सांगली पोलिसांतील काही अपप्रवृत्तीने पोलीस खाते बदनाम होत आहे. नऊ कोटींच्या लूटमारप्रकरणी अधिकारी तुरुंगात असतानाच आता कोठडीतील मृत्यूचे प्रकरणाने पोलिसांना लौकिकाला बट्टा लागला आहे. आरोपीच्या कोठडीतील मृत्यूचे प्रकरण समोर आल्याने खळबळ माजली. मात्र हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू झाले. मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला पैसे देण्याचाही प्रयत्न झाला. सांगली पोलिसांची एकामागोमाग एक कृष्णकृत्ये बाहेर येऊ लगाली आहेत. सामान्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या आणि खाकी वर्दीतील नराधमांच्या कृष्णकृत्याने हा आक्रोश दडपण्याचा झालेला प्रयत्न हा त्याहून अधिक भयावह. खाकी वर्दीच्या आत लपलेली पाशवी वृत्ती पशासाठी किती खालच्या पातळीवर पोहोचली असल्याचेच दिसून आले.
अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारी या दोघांना लुटमारीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. सोमवारी रात्रीच चौकशीसाठी गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या खोलीत आणून चोरीचा मोबाइल मिळाला असताना केवळ मारहाण करून पैसे उकळण्यासाठी छळ करण्यासाठीच फौजदार युवराज कामटेने आणले. गुन्हे प्रकटीकरण विभागाची चौकशी खोली कसली ती एक लोकशाहीतील छळछावणीच म्हणायला हवे. इतकी कृत्ये या चार भिंतीच्या आत दडली, दडपली गेली आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे.
कोठडीतील आरोपीचा मृत्यू होऊनही काळी कृत्ये समाजाला दिसू नयेत यासाठी यापुढे करण्यात आलेला आटापिटा तर सांगलीत कायद्याचे राज्य आहे की पोलिसांचे, असा प्रश्न निर्माण करणारा ठरत आहे. पोलीस ठाण्यातील सर्व खोल्यामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा आहे. नेमक्या त्याच वेळीचे चित्रीकरण गायब कसे झाले? त्या वेळची दृष्ये कुठे गेली? पोलीस ठाण्यात केवळ गुन्हे प्रकटीकरण विभागाचे लोक होते की आणखी कोणीच नव्हते, असे असंख्य प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहेत. मग एवढा गंभीर प्रकार घडूनही याची वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली गेली नसेल कशावरून? आरोपींनी पलायन केले असल्याची स्टेशन डायरीला करण्यात आलेली नोंद मंगळवारी सकाळी सात वाजताची आहे. रात्रभर राबता असलेल्या पोलीस ठाण्यात नऊ-साडेनऊ वाजता एकाचा मृत्यू होतो अन् वरिष्ठांना मात्र याची कल्पना तात्काळ दिली जात नाही यावर विश्वास कसा आणि कोण ठेवणार?
फौजदार कामटे याच्याविरुद्ध तक्रारी आल्या असल्याची कबुली पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली. मात्र या तक्रारीची शहानिशा झाली का, तथ्य असेल तर कारवाई काय केली, याचे उत्तर द्यावे लागेल. कारण आरोपीचा खून करून त्याचा मृतदेह जाळेपर्यंत तो आहे त्या ठिकाणीच कामावर होता. शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनीही अधीक्षकांकडे कामटेविरुद्ध तक्रार दिली होती. पैसे उकळण्यासाठी चाललेले धंदे बंद व्हावेत असे या यंत्रणेला वाटतच नसावे अशी शंका येण्याइतपत ही यंत्रणा सडलेली आहे.
आरोपीच्या कोठडीतील मृत्यूने सांगली पोलिसांची नसलेली अब्रू काळवंडली एवढेच, साधे परजिल्ह्य़ातील वाहन आले तर चौकशीच्या नावाखाली अडवणूक करणारी यंत्रणा शहराबाहेर नाक्या-नाक्यावर खुलेआम लूट करीत आहे. तक्रारीचा पाऊस पडला तरी याला आळा बसत नाही. वारणानगरच्या शिक्षक कॉलनीत एलसीबीच्या निरीक्षक, उपनिरीक्षकांसह तपास पथकाने नऊ कोटींची लूट केली. सध्या ही मंडळी तुरुंगात आहेत.
’संशयितांना कबूल करण्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध असल्याने पाशवी बळाचा आणि वर्दीचा रुबाब वापरू नये असे स्पष्ट निर्देश न्यायालय व मानवी हक्क आयोगाने दिलेले असूनही सांगलीतील पोलिसांनी माणुसकीला काळीमा लावणारी कृत्ये केली. अनिकेतला मारहाण करण्यासाठी उलटे टांगण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांचे डोके पाण्याने भरलेल्या बादलीत बुडविण्यात आले होते. उलटे टांगल्यानंतर काठीने मारहाण करण्यात आली. त्यात तो दोरी सुटून खाली डोक्यावर पडला असल्याचे सांगण्यात येते. त्यातच रक्तस्राव झाल्याने तो मृत झाला.
’या प्रकाराचा संशय सांगलीकरांना घडल्या घटनेपासून येत होता. मात्र याबाबत कोणीही अधिकारी उत्तर देण्यास पुढे येत नव्हते. ठामपणे काहीही सांगण्यास धजावत नव्हते. प्रकरण दडपण्यासाठी मृताच्या एका नातलगाला मिटवून घेण्याची विनंतीही करण्यात आली होती. इथेच हे प्रकरण अधिक संशयास्पद बनले. मात्र वरिष्ठ अधिकारी दोघेही पळून गेले असल्याचे सांगत होते.
’सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी याप्रकरणी २४ तासांत बेपत्ता झालेल्या आरोपीला हजर करा अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगताच हे प्रकरण वाटते तेवढे सोपे नसल्याचे संबंधितांच्या लक्षात येताच खरे स्वरूप उघडकीस आले. लोकप्रतिनिधींचा दबाव आणि जमावाचा गेल्या २३ तासांपासून पोलीस ठाण्यासमोर असलेला ठिय्या यामुळेच हे प्रकरण उघडकीस आले, अन्यथा अनिकेतचे काय झाले, या प्रश्नापुढे वर्दीने शोध सुरू असल्याचे पालुपद लावून प्रकरण बंदही केले असते.