लोकसत्ता दिवाळी अंक २०१७

इंदिराजींची आणीबाणी लागू करण्यामागची मानसिकता नक्की कोणती, याची विस्तृत चर्चा गेली ३०-४० वर्षे झाली आहे व अजूनही चालूच आहे. त्या नसत्या तर देशाला नेतृत्वच नव्हतं, असा लायक कुणी नव्ह्ता- ज्याने सगळा डोलारा सांभाळला असता.. म्हणून आणीबाणी लादणे समर्थनीय आहे, असे मत असणारे आजही आहेत. स्वत: श्रीमती गांधींचेही मत असेच होते- ‘माझे अस्तित्व अपरिहार्य आहे’! इथे स्पष्ट होतो तो केवळ ruthlessness! जगाची पर्वा न करणारे, ‘योग्य दिसेल’ ते करायला मागे-पुढे न पाहणारे धैर्य नव्हे!!

श्रीमती इंदिरा गांधींची कारकीर्द ज्यांनी आपल्या तरुण वयात पाहिली ते सगळे आज माझ्यासारखे साठीच्या जवळ वा साठी उलटलेले लोक आहेत. १९६६ ला नभोवाणी मंत्री म्हणून सुरू झालेली त्यांची कारकीर्द १९८४ ला संपली. एक गुंगी गुडिया.. मूक-बधिर बाहुली.. ते ब्रिटनच्या माजी पंतप्रधान- ‘द आयर्न लेडी’ मार्गारेट थॅचर यांच्याही आधी ‘भारताची आयर्न लेडी’ म्हणून ख्यातीप्राप्त इंदिरा गांधींची कारकीर्द आता ३२-३३ वर्षांनंतर स्मरणातून लिहिणे तसे कठीण नाही. तपशिलात थोडीफार चूक होऊ शकते. पण एकतर प्रखर आणि अनेक प्रकारे जळणारी आणि जाळणारी अशी ती कारकीर्द आमच्या अतीव संवेदनशील आणि ऊर्मीच्या वर्षांत आम्ही पाहिली. त्याचे भाजलेले चट्टे अजूनही कायम आहेत. त्या काळाची स्मृती तेवढीच तीव्र आहे. सुरुवातीपासून पाहायचे झाले तर चाळीस-पन्नास वर्षांनंतर.. १९८४ नंतरही हजारो हजार रोमांचकारी बदलांतून देश गेल्यानंतर इंदिरा गांधी या विषयावर लिहिताना पूर्वदृष्टी- hind sight- अधिक सुदृढ, अधिक तरल होण्याची शक्यता जास्त आहे, अशा समजुतीने अशा प्रकारचा स्मरणात्मक लेख लिहिण्याचे धारिष्टय़ करीत आहे.

इंदिरा गांधी या विषयावर आजवर काही कमी लिहिले गेलेले नाही. आणि सुजाण वाचकांनी त्यातले कितीतरी वाचलेही आहे. प्रत्येकाची श्रीमती गांधींबद्दल काही मते, मनोधारणा बनलेली आहे, पक्की झालेली आहे; ती साधारही आहे. त्यात काहीतरी मौलिक, विलक्षण वेगळेच (म्हणजे भलतेच काहीतरी) सांगून त्या धारणांत बदल घडवण्याचे उद्दिष्ट वगैरे ठेवणे, असले फालतू विचार हा लेख लिहिताना मी बाजूला ठेवले आहेत. उलट, आजपर्यंत प्रकाशित न झालेल्या किंवा कधीच माहिती नसलेल्या चार गोष्टी सांगून श्रीमती गांधींच्या मानसिकतेचा एखाद् दुसरा कोपरा जर उजळता आला तर तेवढाच मर्यादित हेतू त्यात आहे.

इंदिरा गांधींना मी प्रत्यक्ष पाहिलेले नाही. पण इतक्या प्रकारे त्या सगळ्यांच्या आयुष्यांना स्पर्श करून गेल्या आहेत, की त्या अप्रत्यक्षालादेखील प्रत्यक्षाचेच परिमाण आणि प्रमाण लाभलेले आहे. एका कृष्णधवल फोटोमध्ये त्यांचे पहिले दर्शन मला घडले. हा फोटो माझ्या वडिलांजवळ- केशव केळकर यांच्यापाशी होता. आमच्या घरात अजूनही असेल. त्यावेळी वडील मुंबईच्या आकाशवाणीवर होते. तेव्हा श्रीमती गांधी नभोवाणी मंत्री म्हणून आल्या होत्या. काळी चंद्रकळा नऊवारी पद्धतीने नेसून केसांच्या अंबाडय़ावर पांढरा शुभ्र मोगऱ्याचा गजरा घातलेला त्यांचा हा प्रोफाईल फोटो आहे. त्या काळ्या वस्त्रांच्या पाश्र्वभूमीवर त्यांचे गुलाबी गोरेपण तर उठून दिसतेच; शिवाय त्यांच्या चेहऱ्यात नेहरूंचा चेहऱ्याची ठेवणही अस्पष्टपणे दिसते. पण त्यातून दिसते ते त्यांचे त्या वयातले कमालीचे शालीन, हसरे, विलक्षण सौंदर्य. त्यांना प्रियदर्शिनी का म्हणत, याचे उत्तर त्यांच्या या छायाचित्रात आहे. त्यांच्या उत्तरायुष्यात आलेला कणखरपणा, कठोरपणा, एक प्रकारचा रापलेपणा याचा मागमूसही त्या फोटोत नाही. कुणीही मोहून जावे असे सौंदर्य! हा लेख वाचणाऱ्या प्रत्येकाच्या सौंदर्याबद्दलच्या कल्पना असतीलच.. आहेतच. माझ्याही आहेत. माझे आजोबा मधुबालेबद्दल म्हणायचे, की तिच्यात it आहे. माझ्यापुरते बोलायचे झाले तर- १९०५ चा पाठमोरा स्त्रीवेशातला बालगंधर्वाचा फोटो माझ्या कॉलेजच्या वर्षांत मला चाळवून गेला होता. त्यानंतर हॉलिवूडच्या प्रसिद्ध सिनेतारकांचे सिनेमे तर मी डझनावारी पाहिले. पण वरील फोटो सौंदर्याच्या बाबतीत अ‍ॅव्हा गार्डनर या नायिकेशी जुळेल. अ‍ॅव्हाला पाहायचेच असेल तर आजही उपलब्ध ‘The Sun Also Rises’ पाहावा. इंदिरेच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ते मात्र ऑड्री हेपबर्नसारखे निर्मळ आहेत, नितळ आहेत. डोळे विलक्षण बोलके आहेत.

सगळ्यांच्याच स्मरणात असणारा पुढचा प्रसंग १९६९ च्या काँग्रेस फुटीचाच आहे. त्याबद्दलही खूप लिहून झाले आहे. सिंडिकेटवाल्यांचा कावा, निजलिंगप्पांच्या कार्यालयातून इंदिराबाईंपर्यंत वार्ता पोहोचवणाऱ्या तिथल्या एका सामान्य कामवाल्यापासून ते सगळ्या घटनेचा तपशील सांगायची गरज नाही. फक्त एका गोष्टीचा उल्लेख करीन. इंदिरा गांधींचे मातृविरहित बालपण, पित्याचे जेलमध्ये असणे आणि कदाचित काहीसे संदर्भहीन, दिशाहीन आयुष्य, त्यातून आलेली असुरक्षिततेची भावना आणि तो पाया धरून त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या कृती-निर्णयांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न झाला आहे. कुठल्याही मानसशास्त्रीय कारण-परंपरेचा जितका वस्तुनिष्ठ स्वीकार करता येणे शक्य आहे, तेवढा स्वीकार झालाही आहे. याउलट, काही अन्य प्रकारे याचा अन्वयार्थ लावता येईल असे मला वाटते.

काही झालं तरी इंदिरा नेहरूंची मुलगी होती. निदान स्वतंत्र भारतात नेहरू आणि काँग्रेस पक्षातील सत्तेतले आणि संघटनेतले लोक तिने पाहिले होते. सिंडिकेटमधले सगळे ढुढ्ढाचार्य असोत वा अन्य कुणी असोत; त्यांचे पाणी तिने जोखले होते. त्यांची लायकी, त्यांच्या मर्यादा, उणिवा, नेहरूंच्यापुढे त्यांची लोळण हे सगळं तिने पाहिलं होतं. यांच्या हातून काहीही होणार नाही, ही निरुपयोगी बांडगुळं उद्या आपल्याला सत्तावंचित ठेवणार, हे न कळण्याइतकी इंदिरा निर्बुद्ध नव्हती. इंदिरेला जर असं वाटलं असेल की, सत्तेवर नेहरूकन्या म्हणून तिचा(च) हक्क आहे, तर ते समर्थनीयच होते. संघटनेतलं आपलं स्थान, मंत्रिमंडळातलं स्थान, जनमानसातील स्थान याची पूर्ण कल्पना तिला होती. त्यामुळे संधी मिळताच या लोकांना बाहेर काढल्यास लोकांना त्यांच्याविषयी काहीही सहानुभूती वाटणार नाही याचीही तिला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे इंदिरेची असुरक्षिततेची भावना तिच्या अनेक कृतींमागे होती असे मानणे कदाचित बरोबर नाही.

इंदिरा गांधींच्या कारकीर्दीतल्या काही मोठय़ा घटनांबद्दल या लेखात पुढे लिहिनच. पण काही छोटय़ा, अप्रसिद्ध घटनांबद्दल आधी लिहिणे थोडे अधिक मनोरंजक वा त्यांची मानसिकता समजण्याच्या दृष्टीने उपयुक्त राहील. पहिला प्रसंग नागपूरच्या मोक्याच्या रेल्वेच्या जागेचा आहे. अजनी पूल उतरल्यावर मेडिकल कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर डावीकडे रेल्वेची मोठी जमीन आहे. अशा अनेक जमिनी वर्षांनुवर्षे तशाच पडून असतात, पण त्या कुणाला दिल्या जात नाहीत. इथे त्या कोपऱ्यावरची ३० बाय ३० यार्डाची जमीन इथल्या कुठल्यातरी रेल्वे यंत्रणेमधील अधिकाऱ्यांनी मशिदीसाठी दिली. तो निर्णय सर्वथा अयोग्यच होता. रेल्वेच्या आणि सगळ्याच्याच दृष्टीने. इथल्या काही कर्मचाऱ्यांनी आणि समाजातल्या लोकांनी त्यासंदर्भात निवेदन दिले. पण निर्णय बदलला गेला नाही. प्रकरण आणखी वर गेले. शेवटी श्रीमती गांधींच्या संबंधांतून कुणीतरी ते प्रकरण त्यांच्यापर्यंत पोहोचवले. फाईल मागवून घेण्यात आली. पण ती आजतागायत रेल्वेकडे आलेलीच नाही.

श्रीमती गांधींनी केलेले आणि कॉंग्रेसच्या मनोवृत्ती आणि परंपरेच्या विरुद्ध जाणारे हे एक मोठे काम आहे. १९७२ मध्ये आझाद हिंद फौजेच्या सैनिकांना त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा दिला आणि त्यांच्या योगक्षेमाची काळजी दूर केली. स्वातंत्र्यानंतर ही औदार्यपूर्ण वागणूक सैनिकांना कठोरपणे नाकारण्यात नेहरूंचा वाटा होता.

पूर्वाश्रमीचे दलित आज ख्रिश्चन/ मुसलमान झाले असले तरी त्यांना मागासवर्गीयांचे आरक्षण दिले पाहिजे, अशी ओरड गेली आठ-दहा वर्षे चालू आहे. पण हे प्रकरण आणखी खूप जुने आहे असे मानायला आधार आहे. श्रीमती गांधींचा देहान्त १९८४ च्या ३१ ऑक्टोबरला झाला. त्याच्याही आधी दलित ख्रिश्चनांच्या मागासवर्गीय आरक्षणाची मागणी करणारे एक शिष्टमंडळ थेट श्रीमती गांधींना भेटायला गेले होते. श्रीमती गांधींचे त्यांना उत्तर होते, की एका अटीवर त्या हे आरक्षण द्यायला अगदी तयार आहेत. ख्रिश्चनांनी जाहीररीत्या जनतेला सांगावे, की त्यांच्या धर्मात उच्च-नीच, मागासवर्गीय-उच्चवर्गीय असे भेदभाव आहेत. असे केल्यास त्यांना हे आरक्षण त्या देऊ करतील. शिष्टमंडळातील कोणीही असे जाहीर करण्यास तयार नव्हते. विषय तेव्हाच.. तिथेच बारगळला, हे वेगळे सांगायला नकोच.

१९८२ मध्ये मीनाक्षीपूरम्चे धर्मातर झाले. वर्तमानपत्रांत.. सगळीकडे त्याचा गाजावाजा झाला. अनेक मत-मतांतरे.. ज्याची सवय आपल्याला गेल्या तीन वर्षांत खूपच जास्त झाली आहे.. ती सगळी वर्तविली, व्यक्तविली गेली. त्यात एक छोटी टीप अशी होती : Even the Prime Minister sat up and took note.

संघाच्या वर्तुळात एकनाथ रानडे आणि श्रीमती गांधी यांच्या परस्परसंबंधांविषयी मोठय़ा कौतुकाने बोलले जाते. आणि ते वाजवीही आहे. बाकी दोन हजार टीका करण्याजोग्या गोष्टी रा. स्व. संघ आणि त्याचे स्वयंसेवक यांच्याविषयी असतील.. आहेत. पण एक गोष्ट वादातीत आहे, ते म्हणजे ‘सलगी देणे’! रामदासांचे शब्द नानाराव पालकरांनी डॉक्टर हेडगेवारांच्या व्यवहाराविषयी लिहिले आहेत. संबंध ठेवणे, राखणे, जोजावणे हे संघ स्वयंसेवक या संस्थेचे एक व्यवच्छेदक लक्षण राहिले आहे. रानडे जेव्हा श्रीमती गांधींना विवेकानंद केंद्राच्या किल्लया देण्यास गेले- सांगत गेले, की तुम्ही बंदी घातलेल्या संघाचा मी पण एक सदस्य आहे. त्यामुळे याही कामाचा तुमच्या दृष्टीने योग्य तो बंदोबस्त करा. लेख अकारण वाढेल म्हणून श्रीमती गांधींनी विवेकानंद स्मारकाला व रानडय़ांना हात लावला नाही याची कारणे सांगत बसण्याची/ विश्लेषित करण्याची गरज नाही. पण या सलगी देण्यामागची वृत्ती त्यांनी जाणली नाही असे म्हणणे अन्यायी ठरेल.

श्रीमती गांधी अलोट धैर्यवान होत्या, नि कमाल ruthless होत्या, हा खरा मुद्दा आज इतक्या वर्षांनी चर्चेला आला तर त्यात कुणाला आपत्ती वाटण्याचं कारण नाही. बांगलादेशाच्या स्वातंत्र्याबाबत त्यांना अलोट धैर्यवान म्हटलं गेलं आहे. पण ते पूर्णपणे खरं नाही, हे माणेकशा-गांधी संवाद आणि लेफ्टनंट जनरल जगजितसिंग अरोरा यांनी जे केलं आणि पाकिस्तानी सैन्याला शरण आणलं, त्यावरून- हे आता सर्वच जाणतात. याबाबतीतले त्यांचे आदेश, जगाची पर्वा न करता, पण द्यायला लावलेले आहेत असंच चित्र आहे- ते दिलेले नाहीत.

अगदी थोडक्यात सांगायचं, तर त्यांनीच उभं केलेलं भिंद्रनवालेचं आणि खलिस्तानचं भूत अंगाशी यायला लागलं तसं ऑपरेशन ब्ल्यू स्टारला दिलेला हिरवा कंदील या धैर्यातून आला की त्यांच्या कमालीच्या ruthless अशा मानसिकतेतून आला? ruthless असणं आणि धैर्यवान असणं यांत गुणात्मक फरक आहे. या दोन्ही ठिकाणी- बांगलादेशनिर्मिती आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टार- हा त्यांच्या ruthlessness चा परिणाम दिसतो. स्वत: नेहरू कितीही फेबियन समाजवादी, लोकशाहीवादी असले, तरी एका मर्यादेनंतर त्यांच्यातला हुकूमशहा म्हणा, कुणाचंच न ऐकणारा म्हणा- बेधडकपणा जागा होई आणि लोकशाहीची ऐशीतैशी होई. इंदिरेत जर हीच वृत्ती काळानुसार उमटत गेली तर आनुवंशशास्त्राच्या सगळ्या नियम-निरीक्षणांना बरोबर ठरवतच ती उमटली, यात संशय नाही. इंदिरेचा ‘मी’ आणि उत्तरोत्तर उमटलेली इतरेजनांबद्दलची तुच्छता- नेहरूंचा ‘मी’पणा त्यांच्याही अंगी उतरल्याचेच दर्शवते.

आणीबाणी लागू करण्यामागची मानसिकता नक्की कोणती, याचीही विस्तृत चर्चा गेली ३०-४० वर्षे झाली आहे व अजूनही चालूच आहे. त्या नसत्या तर देशाला नेतृत्वच नव्हतं, असा लायक कुणी नव्ह्ता- ज्याने सगळा डोलारा सांभाळला असता.. म्हणून आणीबाणी लादणे समर्थनीय आहे, असे मत असणारे आजही आहेत. स्वत: श्रीमती गांधींचेही मत असेच होते- ‘माझे अस्तित्व अपरिहार्य आहे’! इथे स्पष्ट होतो तो केवळ ruthlessness! जगाची पर्वा न करणारे, ‘योग्य दिसेल’ ते करायला मागे-पुढे न पाहणारे धैर्य नव्हे!!

अन्य काही उदाहरणांमध्ये याशिवाय आणखीही काही गोष्टी साधण्याची किमया श्रीमती गांधींनी दाखवली आहे. बँकांचे राष्ट्रीयीकरण ही एक अशीच गोष्ट होती. त्यांना हवे असलेले पैसे त्यातून त्यांनी मिळवले, हे जसे जगजाहीर आहे, तसेच बेगडी, गरीबांच्या कनवाळू अशी आपली प्रतिमा निर्माण करत समाजवादाचे घोंगडे पांघरून त्यांनी देशातल्या गरीबांचा पाठिंबाही मिळविला. त्यांच्या डोळ्यांत धूळही झोकली. राष्ट्रीयीकरणाला कुठल्याही प्रकारचा आर्थिक निकष, नियम समर्थनीय ठरवत नव्हता; तरी ते झाले. संस्थानिकांना मिळणारी प्रिव्ही पर्सेसची रक्कम रद्द करणे म्हणजे घटनेची पायमल्ली असली आणि जनसंघासकट सर्वाच्या धारदार टीकेचं लक्ष्य बनल्यावरही त्यांना जे साधायचं ते श्रीमती गांधींनी साधलं. कितीही झालं तरी जास्तीत जास्त एक-तृतीयांश भारत संस्थानी. त्यातली बव्हंश प्रजा गरीब, अशिक्षित. त्यांचे राजे आणि ते यांच्यातला संबंध अप्रत्यक्ष वा फारसा घट्ट नाही. आणि ते राजे काही प्रजेपुढे हे रडगाणे थोडेच गाणार? अभिमानाचा प्रश्न! त्यामुळे ज्यांना ही घटना घडल्याचे कळले त्यांना या प्रतीकात्मक कृतीमुळे काही वाटलं असेल तर ते बरंच वाटलं. याला विरोध करणाऱ्यांच्या बाबतीत त्यांचे मत अनुकूल बनले नाही.

वीसकलमी कार्यक्रम आणि गरिबी हटावचा नारा आणि त्याच सुमारास त्यांच्या मुखातून निघालेले ‘भ्रष्टाचार हा(देखील) जीवनयापनाचा एक मार्ग आहे,’ हे उद्गार एवढेच दर्शवितात, की कुठलाही मार्ग सत्तेत राहण्यासाठी वापरायला त्यांची सदसद्विवेकबुद्धी आड येत नसे. श्रीमती गांधींच्या मानसिकतेबद्दल इथे अजून थोडे काही लिहिणे अगत्याचे आहे. त्यांचे दोन्ही चिरंजीव, त्यांची बहू व त्या बहूच्या भोवतालचे लोक यांना सत्तेची अमर्याद लालसा होती. ती लालसा श्रीमती गांधींना असायचं कारणच नव्हतं. अमर्याद सत्ता होतीच; आणि ती चालू राहण्यासाठी कुठलीही कृती त्यांना मर्यादा घालत नव्हती. पण ती चालू राहण्यामागे फक्त त्यांची एकच अहंमन्यता कारण होती.. इतरांना कस्पटासमान लेखण्याची त्यांची आपल्या तीर्थरूपांकडून आलेली वृत्ती! त्यातच ‘असले कस्पटासमान लोक काय करणार? जे काही करता येईल ते मीच करीन/ करू शकते..’ ही भावना या सगळ्याच्या मागे होती.

ही विधाने धाष्टर्य़ाची वाटतील, पण ती खरी आहेत. आणीबाणीनंतर मोरारजींनी केवळ त्यांना निशाणा बनवण्यासाठी केलेल्या शाह कमिशनच्या स्थापनेची धूळधाण करताना त्यांनी हे स्पष्ट करून दाखविले. शाह कमिशनसमोर न येऊन एका साध्या युक्तीने त्यांनी मोरारजींना त्यांची जागा दाखवली. पुढे जाऊन मी तर असे म्हणेन, की इतरांबद्दलचे त्यांचे हे मूल्यमापन अचूक होते. जनता पक्षामध्ये असलेल्या एकूण एक माणसाने ज्या पद्धतीचा व्यवहार त्या उण्यापुऱ्या पावणेदोन वर्षांत केला, त्यात हे सगळे किती तुच्छ लोक आहेत, हे व एवढेच अधोरेखित झालेच; त्याचबरोबर ‘त्यापेक्षा इंदिरा हीच त्यातल्या त्यात समर्थ, बलशाली व्यक्ती आहे- जिच्या हाती आपण त्यातल्या त्यात अधिक सुरक्षित राहू’ या भावनेने लोकांनी पुन्हा त्यांना मूर्धन्यस्थानी बसवलेच की नाही?

नेतृत्वस्थानी असणाऱ्या व्यक्तीने इतर कुणाला वाढू न देणे, खुजे ठेवणे, आपल्यानंतरच्या पिढय़ांना काय नेतृत्व मिळेल, मिळायला हवे, याचा विचार न करता सगळ्यांना खुजे ठेवणे- हा एक प्रकार झाला. पण आपल्याभोवतालचे लोक क:पदार्थचं आहेत याची स्पष्ट कल्पना असल्याने, ‘माझी अपरिहार्यताच मुळात वादातीत आहे, अपरिहार्य आहे’ हेच त्यांच्या मानसिकतेचे सर्वात मोठे- कदाचित एकमेव द्योतक आहे असे जर म्हटले तर ते पटण्याची संभावना पुष्कळ जास्त आहे असे मला वाटते.

नुकतेच मी मार्गारेट थॅचरबाईंच्या अनेक चरित्रांपैकी ‘पार्लमेंटच्या नेतेपदी दहा वर्षे’ हा मुख्य बिंदू असणारे एक चरित्र वाचले. थॅचरबाई आणि श्रीमती गांधी या दोघींनाही ‘आयर्न लेडी’ म्हणून संबोधले गेले आहे. पण या दोघींत मुळात गुणात्मक फरक आहे. थॅचरने जे केले ते ब्रिटिश लोकशाहीच्या पोलादी संरचनेत पुराण्या, जीर्ण अशा समाजवादाच्या कल्पनांना बाजूला सारून ब्रिटिश जनतेचे जीवनमान सुधारण्याकरता नव्या उदार कल्पना रुजवण्यासाठी केले. हे करण्यासाठी खरोखरच अमाप धैर्याची गरज होती आणि तेवढे धैर्य फक्त थॅचरनेच दाखवले. लोकशाहीच्या संरचनेची तोडफोड करून ही मूल्ये त्यांनी रुजवली नाहीत. भारतात उदार नीतीचे राजकारण करून जनतेचे जीवनमान सुधारण्याऐवजी जुन्याच प्रकारच्या कृतीतून- त्याही इथल्या चौकटी उद्ध्वस्त करून- जनतेच्या चांगल्या जीवनमानासाठी काहीही न करता श्रीमती गांधींनी बेदरकारपणा, बेपर्वाईच फक्त दाखवली. बेगडी समाजवादाचे प्रदर्शन करून गरीबाला अधिक गरीब करण्यात, त्या गेल्या त्या वर्षी महागाई-तुटवडा यांचा मार, सामान्यांचे हलाखीचे, कष्टप्रद जीवन, विरोधी पक्षांची झालेली वाताहत, प्रादेशिक चांगल्या नेतृत्वाचा अभाव, राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्वाचा अभाव, देशाची अखंडता धोक्यात आलेली, इकडे आसाम आणि पूवरेत्तर भारत, इकडे पेटता पंजाब, गुजरातेत दंग्यांची लागलेली झळ.. अशी सगळीच परिस्थिती वाईटाच्या चरमसीमेवर होती. रा.स्व.संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी त्यांच्या १९८४ च्या विजयादशमीच्या उत्सवात रेखाटलेले हे चित्र होते. आणि इतके असूनही ‘आजच्या परिस्थितीत काँग्रेसखेरीज देशाला पर्याय नाही,’ हे देवरसांचे त्याच भाषणातले विधान म्हणजे एक बॉम्बगोळाच ठरला.

या सगळ्या परिस्थितीमधून मार्ग काढायला इंदिरा गांधींकडे काहीच उत्तर वा योजना नव्हती. जे काही होते ते सगळे कार्यक्रम, घोषणा देऊन झाल्या होत्या. आणीबाणीनंतर संजयचा अपघाती मृत्यू झाला होता, त्यामुळे काँग्रेसमधील पुढील नेतृत्वाचा विषय अधांतरी लोंबकळला होता. अशा वेळी आयुष्याच्या अर्थपूर्ण अस्तित्वाचा अंत श्रीमती गांधींना समोर दिसत होता का?.. हा लेख लिहिताना आज असे वाटणे स्वाभाविक असेल, पण त्यावेळी नव्हते. त्यावेळी जमीन हादरून एक मोठा वृक्ष पडला होता. पुढचे सगळेच धूसर झाले होते.

१९६९ च्या काँग्रेस फुटीनंतर श्रीमती गांधींची जेव्हा सर्वसत्ताधीशत्वाकडे वाटचाल सुरू झाली त्यावेळी एक मत वर्तवले जाई. नेहरू कितीही Autocratic असले, अगदी डिक्टेटर नसले, तरी लोकशाहीची, तिच्या यंत्रणांची, मार्गाची, संकेतांची चाड त्यांना आहे; पण इंदिराबाईंच्या बाबतीत असं खात्रीलायक विधान करता येणार नाही. आज पस्तीस वर्षांनंतर हा निष्कर्षच त्यांच्या अख्ख्या कारकिर्दीचे सार म्हणून मांडता येईल का? मला वाटते, हा एक निष्कर्ष असू शकतो. पण ती कारकीर्द यापेक्षा खूप विस्तृत होती. मार्गारेट थॅचर असोत, श्रीमती गांधी असोत; दोघीही Scholastic Intelligence च्या धनी नव्हत्या. अनेकानेक गोष्टींची तरलता, संकेत दोघींनाही कळत नसत. पण अमुक एक करायचे तर या गोष्टींना बाजूला सारून दोघींनी त्या गोष्टी केल्या. दोघींच्याही माथी एकेकदा तीव्र जनक्षोभ आला. पण लोकशाहीपुरतं बोलायचं तर एकीची चाल सकारात्मक, तर दुसरीची विध्वंसक राहिली, हे मान्य करायला लागेल.

आणखी एका दृष्टिकोनातून पाहायचे झाले तर लालबदाद्दूर शास्त्रींच्या निधनानंतर आणि १९६९ नंतर देशाने नेतृत्वाच्या विषयात एका निर्वात प्रदेशात प्रवेश केला. डॉ. लोहिया गेले. नरेंद्र देव आधीच गेले होते. कम्युनिस्टांचे कुठलेच प्रादेशिक नेतृत्व उदयाला आले नव्हते. इंद्रजित गुप्ता किंवा ई. एम. एस. नंबुद्रीपाद असोत; संख्याबळाच्या अभावामुळे राष्ट्रीय स्तरावर त्यांना तसे महत्त्व नव्हते. संयुक्त समाजवादी पक्षातील दुसऱ्या फळीचे नेतृत्व पक्षाच्या फोडझोडीत गुंतलेले. पं. दीनदयाळ उपाध्यायांची हत्या झालेली आणि अटलबिहारी वाजपेयींचे नेतृत्व उदय पावू लागले होते. अशा नेतृत्वनिर्वात प्रदेशात श्रीमती गांधींकडे निरपवाद नेतृव जाणे जसे अपरिहार्य केले गेले, तितकेच ते नैसर्गिकही होते. अधिक बारकाईने बोलायचे झाले तर प्रायश: ते तसे घडणे देशाच्या सुदैवाचा भाग असावा.

त्यांनी लादलेली आणीबाणी ही अनेक अर्थानी वरदान ठरली. त्याबद्दल स्वतंत्र लेख लिहावा लागेल. पण आज ज्या भाजपची निरंकुश सत्ता आपण पाहतो, ‘अनुभवतो’ आहोत, त्याचे आदिकारण आणीबाणीत आहे. नागपूर स्टेशनवर अटक झाल्यावर देवरसांनी दोन संदेश दिले. एक- जे वीस वर्षांत साध्य झाले नसते ते दोन वर्षांत घडून येईल. दुसरा संदेश होता- ही दमाची लढाई आहे. भारत करंटय़ांचा देश असल्यामुळे १९७७ ची सुवर्णसंधी भारताच्या करंटय़ांनी मातीमोल केली व काही गोष्टी घडायला मग खूपच अधिक वर्षे वाट पाहावी लागली.

घडलेल्या घटनेबाबतची वस्तुस्थिती तिच्या पवित्रशा खऱ्या स्वरूपात सांगायला हवी. त्यावरची मल्लिनाथी स्वतंत्र आहे, असा एक संकेत आहे. (सर्वसाधारणपणे तो धुडकावला जातो.) माझा हा थोडासा लेखनप्रपंच ही Fact पवित्र ठेवत असताना त्याच्याशी संबंधित व्यक्तींच्या मानसिक व्यापारातून या Fact चे काय दर्शन/ पृथक्करण करता येईल, या उद्देशाने लिहिला गेला आहे. त्या पठडीतला हा एक प्रयत्न आहे.
संजीव केळकर