लोकसत्ता दिवाळी अंक २०१७

संपादकीय

बाकी आवर्जून लिहायलाच हवं आणि अजिबात लिहू नये, असं बरंच काही या वर्षांत घडलं. गेल्या वर्षी शिशिरात सुरू  झालेली स्वस्थतेची पानगळ नवीन शिशिर आला तरी काही थांबायची लक्षणं नाहीत. स्थैर्याच्या कोवळ्या पालवीची किती वाट पाहायची, कुणास ठाऊक.

कोणत्याही देशातल्या नागरिकांना किमान आस असते ती या स्थैर्याची. प्रगतीचे घोडे चौखूर उधळतात ते फक्त कथा-कादंबऱ्यांत… प्रत्यक्ष जगण्याचं चाक कुरकुर केल्याशिवाय काही फिरत नाही, हे या नागरिकांना तसं कळत असतंच. त्यांची फक्त एकच इच्छा असते. धक्के नकोत. गती मंद असली तरी चालेल, पण धक्के नकोत अशीच प्रत्येकाची इच्छा असते. बरोबरच आहे ते. कारण व्यक्ती काय किंवा देश काय- ते मोठे होतात, त्यांची प्रगती होते ती काही एका निश्चित मार्गानं त्यांचा प्रवास सुरू असतो तेव्हाच. हा मार्ग कधी ना कधी आपल्याला त्या शिखरावर नेणार आहे, याची खात्री असते. नागरिकांना, आणि नागरिकांच्या बनलेल्या देशालाही. पण पायाखालचा मार्गच ब्रह्मपुत्रेच्या पात्रासारखी दिशा बदलायला लागला तर प्रवासाची उमेदच मरते. मग सगळा प्रयत्न असतो तो आहे ते धरून ठेवण्याचा. कारण पुढे जायला निघालो आणि रस्त्यानेच मार्ग बदलला तर काय, ही भीती.

जे झालं ते गेलं. पण पुढच्या वर्षी तरी हे असं काही होणार नाही अशी आशा बाळगू या. कॅमेऱ्याचा फ्लॅश प्रकाशमान खराच; पण डोळे दिपवण्याच्या निमिषाखेरीज काही तो देत नाही. त्यापेक्षा दिवाळीतली आपली पणती बरी. मंद का असेना; पण शांत, संयत, एकसारखा प्रकाश तर देते. हा असा प्रकाशच नाही पडला, तर सावल्या कशा पडणार? आणि सावल्याच नाही पडल्या, तर आपल्या जिवंतपणाचा आभास कसा तयार होणार?

जीवन का आभास दिलाती कुछ मेरी तेरी परछाई

दीप अभी जलने दे, भाई..

अशा शांत उजेडाची आस आपल्या मनात निर्माण होवो आणि आपलं अंगण आपल्या जिवंत अस्तित्वाच्या सावल्यांनी भरून जावो.. या शुभेच्छांसह..

शुभ दीपोत्सव..

आपला,