बालाजी तांबे हे आयुर्वेद क्षेत्रातलं एक फार मोठं नाव. मंगळवारी दुपारी बालाजी तांबे यांचं वृद्धापकाळानं निधन झाल्यामुळे फक्त आयुर्वेदच नाही, तर सर्वच क्षेत्रातील त्यांच्या मित्रजनांना आणि अनुयायांना देखील मोठा धक्का बसला आहे. कारण सर्वच क्षेत्रामध्ये बालाजी तांबे यांचा मित्र परिवार होता. राजकीय क्षेत्रामध्ये बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गजांशी बालाजी तांबे यांचं अनोखं नातं होतं, तर दुसरीकडे भारतीय उद्योग विश्वातील मोठं नाव असलेल्या अंबानी उद्योग समूहाचे प्रमुख अर्थात धिरूभाई अंबानी यांच्याशी देखील त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. धिरुभाई अंबानी तर त्यांच्याकडे उपचार देखील घेत होते. एका वृत्तवाहिनीशी बोलताना बालाजी तांबे यांनी धिरूभाई अंबानींचा एक किस्सा सांगितला होता. त्यावरून त्यांचा मिश्किल स्वभाव आणि धिरुभाई अंबानी यांच्यासोबतचं त्यांचं नातं किती खोल होतं, हेच सिद्ध होतं!
बालाजी तांबेंनी दिली होती गॅरंटी!
बालाजी तांबेंनी या मुलाखतीत यासंदर्भात आठवण सांगितली आहे. धिरूभाई अंबानी तेव्हा बालाजी तांबेंकडे उपचार घेण्यासाठी आले होते. त्यांना गुडघ्यांचा त्रास होता. त्यांच्यासोबत अनेकजण होते. बालाजी तांबेंनी त्यांची नाडी वगैरे तपासली आणि म्हणाले, तुम्हाला इथे थांबावं लागेल. त्यावर इतर काही म्हणाले, “गुरुजी, आम्ही मेथीचं शेत, सावळी गाय, त्या गाईचं दूध असं सगळं करून देखील त्यांचं दुखणं बरं झालं नाही. उगीच तुम्ही त्यांना आशा दाखवू नका”. यावर बालाजी तांबेंनी “मी तुम्हाला गॅरंटी देतो, त्यांनी इथे राहावं, मी बरं करून देईन”.
अखेर धिरूभाई राहण्यासाठी तयार झाले!
अनेक मिनतवाऱ्या आणि चर्चा झाल्यानंतर अखेर धिरुभाई अंबानी बालाजी तांबे राहात असलेल्या एमटीडीसीच्या बंगल्यामध्ये राहण्यासाठी तयार झाले. त्यांना मंत्र्यांसाठी एमटीडीसीनं राखून ठेवलेला बंगला दाखवला. बालाजी तांबे सांगतात, “त्यांनी लगेच कुठेतरी फोनाफोनी करून विचारणा केली, की हा बंगला पाडून आम्ही आमच्या पद्धतीने बांधला तर कसं होईल? आता अंबानीच ते! त्यावर मी त्यांना म्हणालो, तो बंगला होईपर्यंत तुमचे गुडघे राहिले म्हणजे बरं. बरं सरकारी पद्धतीने बंगला बांधणार म्हणजे पुन्हा तसाच बांधला जाईल!”
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन
MTDC च्या बंगल्याची आठवण
यावेळी बालाजी तांबे यांनी बोलताना MTDC च्या बंगल्यांमध्ये राहात असतानाची एक आठवण देखील सांगितली होती. “पाणी कधी थांबणार नाही, असं कुठलं बाथरूम एमटीडीसीमध्ये कुठे नव्हतंच. तिथे राहायचो आम्ही”, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली होती.