मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूण आणि खेडमधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. चिपळूण बाजारपेठेतील रस्त्यावर उतरून पाहणी केली. यावेळी एका महिलेनं मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडत काही करा पण आम्हाला उभं करा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही महिलेचं म्हणणं ऐकून धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा तालिका अध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांच्या आरेरावीमुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. त्यांचं वागण्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होतं नव्हतं. सर्व गेलं. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असं ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं. मात्र नेमकं त्याचवेळी भास्कर जाधव यांनी महिलेला “आमदार खासदारांनी सहा महिन्याचा पगार दिला तरी काय होणार नाय, तुझा मुलगा कुठंय??? तुझ्या आईला समजव” अशी प्रतिक्रिया दिली. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची देखील उपस्थिती होती.

“…कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये”; मुख्यमंत्र्याचं आवाहन!

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याने तालिका अध्यक्ष भास्कर जाधव चर्चेत आले होते. भास्कर जाधव त्यांच्या आक्रमकतेमुळे राजकीय वर्तुळात ओळखले जातात. गुहागर मतदारसंघाचे आमदार आहे. १९९२ साली रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर १९९५ आणि १९९९ साली शिवसेनेच्या तिकिटावर दोन वेळा आमदार झाले. २००४ मध्ये शिवसेनेनं तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आणि अपक्ष उभे राहिले. मात्र त्यांना पराभव सहन करावा लागला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००९ मध्ये विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा पराभव करत निवडून आले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध खात्याची मंत्रिपदं सांभाळली. त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पदही होतं. मात्र त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला.