राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पश्चिम बंगालमधील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं कौतुक केलं आहे. ममता बॅनर्जी झाशीच्या राणीप्रमाणे लढल्या अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं. दरम्यान छगन भुजबळ यांनी ममता बॅनर्जींचं कौतुक केल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना थेट धमकीवजा इशाराच दिला आहे.

छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, “ममता बॅनर्जी झाशीच्या राणीप्रमाणे लढल्या. मै अपनी झाशी नही दुंगी असं झाशीच्या राणी म्हणाल्या होत्या. त्याचप्रमाणे ममतादीदीही मै अपना बंगाल नही दुंगी म्हणत लढल्या. तशी प्रतिज्ञाच त्यांनी केली होती”. “बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिवसाआड सभा घेत होते. त्यांचे आठ ते १० मंत्री मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. पण उपयोग झाला नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान ममता बँनर्जींचं कौतुक केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळांना धमकीवजा इशारा दिला आहे. “छगन भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी. कशाला बंगाल वैगेरे….जिथे आहात तिथा बोला ना…जामीनावर सुटला आहात, अजून निर्दोष सिद्ध झालेला नाहीत. त्यामुळे फार जोरात बोलू नका, अन्यथा फार महागात पडेल,” असा इशाराच चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. बोलायचंच असेल तर पंढरपूर, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडूवर बोला असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.

 

Story img Loader