राज्याच्या गृहमंत्र्यांवर कंगना रणौतला धमकावल्याचा आरोप करीत हे आम्ही चालू देणार नाही, अशा शब्दांत भाजपा प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. टाइम्स नाउने याबाबत वृत्त दिलं आहे.

सौमय्या म्हणाले, “कंगना रणौतने मुंबईबाबत विधान करीत चूक केली आहे. प्रत्येक मुंबईकर तिच्या या विधानाशी असहमत आहेत. त्यामुळे तिनं आपलं विधान मागं घ्यायलाच हवं, मात्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तिला धमकावणं हे आपण चालू देणार नाही. राज्य सरकार राज्यातील वाढत्या करोना संसर्गाची प्रकरणं तसेच या परिस्थितीशी लढण्यासाठी बेडची उपलब्धता आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांबाबतच्या महत्वाच्या विषयांपासून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे.

आणखी वाचा- “मुंबईचा अपमान करणाऱ्या कंगनाला केंद्राने वाय दर्जाची सुरक्षा देणं धक्कादायक”

अभिनेत्री कंगना रणौत हिने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका केली होती. ट्विटमध्ये तिने लिहिलं होतं की, “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि मी पुन्हा मुंबईत परत येऊ नये असं म्हटलं. या आधी मुंबईच्या रस्त्यांवर आझादीच्या मागण्या करणारे ग्रॅफिटी दिसत होते आणि आता तर मला उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. ही मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?”.

आणखी वाचा- “अनेकजण इतर प्रांतातून महाराष्ट्रात येतात, काही ऋण मानतात काही मानत नाहीत”

मुंबई सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला इथं राहण्याचा अधिकार नाही – अनिल देशमुख

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख कंगनाच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की, “मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी होत असते. अतिशय सक्षमपणे मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस काम करत असतात. अशा परिस्थितीत एखाद्या कलाकाराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हास्यास्पद आहे. आज मुंबई तसंच महाराष्ट्र पोलिसांच्या हाती मुंबईत सुरक्षित आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीही ते सक्षम आहेत. जर मुंबई, महाराष्ट्र सुरक्षित नाही असं वाटत नसेल तर त्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही.”

आणखी वाचा- देवेंद्र फडणवीस म्हणाले, कंगनाशी सहमत नाहीये, पण…

कंगनानं मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात मुंबई आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी निदर्शनंही करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने कंगनाला वाय प्लस सुरक्षा पुरवली आहे.