केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार अखेर बुधवारी बऱ्याच चर्चेमध्ये पार पडला. ही चर्चा जशी मंत्रिमंडळाच्या युवा चेहऱ्याची होती, तशीच जुन्या-जाणत्यांच्या डच्चूचीही होती. पण सर्वाधिक चर्चा रंगली ती शपथविधीमध्ये सगळ्यात पहिली शपथ घेणाऱ्या नारायण राणेंची. बाहेरून पक्षात आलेल्या आणि मंत्रीपदापर्यंत पोहोचलेल्यांमध्ये देखील नारायण राणेंचा पहिला क्रमांकच लागला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपानं नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद दिलं असून त्यांना अधिक ताकद दिल्याचं बोललं जात आहे. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुका आणि त्यानंतर दोन वर्षात येणाऱ्या राज्यातील विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून राणेंना शिवसेनेला आव्हान देण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं, अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा केला आहे.

चर्चांवर निर्णय होत नाहीत!

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये एका कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी शिवसेनेला आव्हान देण्यासाठी राणेंचा मंत्रीमंडळा समावेश केल्यासंदर्भात विचारणा केली असता देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर उत्तर दिलं. “चर्चांवर कोणतेही निर्णय होत नसतात (गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या). वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर चर्चा होत असतात. राणेंना मंत्री बनवताना त्यांच्या क्षमतेचा विचार केला गेला असून बाकी कोणताही विचार केलेला नाही”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

“…म्हणून नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं”, रावसाहेब दानवेंची पहिली प्रतिक्रिया!

कुणी सांगितलं पंकजा मुंडे नाराज आहेत?

दरम्यान, केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रातून चार नावं नव्याने मंत्रीमंडळात घेण्यात आली आहेत. मात्र, पंकजा मुंडे यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीमंडळाच्या यंग ब्रिगेडमध्ये स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जात असताना तो दावा फडणवीसांनी फेटाळून लावला आहे. “तुम्हाला कुणी सांगितलं त्या नाराज आहेत. कृपा करून त्यांना बदनाम करू नका. भाजपामध्ये आमचे सर्वोच्च नेते निर्णय करत असतात. योग्य वेळी सगळे निर्णय होतात. अकारण कोणतीही नाराजी नसताना त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणेंनी मानले ‘या’ चार व्यक्तींचे आभार!

मी काही ईडीचा प्रवक्ता नाही

भाजपा सोडून राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेल्या एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आली असून भोसरीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी त्यांची देखील चौकशी सुरू आहे. यासंदर्भात विचारले असता फडणवीसांनी भाजरामध्ये सूडाचं राजकारण होत नसल्याचं सांगितलं. “यासंदर्भात ईडी बोलायचं ते बोलेल, मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. कायदा आपलं काम करत असतो. भाजपामध्ये अशा प्रकारे सूडाचं राजकारण केलं जात नाही”, असं ते म्हणाले.