अयोध्येमधील राम मंदिराची उभारणी हा जनतेच्या श्रद्धेचा विषय आहे त्यासाठी लोकांनी यथाशक्ती निधी साहित्य त्याचा पुरवठा केला आहे. राम जन्मभूमी जमीन घोटाळा प्रकरणी लोकांच्या मनात संशय बळावला असल्याने भाजप, राष्ट्रीय सेवक संघ व केंद्र सरकारने यांनी खुलासा केला पाहिजे, अशी मागणी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केली.

राम मंदिर व माझा निकटचा संबंध आहे. कागल येथे अयोध्याच्या आधी राम मंदिर उभे केले आहे. माझा जन्मही रामनवमीचा आहे, असा उल्लेखही यावेळी हसन मुश्रीफ यांनी आवर्जून केला. राम मंदिर उभारणीसाठी देशातील जनतेने यथाशक्ती मदत केली आहे. आपचे खासदार संजय सिंग यांनी हा विषय उपस्थित केल्यानंतर त्यांच्या प्रतिमेला काळे फासणे वा शिवसेना भवनावर चाल करून जाणे हे शोभाणारं नाही. दोन्ही शंकराचार्यांनीही या विषयी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात किंतु निर्माण होण्यापूर्वी याचे स्पष्टीकरण होण्याची गरज असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

सिंग यांच्या घरावर झालेला हल्ला…

अयोध्येत जमीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांच्या घरावर १५ जून रोजी हल्ला करण्यात आला. संजय सिंग यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली होती. यावेळी संजय सिंग यांनी भाजपाला जाहीर आव्हान देत कितीही गुंडगिरी केली तरी मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही असं म्हटलं होतं. संजय सिंग यांनी ट्रस्टने जमीनखरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केलाय. दोन कोटींची जमीन अवघ्या पाच मिनिटांत १८.५ कोटी रुपयांना ट्रस्टने खरेदी केली असून, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्याची मागणी संजय सिंग यांनी केली आहे.

“माझी हत्या झाली तरी बेहत्तर”

संजय सिंग यांच्या आरोपांनंतर देशभरात खळबळ माजली असून यावर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र सिंग यांनी आरोप केल्यानंतर त्यांच्या घऱावर हल्ला झाला आहे. संजय सिंग यांनी ट्विट करुन या हल्ल्याची माहिती देताना आपण राम मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही असं म्हटलं होतं. “माझ्या घरावर हल्ला झाला आहे. भाजपावाल्यांनी कान उघडे ठेवून ऐकावं, कितीही गुंडगिरी केली तरी प्रभू श्रीरामाच्या नावे बनणाऱ्या मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही. त्यासाठी माझी हत्या झाली तरी बेहत्तर”, असं ट्विट सिंग यांनी केलेलं.