ऐंशी शाळांमध्ये अत्यल्प उपस्थिती; भीती कायम

बीड : जिल्ह्य़ात करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता करोनामुक्त गावामध्ये ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समितींच्या ठरावाने सुरू असलेल्या चाळीस शाळा बंद करण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. ग्रामीण भागामध्ये रुग्ण वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित सुरू असलेल्या ८० शाळांमध्ये अत्यल्प उपस्थिती असून तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यामध्ये १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय गाव पातळीवर घेण्यात आला होता. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करोनामुक्त गावातील ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेऊन जिल्हा परिषदेकडे सादर केला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेने जवळपास सव्वाशे शाळांना सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती. तब्बल दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने आणि करोनाच्या भीतीमुळे बहुतांश पालक पाल्यांना शाळेत पाठवण्यास तयार नव्हते. तरीही ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या. ज्या गावात महिनाभरापासून करोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही, अशा गावांमध्ये ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेऊन व पालकांचे संमती पत्र घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. सुरुवातीपासूनच काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती असून आलेल्या मुलांना शिक्षकांकडून शिक्षण दिले जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आणि करोनामुक्त गावातही बाधित आढळून येत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील ४० शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या उर्वरित ऐंशी शाळांमध्ये उपस्थितीचे प्रमाण अतिशय कमी आहे. रुग्णवाढ आणि तिसऱ्या लाटेची भीती पालकांच्या मनात कायम असल्याने विद्यार्थी शाळेत येत नाहीत. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतरच शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.