मुंबईत रोजगारानिमित्त वास्तव्यास असलेल्या पश्चिम बंगालमधील मजूरांना करोना संकटामुळं आणि लॉकडाउनमुळं सध्या कामधंदाही बंद असल्याने गावाकडं जाण्याची ओढ लागली आहे. यासाठी त्यांना वाहनांनी प्रवास करण्याची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ते आता पायीच निघाले आहेत. या मजुरांसाठी पश्चिम बंगाल सरकारनं विशेष रेल्वेला परवानगी द्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आपल्या ट्विटर हँडवरुन एका व्हिडिओ पोस्टद्वारे त्यांनी राज्य शासनालाही याबाबत लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे.
मुंबईहून पश्चिम बंगालसाठी 7 रेल्वेगाड्यांची परवानगी रेल्वेने मागितली आहे. अद्याप ती मिळालेली नाही.
मा. ममतादीदींना माझी विनंती आहे की त्यांनी ही परवानगी त्वरित द्यावी. त्यामुळे श्रमिकांना पायी प्रवास करावा लागणार नाही. #MigrantWorkers @RailMinIndia @PiyushGoyal @MamataOfficial pic.twitter.com/GYSUqYv8k4— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 10, 2020
फडणवीस म्हणाले, “मुंबईत अडकलेल्या पश्चिम बंगालमधील स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ७ विशेष रेल्वेगाड्या सोडण्याची तयारी केली आहे. त्यासाठी त्यांनी पश्चिम बंगाल सरकारकडे परवानगी देखील मागितली आहे. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अद्याप एकाही रेल्वेसाठी परवानगी दिलेली नाही.”
त्यामुळं फडणवीस यांनी ममता बॅनर्जी यांना आवाहन केलं की, “त्यांनी लवकरात लवकर यासाठी परवानगी द्यावी, जेणेकरुन या कामगारांना पायी जाणं भाग पडू नये. यासाठी माझी मुख्यमंत्र्यांना आणि सत्तारुढ पक्षातील वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की, त्यांनी देखील ममता दिदींना विनंती करुन ही परवानगी तात्काळ मिळवून घ्यावी.”