“बाळासाहेब गेले अन् ठाकरे भाषा तिथेच संपली, ती शैली तो आवेष आता पाहायला मिळणार नाही. कुणीही आव आणू नका. काहीजण नाकात बोलतात, भाषा शैली नाही… म्हणजे अनेक प्रसंग मी जवळून पाहिले आहेत. नुसतं आडनाव लावलं म्हणजे ठाकरे भाषा होत नाही. तशी गुणात्मक कृती दिसली पाहिजे, तर ती ठाकरे भाषा.” असं म्हणत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून आले. तसेच, त्यांच्या(उद्धव ठाकरेंच्या) प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनीच रेकॉर्ड केलेली कॅसेट मलाही मिळते. मला लांब जायची गरज नाही. कुठे खासगीत बोललं तरी मला कळतं. त्यामुळे सर्व व्यवस्था अगोदरच लावलेली आहे, पाहू आता. असं देखील नारायण राणे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.

…मी त्यांना सांगू इच्छितो मवाळपणा माझ्या रक्तात नाही – नारायण राणे

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान रायगडच्या महाड येथे माध्यमांशी बोलताना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना,केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अक्षरशा ढवळून निघालं. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद कोकणापासून ते दिल्लीपर्यंत दिसून आले. शिवनसेनेने आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. शिवाय, राणेंवर अटकेची कारवाई देखील झाली. मात्र त्यांना महाड कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर त्यांची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू झाली आहे.

मला विनाकारण डिवचण्याचं काम कुणी करू नये –

दरम्यान, “ठाकरे भाषा विधायक सामाजिक दृष्टिकोनातून राज्याच्या हिताच्या दृष्टिने असेल तर समजू शकतो. मी स्वागत करेन. आकसाने, सूडबुद्धीने अशाच कारवाया करत राहीले. तर जशाच तसं उत्तर देणं हे आमचं काम आहे. मी भाजपात आहे याची मला जाणीव आहे. मी मुद्दाम कोणाची कळ काढायला जाणार नाही, मला विनाकारण डिवचण्याचं काम कुणी करू नये. या सरकारमध्ये जे काही अनेक नेते आहेत, ते ईडी, सीबीआयच्या रडारावरच आहेत त्यामुळे कारवाई तर होणारच. म्हणजे काय आम्ही कारवाई करत नाही तुम्ही थांबवा, हे काही होणार नाही.” असं यावेळी नारायण राणे यांनी यावेळी सांगितलं.

“मी बाळासाहेबांना तेव्हाच शब्द दिला होता की….”, नारायण राणेंचा मोठा खुलासा!

संजय राऊत शिवसेनेला खड्डयात घालयला निघाले आहेत –

याचबरोबर, “माझ्यावर झालेल्या कारवाईबाबत मी कोणाचं नाव घेत नाही, सरकारने कारवाई केली. मी वैयक्तिक कोणाला दोष देत नाही. पण शेवटी सरकारचा प्रमुख कोण? यावरून कळतं की प्रमुखांमुळेच हे घडलेलं आहे. मी कधी पहिले कोणावर आरोप केला नाही, संजय राऊतांनी हे धंदे करू नये. कोण आहे, तुझा जीव केवढा? का करतोय हे सगळं? शिवसेना संपवायचंच काम करतोय तो, दुसरं काही नाही. शिवसेना खड्ड्यात घालायचं काम करतोय. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून कारभार सुलभ व्हावा, यासाठी काही मदत नाही त्याची. अग्रलेखाद्वारे पण नाही. तो विधायक, सामाजिक, विकासात्मक विषयावर तो लिहू शकत नाही.” असं म्हणत नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका देखील केली.