरुवात होते. इथेही केस फार लांब नसतात. त्यामुळे आपल्याला झुबकेदार पोनीटेल दिसत नाही.
ताखींविषयीचा खास इतिहास गाइडने सांगितला. १९व्या शतकात रशियन भूगोलतज्ज्ञ, निकोलाय प्रेवालस्की याला आशियाई जंगलात बुटके, मान व पाय दणकट, अंगावर करडी लव, नाकाभोवती पांढरा ठिपका, मानेवर आखूड उभे केस, असे वेगळेच घोडे पाहायला मिळाले. त्याचा गवगवा झालाच आणि ताखींना पाहण्यासाठी पाश्चिमात्य लोक मोंगोलिआला भेट देऊ लागले. त्या वेळी कुणी त्यांना हौसेखातर संग्रही नेले. खाण्यासाठी कत्तल किंवा आजारीपणामुळे मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी ताखींची संख्या नामशेष होण्याच्या मार्गावर होती. भविष्यात असे होऊ नये म्हणून इथल्या मादी नेऊन युरोप, अमेरिकेत पाळलेल्या ताखींपासून घोडय़ांची पैदास केली व त्यांना परत हुस्ता पार्कमध्ये सोडले गेले. आता त्यांची संख्या हजाराच्या आसपास आहे. ताखींशिवाय तिथे नीलगाय, कोल्हा, लांडगा, क्वचित स्नो लेपर्ड, वेगवेगळे प्रकारचे गरुड, लामागिया, ब्लॅक व्हलचर्स, वेगवेगळ्या वनस्पती, झाडे पाहायला मिळतात.
मोंगोलिआ हा लँड ऑफ हॉर्सेस व ब्लू स्काय म्हणून ओळखला जाणारा प्रांत. इथले ेघोडे हे जगत्विख्यात. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच मुलांना सवय असते. त्यामुळे हॉर्स रायडिंग येत नसलेली व्यक्ती विरळाच. अशा आगळ्यावेगळ्या देशात ‘नादम फेस्टिवल’ जुलै महिन्यात १२ व १३ तारखेला होतो, तर ‘गोल्डन ईगल फेस्टिवल’ ऑक्टोबरमध्ये असतो. नादम् हा सण डोंगरावर असणाऱ्या देवतांच्या मानार्थ असतो. पारंपरिक वेशात परेड करत सोहळ्याचे उद्घाटन असते. त्यात कुस्ती, तिरंदाजी, घोडय़ांची शर्यत असे कार्यक्रम असतात. स्पर्धेसाठी तट्टूवर चार ते सहा वर्षांची मुले स्वार होऊन आठ कि.मी. अंतर पार करतात. गळ्यातून वेगळे नाद काढून गाणे म्हणत प्रेक्षक स्पर्धकांना उत्तेजन देतात. गोल्डन ईगल फेस्टिवलमध्ये कझाकी लोक आपआपले गरुड घेऊन सजवलेल्या घोडय़ावरून डोंगरावर येतात. ससा, कोल्हा, लांडगा असे प्राणी त्याच्यासाठी भक्ष्य म्हणून सोडतात. गरुड या प्राण्यांची शिकार करतात. गरुड वेगाने शिकार करून दूरवरूनही आपल्या मालकाकडे कसा अचूक येतो यावरून त्याच्या मालकाचे त्याला शिकवण्याचे कसब कोणत्या दर्जाचे आहे हे ठरते. त्यानुसार बक्षीस देण्यात येते.
अतिथंडी, शेतीसाठी थोडय़ा प्रमाणात जमीन उपलब्ध या घटकांमुळे येथील जेवणात गाय, बकरी तसेच घोडीचे दूध आणि मांस, थोडय़ा फार प्रमाणात बटाटा, आणि ज्या भाज्या पिकतात त्या असतात. सणासुदीला रव्याच्या खिरीसारखा पदार्थ करतात. उलान् बातरसारख्या मोठय़ा शहरात रेस्टॉरंटमध्ये चायनीज, रशियन पद्धतीचे जेवण, पिझ्झा, काही प्रमाणात भारतीय जेवण मिळते. मंगोलीयन बार्बे क्यू म्हणजे हॉटेलात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, मांस, सॉस, सलाड असे ठेवलेले असते. त्यात आपण पाहिजे ते घेऊन खानसामाकडे द्यायचे. तो आपल्यासमोर सहा फूट व्यासाच्या तव्यावर घालून लगेच शिजवून देतो. हा तवा इतका मोठा असतो की तो एकावेळी चार-पाच लोकांना खाद्यपदार्थ तयार करून देऊ शकतो.
मोंगोलिआ आवर्जून पाहावा असा देश आहे. पण आपल्याला तेथे थेट जाता येत नसल्याने मुंबईहून हाँगकाँग, बीजिंग किंवा लंडन, मॉस्को, कोरियाद्वारे जावे लागते. जुलै ते सप्टेंबर हा तेथील सीझन असतो.
गौरी बोरकर – response.lokprabha@expressindia.com