औरंगाबादमध्ये दिवसागणिक करोनाचा विळाखा वाढतच आहे. येथील करोनाग्रस्तांची संख्या ५० च्या पुढे गेली आहे. शहरात पुर्णपणे लॉकडाउन असून पाच पेक्षा जास्त लोकांना फिरण्यास किंवा एकत्र जमण्यास बंदी आहे. सर्व मंदिर-मस्जिद किंवा इतर धार्मिक कार्यक्रम,सणही साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही औरंगाबादमध्ये एका प्रार्थना स्थळावर काही लोक एकत्र आले. त्यांना समजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार याप्रकरणी संबंधित प्रकरणातील २७ हल्लेखोरांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर या हल्ल्यात एका पोलीस आधिकाऱ्यासह दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

औरंगाबाद पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या आवाहन आणि शहरात जारी केलेल्या आदेशानुसार सर्वजण लॉकडाऊन आणि कर्फ्यूचे, सामाजिक अंतराचे पालन करीत असताना ग्रामीण भागातील बिडकीन येथे हा अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त आहे. बिडकीन येथील औरंगाबाद-पैठण रोडवरील प्रकाशनगरमध्ये जमाव जमल्याची माहिती बिडकीन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी जाऊन विचारपूस करत असतानाच जमावाने त्यांच्यावर थेट हल्ला चढवत दगडफेक सुरू केली. यात पोलीस  जखमी झाल्याचे वृत्त आहे.