सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी आपल्याला धमकावलं जात असल्याचा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे. अदर पूनावाला यांनी कोणाचंही नाव घेतलं नसून मुख्यमंत्र्यांपासून ते उद्योजकांपर्यंत अनेकांचे धमकीचे फोन येत असल्याचा उल्लेख टाईम्स युकेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. दरम्यान भाजपा नेते आशिष शेलार यांनी या प्रकरणावरुन संताप व्यक्त करत ज्यांचा हात आहे त्यांनी खबरदार राहावं असा इशारा दिला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“…तर माझा शिरच्छेद केला जाईल”; अदर पुनावाला यांनी व्यक्त केली भीती

“पूनावाला यांना आताच्या काळात सुरक्षा का मागावीशी वाटली हा प्रश्न गंभीर आहे. दिशादर्शन जर स्थानिक, प्रादेशिक पक्षांकडे जात असतील तर हा गंभीर मुद्दा आहे. केंद्र सरकारने सुरक्षा पुरवत आपलं काम चोख केलं आहे,” असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. करोनाच्या संकटात आज आम्हाला राजकारण करायचं नाही. लोकांची सेवा करणं भाजपाने धोरण आखलं आहे असंही ते म्हणाले.

“अदर पूनावाला यांना सुरक्षा कशासाठी?,” नाना पटोलेंचा मोदी सरकारला सवाल

“या प्रकरणात ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्या पक्षाला उघडं करण्याचं काम परिस्थिती निवळल्यानंतर भाजपा करणार आहे. माझ्याकडे आणि पक्षाकडे याची माहिती आहे. त्यावर आज भाष्य करणार नाही. ज्यांचा हात आहे त्यांनी खबरदार राहावं, आमच्याकडे माहिती येत आहे,” असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

अदर पूनावाला यांनी काय म्हटलं आहे –
अदर पुनावाला यांनी ‘द टाईम्स’ या युनायटेड किंग्डममधील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतातील सध्याच्या स्थितीसाठी कोण जबाबदार आहे यासंदर्भात आपण भाष्य करु शकत नाही असं म्हटलं आहे. काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींकडून लसींची मागणी करणारे धमकावणारे फोन आपल्याला येत असल्याचा खुलासा करतानाच पुनावाला यांनी सध्याच्या परिस्थितीला कोणाला जबाबदार ठरवता येईल यासंदर्भात मी कोणाचं नाव घेतलं किंवा उत्तर दिलं तर माझा शिरच्छेद केला जाईल अशी भीती व्यक्त केली.

सध्या भारत ज्या करोना संकटामध्ये सापडला आहे त्यासाठी कोणाला दोषी ठरवता येईल अशा अर्थाचा प्रश्न पुनावाला यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, “मी जर तुम्हाला योग्य उत्तर दिलं किंवा उत्तर जरी दिलं तर माझा शिरच्छेद केला जाईल. मी निवडणूक किंवा कुंभ मेळ्यासंदर्भात भाष्य करु शकत नाही. हा खूप संवेदनशील विषय आहे. मला वाटत नाही की परमेश्वरालाही परिस्थिती एवढी वाईट होईल याचा अंदाज बांधता आला असता,” असं पुनावाला म्हणाले.

”देशातील अनेक बड्या व्यक्तींच्या दबाव टाकणाऱ्या फोन कॉल्समुळे आपल्या त्रास होतोय”, असंही पुनावाला या मुलाखतीमध्ये म्हणाले. कोविशिल्ड लशीसाठी आपल्याला देशातील काही बड्या व्यक्तींचे फोन येत आहेत. यामध्ये काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींचाही समावेश आहे, असं पूनावाला यांनी म्हटलं आहे. मागील काही दिवसांमध्ये काही प्रभावी व्यक्तींचे मला फोन येऊन गेले. ज्यामध्ये काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींचा समावेश आहे, त्यांच्याकडून वारंवार फोन येत आहेत. आम्हालाच लस लवकर हवी आहे, असं म्हणत त्यांच्याकडून दबाव आणला जात आहे, असा खुलासा पुनावाला यांनी केला.

”याला धमक्या म्हणणं फार साधी गोष्ट ठरेल. या लोकांना असणाऱ्या अपेक्षा आणि त्यांच्याकडून वापरली जाणारी भाषा खरोखर खूपच विचित्र आहे. खरं तर हा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. प्रत्येकाला आपल्याला लस मिळावी असं वाटतं आहे. मात्र आपल्याआधी इतरांना लस का दिली जातेय हे त्यांना समजत नसल्याचे अडचण निर्माण होतेय.” असं पुनावाला म्हणाले आहेत.

Story img Loader