बिहार निवडणूक निकालावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अभिनंदन करत केलेल्या टीकेला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी निकाल काहीही असला तरी तेजस्वी यादव ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदही केलं होतं. एबीपी माझाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता सोडून ज्यावेळी युती करता तेव्हा जनता उत्तर देत असते अशी टीका शिवसेनेवर केली.

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “चीत झाले तरी आमचं बोट वर आहे अशी आमच्या जुन्या मित्रांची सवय आहे. अशा प्रकारे ते नेहमीच युक्तीवाद करत असतात. मॅन ऑफ द मॅच, सीरिज नरेंद्र मोदी आणि भाजपाच आहेत. शिवसेनेच्या एकाही उमेदवाराचं डिपॉझिट वाचलं नाही, नोटापेक्षाही कमी मतं मिळाली. शिवसेनेने याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. जोरदार यादीपण घोषित केली होती, पण काय अवस्था झाली हे पाहिलं आहे”.

“सरकारचं अपयश लपवा हेच त्यांचं काम आहे. डिफेन्सच्या फळीत ते अग्रकमावर आहेत. आणि मग ज्यावेळी लॉजिक नसतं तेव्हा काहीतरी सांगून सरकारचं अपयश लपवत असतात,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Bihar Election: संजय राऊतांनी केलं फडणवीसांचं अभिनंदन, म्हणाले…

बिहारचा महाराष्ट्र होईल का? असं विचारण्यात आलं असता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “दोन्ही वेगळी राज्यं आहेत. बिहारमध्ये बिहारचाच पॅटर्न चालणार. नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार होईल. नितीश कुमार मुख्यमंत्री होतील. भाजपा त्याला पूर्ण समर्थन देईल”. नैतिकता सोडून ज्यावेळी युती करता तेव्हा जनता उत्तर देत असते अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.

महाराष्ट्रातील राजकारण पलटणार का? या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं की, “आमच्या कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. आमच्या मतदारांचा, मोदींवर प्रेम करणाऱ्या जनतेचा विश्वास वाढला आहे. पण सध्या आम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. ती भूमिका निभावणार आहोत. सध्या शेतीचं संकट निर्माण झालं आहे, त्यांची दिवाळी अंधारात चालली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम भाजपा करेल”.

राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होण्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मला असं वाटत नाही. भाजपामध्ये कार्यकर्ते, नेते तयार करत त्यांना संधी देण्याचा प्रयत्न असतो. त्यातूनच ही संधी देण्यात आली. अशा अनेक संधी मला मिळतील ज्यामुले मलादेखील प्रगल्भता मिळेल, पण सध्यी मी महाराष्ट्राच्या राजकारणात आहे”.

संजय राऊत यांनी काय म्हटलं होतं –
फडणवीसांचं अभिनंदन करताना संजय राऊत यांनी म्हणाले होते की, “नक्कीच…जे जिंकले त्यांचं अभिनंदन करण्याची आमची परंपरा आहे. फडणवीस बिहारचे प्रमुख होते. त्यांना महाराष्ट्राचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी येथून बिहारमधील सूत्रं नक्कीच हलवली असतील. संपूर्ण केंद्रीय सत्ता तिथे कामाला लागली होती. मोदींनी १७ ते १८ सभा घेतल्या. तरीही ३० वर्षांचे तेजस्वी यांनी सर्वांना कामाला लावलं. तोंडाला फेस आणला हे मान्य करावं लागेल”.

“बिहारमध्ये भाजपाचे नेते नितीश कुमार मुख्यमंत्री होतील असं एका सूरात सांगत आहेत. यासाठी नितीश कुमार यांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत. कारण जो खेळ महाराष्ट्रात खेळण्याचा प्रयत्न झाला. त्यावर आम्ही जो पलटवार केला त्यानंतर भाजपा आपल्या मित्रांशी तसं करणार नाही. शब्द फिरवल्यानंतर काय होऊ शकतं हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री होतील आणि भाजपाला त्यांना करावंच लागेल,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं.