जैवविविधतेने नटलेल्या जामसेर परिसराला पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची संधी
नीरज राऊत, लोकसत्ता
पालघर: शूरपारख ते नाशिक व शूरपारख ते भरूच या दरम्यान प्राचीन काळी असलेल्या व्यापारी मार्गावर जामसर हे महत्त्वाचे शहर असल्याचे तसेच सहाव्या ते बाराव्या शतकांदरम्यान या भागात आदिवासी लोकसंस्कृतीचे प्रबळ प्रस्थ असल्याचे पुरावे पुरातत्त्व अभ्यासकांना मिळाले आहेत. जामसर तलाव पाणथळ जागा मिळून घोषित करण्यात आली असून जैवविविधतेने नटलेला हा संपूर्ण परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची संधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाली आहे.
पुरातत्त्व अभ्यासक सदाशिव टेटीवलकर यांनी १९८० च्या सुमारास जामसेर भागास भेट दिली होती. त्यानंतर २०१८ साली ठाणे, जिल्हा वेटलँड समितीने ‘स्येंमंतक’सह या परिसरास भेट दिली तेव्हा विखुरलेले अवशेष निदर्शनास आले. ठाणे जिल्ह्य़ाच्या या जैववैविध्य समितीमध्ये समर्थ परब या अभ्यासकाचादेखील समावेश होता. जैववैविध्य आणि पुरातत्त्व असे दोन्ही विषय त्याच्या अभ्यासाचे असल्याने त्याला या ठिकाणी पाचारण करण्यात आले.
‘‘हे सर्व अवशेष मध्ययुगीन काळातील संस्कृतीचे असल्याचे अभ्यासावरून दिसून आले असून त्या काळात या भागात आदिवासी संस्कृती प्रबळपणे अस्तित्वात असल्याचे प्रकाशझोतात आले आहे. या संशोधनामुळे संस्कृतीमधील टप्प्यांमध्ये सलगता प्रस्थापित झाली असून संस्कृतिबदलाचे पुरावेदेखील पुढे आले आहेत.
जामसर तलाव पाणथळ जागा म्हणून घोषित झाला असून हा संपूर्ण परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. या ऐतिहासिक वारसा असलेल्या तसेच जैवविविधतेचा लाभ घेऊन या ठिकाणी पर्यटन केंद्र विकसित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जैववैविध्याच्याही बाबतीत जामसरचे महत्त्व लक्षात आलेले असल्याने भविष्यात येथे पारंपरिक वारशांशी जोडलेले पर्यटन विकसित होऊ शकेल.
१२५ पेक्षा अधिक संस्कृतींचे पुरावे सध्या जामसर गावात तीन ठिकाणांच्या आजूबाजूला आहेत. शिवाय जामसर तलावापासून जवळ एक रस्ता जात असल्याने नालासोपारा (शूर्पारख)-भरूचदरम्यानचा वापर व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असल्याचे सिद्ध होते. तेराव्या शतकापासून ब्रिटिश काळापर्यंत जव्हार- जामसर परिसर हा मुकणे साम्राज्याच्या आधिपत्याखाली असल्याचे लक्षात येते.
सतीस्मारक, शिल्पकलाकृती
समर्थ परब व पुरातत्त्वशास्त्राच्या विद्यार्थिनी असलेल्या सबा पुरकर यांनी २०१९-२० दरम्यान तीन वेळा या परिसरास भेट देऊन १०० हून अधिक अवशेषांचे दस्तावेजीकरण करून प्राथमिक व अंतिम असे दोन अहवाल सादर केले. यामध्ये युद्धात शहीद झालेल्या सैनिकांचे स्मारक असणारे वीरगळ, सतीस्मारक शिळा त्याचबरोबर शिल्पांवर कोरलेली आदिवासी कलेसह एका मोठय़ा मंदिर संकुलाचे अवशेषही आढळले.ते देवतळी आणि जामसर तलावाच्या दरम्यान विखुरलेल्या अवस्थेत होते. तेराव्या शतकापासून ब्रिटिश काळापर्यंत जव्हार-जामसर परिसर हा मुकणे साम्राज्याच्या आधिपत्याखाली असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
जामसर परिसरातील जैवविविधता तसेच ऐतिहासिक पुरावे यांची माहिती पुढे आली असून या ठिकाणी लवकरच प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहे. या संदर्भात संबंधित विभागांचा सल्ला घेऊन संपूर्ण परिसर विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
– डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी, पालघर