करोनाच्या युद्धात कुटुंबाला विसरून आघाडीवर लढणाऱ्या योध्द्यांचा आज शहर भाजपातर्फे सत्कार करीत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

जवळपास ६५ दिवसांपासून अविश्रांत कार्यरत मनुष्यबळ हेच सामान्य जनतेला दिलासा देत आहे. करोनापासून जनतेला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घेणाऱ्या योद्ध्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांची व्यक्तीश: भेट घेत आहे, असे प्रतिपादन पक्षाचे शहराध्यक्ष पवन परियाल यांनी केले. रेल्वेस्थानकावर कार्यरत रेल्वे पोलिसांनी मजूरांना घेऊन जाणाऱ्या गाड्यांमध्ये गोंधळ उडू नये म्हणून खबरदारी घेतली. तसेच वर्धा स्थानकावर येणाऱ्या मजूर कामगारांना सुरक्षित अंतराचे मार्गदर्शन केले. पेयजल व्यवस्था सांभाळली. या सेवेसाठी ठाणेदार व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा शाल-श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

करोनामुळे घरीच बसणाऱ्या कुटुंबास २४ तास अखंडीत वीज पुरवठा व्हावा म्हणून कार्यरत वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शहर पदाधिकारी अनिल धोटे, मंगेश मांगलेकर, प्रशांत झलके व अन्य पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पक्ष कार्यालयात काही पत्रकारांचाही प्रतिकात्मक सत्कार करण्यात आला. यावेळी या सर्वांना करोना वॉरिअर्स असे नमूद असलेले स्मृती चिन्ह भेट देण्यात आले. पुढील टप्यात डॉक्टर व अन्य सेवाभावींचा सत्कार करण्यात येणार असल्याचे पवन परियाल यांनी सांगितले.

Story img Loader